Akola Crop Loss
esakal
अकोला : पावसाच्या लहरीपणाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर आता नजरअंदाज पैसेवारीनेही जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधोरेखित केली आहे. जिल्ह्याची खरीप पैसेवारी अवघी ४४ पैसे जाहीर झाली असून गतवर्षी ती ४८ पैसे होती. त्यामुळे यंदा पिकांची अवस्था अधिक बिकट असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे हातचे पीक गेले, दुसरीकडे कर्जाचा डोंगर कायम आहे; अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.
जुलैमध्ये काही भागांत झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान केले. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली. सोयाबीन पिके सुकली, कपाशीच्या उत्पादनावर परिणाम झाला, तर अन्य खरीप पिकांनाही मोठा फटका बसला.
उत्पादन घटणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च मात्र कायम आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर झालेला खर्च वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
शासनाने २६ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमीच्या कामांच्या निकषात शिथिलता अशा सवलती लागू झाल्या आहेत. मात्र, सवलतींच्या घोषणांपेक्षा शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज आहे. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई, कर्जाच्या ओझ्यातून दिलासा आणि पुढील हंगामासाठी आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. पैसेवारीच्या आकडेवारीने दुष्काळाचे वास्तव समोर आणले असताना शासनाची मदत शेतकऱ्यांच्या बांधावर कधी पोहोचणार, हा प्रश्न कायम आहे.
जिल्ह्यातील १ हजार १२ महसुली गावांपैकी खरीप लागवडीयोग्य ९९० गावांची पीक पाहणी करण्यात आली. या गावांची सरासरी पैसेवारी ४४ पैसे आली आहे. पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पीक परिस्थिती गंभीर मानली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था किती बिकट आहे, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. तालुकानिहाय पाहता पातूरची पैसेवारी सर्वांत कमी ४० पैसे आहे. अकोला ४६, अकोट ४५, तेल्हारा ४५, बाळापूर ४२, मूर्तिजापूर ४४ आणि बार्शीटाकळी ४४ पैसेवारी नोंदविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.