Akola News: Political parties and teachers unions face off in Amravati division teachers constituency elections
Akola News: Political parties and teachers unions face off in Amravati division teachers constituency elections 
अकोला

राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील तब्बल २७ उमेदवारांपैकी लढतीत असणाऱ्या पाच ते सहा उमेदवारांची भिस्त दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतांवर असून कधी नव्हे ती अनिश्चितता निर्माण झालेल्या या निवडणुकीत राजकीय पक्ष विरूद्ध शिक्षकांच्या संघटना, असे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या भाऊगर्दीची लगबग वाढली. विक्रमी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु लढतीचे चित्र राजकीय पक्ष विरूद्ध शिक्षकांच्या संघटना असल्याचे दिसून येत आहे व ही निवडणूक, राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध करते की शिक्षकांच्या संघटनांचे अस्तित्व कायम ठेवते यासंदर्भात निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विधानसभा आणि विधान परिषद असे द्विगृही विधीमंडळ असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेत शिक्षक व पदवीधरांचे अनुक्रमे ७ प्रतिनिधी असतात. त्यावरून राज्याच्या जडणघडणीतील या दोन घटकांचे महत्व सिद्ध होते. शिक्षकांचे प्रतिनिधीत्व शिक्षकांनीच करावे, असे बंधन नसले, तरी आजवर या मतदारसंघात प्रामुख्याने शिक्षकांचे प्रतिनिधीत्व शिक्षकच करत आला आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, नुटा, विज्युक्टा विरूद्ध महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक परिषद अशी लढत नेहमीच बघायला मिळत होती. गेल्या निवडणुकीपासून हे चित्र बदलले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना विभागली जाऊन विमाशिचे नेतृत्व माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्याकडे, तर पश्चिम विमाशीचे नेतृत्व माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्याकडे आले.

दोघांनी अनुक्रमे प्रकाश काळबांडे व विकास सावरकर या दोघा लढवैयांना यावेळी रिंगणात उतरविले आहे. विज्युक्टाचे प्रा.डॉ.अविनाश बोर्डे, शिक्षक संघर्ष समितीच्या संगिता शिंदे, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकिले, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे किरण सरनाईक आणि महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे, भाजपाचे प्रा.डॉ.नितिन धांडे व अन्य १९ उमेदवार रिंगणात आहेत.

शिक्षकांच्या संघटना विरुद्ध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, असे स्वरूप असणारी ही लढत आपापल्या पक्षांच्या ध्येयधोरणाबरहुकूम सभागृहात वावरणाऱ्या प्रतिनिधींना कौल देऊन राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध करते की शिक्षकांच्या प्रश्नांचा सभागृहात कैवार घेणाऱ्या शिक्षकांच्या संघटनांना कौल देऊन शिक्षकांचे बळ वाढविते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तब्बल २७ उमेदवारांमधून  अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक १० हजार ५७०, तर वाशीम जिल्ह्यातील सर्वात कमी ३ हजार ८३०, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील अनुक्रमे ६ हजार६५१, ७ हजार २०८ व ७ हजार ५४५ असे एकूणष३५ हजार ८०४ शिक्षख मतदार आपला प्रतिनिधी १ डिसेंबरला निवडणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT