Serum
Serum Serum
अर्थविश्व

कोरोनाकाळात जगातील लस निर्मिती कंपन्या 'मालामाल'; पुण्यातील 'सिरम' आघाडीवर

प्रमोद सरवळे

पुणे : जगभरात मागील वर्षी जानेवारीपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार सुरू झाला होता. यामध्ये सुरवातीला चीननंतर युरोप, अमेरिका, मध्य आशिया तसेच रशियात प्रसार वाढत गेला होता. भारतात जरी जानेवारीच्या अखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असला तरी सुरवातीला याचा धोका जाणवला नव्हता. पण मार्च महिन्यापासून भारतात कोरोनाने थैमान मांडल्याचे दिसले होते. देशात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगाने पसरत आहे आणि मृत्यूदरातही वाढ झाली आहे.

भविष्यात येणारी तिसरी लाटही देशासमोरील मोठं आव्हान असणार आहे. यासाठी देशात सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेच्या अगोदर जर सर्वांचे लसीकरण झाले तर भारत तिसरी लाट थोपवून लावू शकेल. सध्या भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे (Serum Institute of India) आणि हैदराबादच्या भारत बायोटेकला (Bharat Biotech) देशात कोरोनावरील लसींच्या उत्पादनाला अधिकृत परवानगी आहे. पुण्यात असलेली सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत मोठी लसींची निर्मिती करणारी कंपनी आहे. जगभरासोबत देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सिरमचे लस उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे. सध्या लसींची मागणी वेगाने वाढत असल्याने भविष्यात कंपनीच्या नफ्यात विक्रमी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

covid 19 in India

सिरम सध्या कोरोनावरील ऑक्‍सफोर्ड आणि ऍस्ट्रॅजेनेकाने तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लसींची निर्मिती आणि पुरवठा करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कंपनीला Covishield चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या ऑर्डरी मिळाल्या आहेत. कोरोना लसींची वाढती मागणी लक्षात घेता 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीचा नफा येणाऱ्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये (FY21) मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच आर्थिक वर्ष 2022-23 मध्येही कंपनीच्या नफ्यात मोठी भर पडण्याची शक्‍यता आहे.

दशकात कंपनीच्या नफ्यात कमी पण स्थिर वाढ

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचा नफा गेल्या दशकभरात सातत्याने वाढत आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच कंपनीचे निव्वळ उत्पन्न 5000 कोटींच्या पुढे गेले होते. नंतर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये त्यात थोडी सुधारणा झाली होती. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील 418 कंपन्यांचे निव्वळ उत्पन्न 5 हजार कोटींपेक्षा अधिक होते. त्यामध्ये पुण्यातील सिरमचाही समावेश होता, ही माहिती कॉर्पोरेट डेटाबेस कॅपिटलिनच्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. BusinessToday.in च्या आडकेवारीनुसार सिरम कंपनीला मागील आर्थिक वर्षात (2020-21) तब्बल 2,251 कोटींचा नफा झाला होता. सध्या कोरोनाच्या लसींची मागणी वाढत असल्याने चालू आर्थिक वर्षात कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे.

वर्ष - निव्वळ नफा (कोटींमध्ये)

2014-15 - 1,741.33

2015-16 - 1,963.89

2016-17 - 2,179

2017-18 - 2,057

2018-19 - 1,912

2019-20 - 2,252

2020-21 - 2,251

serum institute

मागील दशकात सिरम कंपनीच्या उत्पादनांची निर्यात वाढल्याने उत्पन्न आणि नफा सातत्याने वाढताना दिसला आहे. भारतात कंपनीला 20 वेगवेगळ्या प्रकारच्या लसी तयार करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. कंपनी भारताबरोबरच इतर अनेक देशांना लसींचे निर्यात करते. कोरोनाच्या अगोदरचा विचार केला तर, कंपनीचा नफा स्थिरपणे वाढत होता, पण आता त्यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. कारण, मागील वर्षापासून मागणी वाढल्याने सिरम दिवसेंदिवस लसींचे उत्पादन वाढवत आहे.

जगभरात भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे देशातील सर्वांना लसीकरण करायचे असेल तर तेवढ्या लसीही उपलब्ध असल्या पाहिजेत. तसेच इतर देशांतून सिरमच्या लसींची मागणी वाढत आहे. सर्वांना लवकर लस मिळावी, यासाठी कंपनीत युद्धपातळीवर लसींचे उत्पादन सुरू आहे. भारतात ही कंपनी केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये, राज्य सरकारांना 500 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपये दराने डोस पुरवत आहे. सिरम कंपनी केंद्र सरकारला एक डोस 150 रुपयांना देत आहे, याबद्दल बोलताना आदर पूनावाला म्हणाले होते की, "जरी आम्ही सध्या जास्त नफा मिळवत नसलो तरी आम्ही तोट्यातही नाही आहोत. जो नफा मिळतो त्यातून आम्हाला संशोधन आणि विकासावर खर्च करावा लागतो.'

vaccination

समजा, देशातील राज्यांनी 50 कोटी लसी 300 रुपये दराने खरेदी केल्या तरी कंपनीचे उत्पन्न 15,000 कोटींपर्यंत जाते. हे 2020-21 या आर्थिक वर्षाच्या निव्वळ उत्पन्नापेक्षा तीन पट आहे. यावरून तुम्हाला कळून येईल की कंपनीला या आणि पुढील आर्थिक वर्षात किती उत्पन्न आणि नफा मिळणार आहे. तर सध्या सिरम जगभरातील देशांसाठीही कोट्यवधी लसी बनवत आहे. Covax agreement नुसार विकसनशील देशांनाही कंपनी लसी पुरवणार आहे. पूनावाला म्हणाले की, "कंपनी पुढील सहा महिन्यांत कोविशिल्ड डोसची उत्पादन क्षमता 1.5 अब्ज ते 2.5 अब्ज पर्यंत वाढवेल.'

महत्त्वाचे म्हणजे, भविष्यात सिरमची लस खासगी बाजारपेठेतून विविध कंपन्या किंवा देशांची सरकारे जास्तीच्या दराने खरेदी करू शकतील. तसेच सिरमचा अमेरिकन कंपनी Novavax सोबतही लसींच्या पुरवठ्याबद्दल करार झाला होता; पण तो सध्या सप्टेंबर 2021 पर्यंत लांबणीवर पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, सिरमला चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भरमसाठ नफा मिळू शकतो. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी अमेरिकन लस निर्मिती करणारी कंपनी Pfizer Inc चे उत्पन्न 200 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

astrazeneca vaccine

बिझिनेस स्टॅंडर्डच्या आकडेवारीनुसार, मागील तीन वर्षांत AstraZeneca कंपनीला प्रत्येक वर्षी सरासरी उत्पन्न 24 अब्ज डॉलर्स आणि नफा 4 अब्ज डॉलर्स मिळाला आहे. हे सिरमच्या वार्षिक नफ्यापेक्षा कमीतकमी 10 पट जास्त आहे. 2018 आणि 2019 या दोन वर्षांचे मॉडर्ना (Moderna) कंपनीचे उत्पन्न 2 अब्ज डॉलर्स होते, जे 2020 मध्ये कोरोनाची लस विकसित केल्यानंतर 8 अब्ज डॉलर्सपर्यंत गेले. तर 2021 मध्ये कंपनीने 11 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे, जी मागील अनेक वर्षांतल्या कंपनीच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. तसेच कंपनीला अजूनही मोठा नफा मिळू शकतो.

मॉडर्नासारखीच परिस्थिती सिरमची आहे. जरी कोविशिल्ड लसीची किंमत मॉडर्नाच्या लसीपेक्षा कमी असली तरी कोविशिल्डचे उत्पादन आणि त्याची विक्री खूप आहे. यावरून एक लक्षात येते, की या महामारीत जगभरातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या मालकांनी मोठी कमाई केली आहे आणि करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT