Blog | ब्लॉग

पसायदान कोणत्या भाषेत आहे?

डॉ. शंतनू अभ्यंकर

हां... तर मी काय सांगत होतो... आपलं जिणं, राहाणं, खाणं सगळं सगळं बदललं आहे. एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या, ऍन्युअल डे फंक्‍शनला, मी परवा चीफ गेस्ट होतो..! खरं तर चीप गेस्ट होतो. माझ्या इतका स्वस्तातला गेस्ट दुसरा मिळणे दुरापास्त होते. स्वतःच्या खर्चाने शाळेत जाऊन, स्नेहसंमेलन सहन करून, वर देणगी देणारा असा विरळाच. शिवाय चिल्यापिल्यांची दंगामस्ती पाहात आणि ऐकत मी भाषणही ठोकले. ते तब्बल साडेतीन मिनिटांच्यावर. मलाही सोसवेना आणि चिमुकल्या श्रोत्यांनाही; पण त्या दोन- तीन तासांत मी तिथे जी भाषा ऐकली, ती थक्क करणारी होती. 

घरीदारी मराठी बोलणाऱ्या, घरीदारी मराठी चालणाऱ्या, घरीदारी मराठी वागणाऱ्या त्या चिमुरड्यांचे शिक्षण मात्र इंग्रजीतून सुरू होते. भाषा इंग्रजी आणि संस्कृती मराठी अशी रस्सीखेच चालली होती. चांगलीच कुतरओढ होत होती सगळ्यांची. पाहणाऱ्याला मौजेची वाटत असली तरी प्रकार अंतर्मुख करणारा होता. 

गॅदरिंग संपताच सगळी किलबिल सरली. प्रिन्सिपॉल बाईंच्या केबीनमध्ये "च्यामारी'च्या साथीनं (चहा आणि मारी बिस्कीट) चर्चा रंगली होती. संत वचनांनी, संत महंतांच्या तसबिरींनी आणि पुतळ्यांनी बाईंभोवती प्रभावळ धरली होती. मधूनच शाळेत आया म्हणून काम करणाऱ्या सुलामावशी कुठे आहेत? असा प्रश्न विचारायची वेळ त्या माउलीवर ओढवली. शाळेत इंग्लिश आणि फक्त इंग्लिशमध्येच बोलायचे असा फतवा होता. मग काय थेट सवाल आला, "व्हेअर आर सुलामावशी?' आदरार्थी बहुवचनाने आता लुगड्यातून झग्यात प्रवेश केला होता आणि तत्पर उत्तरही आले, "सुलामावशी आर डाऊन.' 

सगळे शिक्षणतज्ज्ञ वगैरे वगैरे सांगतात, की मातृभाषेतून शिक्षण हेच योग्य; पण माझ्यासकट अख्ख्या होल महाराष्ट्रात हे फारसं कुणीच मनावर घेतलेलं दिसत नाही. मुलांना लहानात लहान वयात इंग्लिश मीडियममध्ये घालायची अगदी चढाओढ सुरू आहे. पोरही जरा येस-फेस करू लागली, की मऱ्हाठी संस्कृतीला आणि घरच्या मऱ्हाठी भाषिकांना फालतू समजू लागतात आणि अशा पोरांचं कौतुकही वाटतं मायबापाला. प्रश्न हा आहे, उत्तम इंग्लिश येणं आज जीवनावश्‍यक आहे; पण म्हणून उत्तम मराठी येणं आणि बोलणं हे कमअस्सल कसं? 

मला तर लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज वगैरे मंडळी इतर भाषेत बोलायला लागली, की अस्वस्थ वाटतं. टिळक कुठल्याशा मालिकेत हिंदीत बोलत होते. स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असून तो ते मिळवणारच असल्याचं, त्यांनी हिंदीत सांगितल्यामुळे मला बराच वेळ ते पटेचना. "अर्रे!, ये अपना आदमी हिंदीमे कैसे बोल्नेकू लग्या?', असा प्रश्न मला पडला होता. देवबीव मंडळीसुद्धा माझ्या लहानपणी उत्तम मराठी बोलत; पण मी इंग्लिश मीडियममधे गेल्यावर तीही इंग्लिशमध्ये बोलायला लागली! Curse, Penance, Wishes हे शब्द अमर चित्र कथांतून माझ्या शब्दसंपदेत जमा झाले. 

फार काही बिघडलं असं माझं म्हणणं नाही. संस्कृती आणि भाषा ह्या प्रवाही असतात. "पसायदान कोणत्या भाषेत आहे?', असं विचारल्यावर, "संस्कृत!' असं उत्तर देणारी मुले आहेत. त्यांचं काही चूक नाही. त्यांच्या कानावर पडलेल्या मराठीचा आणि पसायदानातल्या मराठीचा संबंध नाही एवढाच याचा अर्थ; पण पसायदान परके वाटायला 400 वर्ष जावी लागली. पु. लं. परके व्हायला अजून 40 च पुरतील आणि कदाचित वीसच वर्षांनंतर, ह्या सदरातील लिखाण मराठीत होतं बरं, असं सांगावं लागेल. संस्कृतीचा आणि भाषेचा हा बदलांचा झपाटा छाती दडपून टाकणारा आहे, एवढंच. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT