Nagraj Manjule
Nagraj Manjule 
Blog | ब्लॉग

BLOG : घर-बंदुक-बिरयानी म्हणजे तुफानी मामला!

Amit Ujagare (अमित उजागरे)

मराठी चित्रपटसृष्टीला 'अँग्री यंग मॅन' एव्हाना मिळाच होता पण त्याची ओळख होण्यासाठी घर बंदुक बिरयानी (GBB) चित्रपट यावा लागला. तुम्ही म्हणाल कोण? अर्थातच नागराज मंजुळे! सिस्टिमविरोधात उभा राहणारा सर्वसामान्य माणूस! मग तो आपल्या लिखाणातून असेल किंवा चित्रपटांसारख्या कलाकृतीतून नागराजनं हे वारंवार सिद्ध केलंय. पण GBB मधून नागराजनं जो काही पोलीस अधिकारी साकारलाय याला तोड नाही. कसलं कॅरॅक्टर बिल्ड केलंय, काय त्याचा स्वॅग कमालचं! मला तो अजय देवगनच्या सिंघमपेक्षाही जास्त प्रॉमिसिंग वाटतो, रियल हिरो वाटतो. मराठीत आत्तापर्यंत असा पोलीस अधिकारी कधीच का दाखवला गेला नाही? याचंही आश्चर्य वाटतं.

चित्रपटाची सुरुवातच होते घनदाट जंगलाच्या सीनपासून जो नक्षलवादी भाग आहे. यातून चित्रपटाचा केंद्रबिंदू लक्षात येतो. बरं नागराजचा सिनेमा म्हटलं तर त्यानं समस्येला हात घातला असणारचं. त्याची सिनेमाची स्टाईल चक्रावून सोडणारी असते तीच इथं पुन्हा एकदा दिसते. चित्रपटाची सुरुवात, इंटरर्व्हल आणि शेवटही एकदम नागराज स्टाईल. GBB म्हणजे इमोशनल, कॉमेडी, थरार अन् कम्प्लिट एन्टरटेन्मेंट पॅकेजच.

समाजातील, राजकारणातील, पोलीस दलातील आणि एकूणच सिस्टिममधील वास्तव हलक्या फुलक्या विनोदी प्रसंगांमधूनही दाखवता येते ही या चित्रपटाची खासियत. चित्रपटाची ही स्टाईल पाहता राजकुमार हिरानी या लिजंड दिग्दर्शकाची आठवण येते. GBBमधील नक्षलवादी हे खूपच विनोदी असल्याची टीकाही झालीए, पण टीकाकारांनी खरंच हे नक्षलवादी प्रत्यक्षात कसे वागतात हे पाहिलंय का? की आजवर फक्त ऐकीव गोष्टीवरच त्यांनी आपली एक इमेज बनवून घेतलीए. ज्या माणसांनी जीवनातलं सर्वात मोठं दुःख आणि क्रौर्य पचवलेलं असेल तो स्वतः कायमच क्रूर असेल असंही नाही. यातील सूरज पवारनं साकारलेलं कॅरेक्टर निष्ठूर वागताना आसुरी आनंद घेत असतं. तसंच 'शिवाजी अंडरग्राऊंड भिमनगर मोहल्ला'त यमाची भूमिका गाजवलेल्या प्रवीण डाळिंबकरनं GBBमध्ये साकारलेलं गुऱ्या हे पात्र सिनेमाभर प्रेक्षकांना हसवतं पण जेव्हा त्याचा एन्काऊंटर होतो तेव्हा ते तुम्हाला रडवतं देखील. सयाजी शिंदेंनी साकारलेला पल्लमनं आपलं अख्खं कुटुंब गमावलेलं. हे पात्र त्यांनी ज्या पद्धतीनं साकारलंय त्याला तोड नाही. आजवर अनेक भूमिका केल्यानंतर वाढत्या वयातही त्यांची एनर्जी कमाल आहे, चेहऱ्यावर कुठलाही थकवा जाणवत नाही! 'आहा हेरो' या गाण्यातून नक्षलवाद्यांनी आपली व्यथा काय भारी मांडलीए.

कथा-पटकथेचा मेळ जबरदस्त जमलाच आहे पण यातील डायलॉग्ज एकदम खास! 'आता चालंच बिघडवायचीय' अन् 'हान की बडीव' चा एल्गार करत हलगीच्या तालावर बसवलेला फाईट सीन, राया पाटील अर्थात नागराजच्या एन्ट्रीचं गाणं असेल! क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून नागराजला इथं मानावचं लागेल, आमिर खाननंतर दुसरा परफेक्शनिस्ट भेटलाय इंडस्ट्रीला. नागराजनं साकारलेला साधा ग्रामीण भाषा बोलणारा पण कारारी पोलीस अधिकारी पाहताना 'फॅमिली मॅन' आणि 'पुष्पा' चित्रपटाची पण आठवण येते. अंगावर वर्दी चढवल्यानंतर तुमच्यात संयम, निग्रह आणि माणूसपण टिकलं पाहिजे, हे राया पाटील आपल्याला सांगतो. पण पुरस्कार मिळेल या आशेच्या भांगेची नशाही काही तथाकथीत एन्काऊंटर स्पेशालिस्टना असते, त्याचाही समाचारही हा सिनेमा घेतो. तरुणांची लग्न जमत नसल्याचा गंभीर मुद्दाही या चित्रपटातून समोर येतो. एक ना अनेक अशा समाजकारण, राजकारण आणि कुचकामी व्यवस्थेतील बारकाव्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. फक्त तो बिटविन दि लाईन्स समजून घ्यायला हवा.

जंगलातील नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये महिला पोलिसांचा सहभाग, असा एखाद्या ऑनग्राऊंड महत्वाच्या मिशनमध्ये महिला पोलिसांच्या सहभागाचा आजवर मराठी चित्रपटांमध्ये कधीही न दिसलेला प्लॉट पहायला मिळतो. राया पाटीलला असलेल्या दोन हुशार मुली, त्यांना बापाचा वाटणारा अभिमान, चित्रपटातल्या हिरॉईनला जोडीदार निवडण्याचं असलेलं स्वातंत्र्य या गोष्टीपण बरंच काही सांगून जातात. एकूणच लेखक-दिग्दर्शक हेमंत अवताडेंनी कमाल कलाकृती बनवलीए, त्यांच्यासोबत असलेल्या क्रिएटिव्ह नागराजची छापही यात दिसते. GBBला एव्ही प्रफुलचंद्रन यांनी खरंच जबरदस्त म्युझिकल ट्रिटमेंट दिलीए, नवं आणि जबरदस्त काहीतरी ऐकण्याचं समाधान मिळतं. कुतुब इनामदारचे कट्स आणि विक्रम अमलादीचं छायाचित्रण अप्रतिमच!

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांच्या वेगवेगळ्या मार्गानं जाणाऱ्या आयुष्याची एकत्र आलेली कहानी म्हणजेच घर-बंदुक-बिरयानी आहे. ही कथा फक्त सिनेमा हॉलमध्ये पाहण्यातचं मजा आहे. ओटीटी आणि पायरेटेड कॉपी पाहण्याच्या भानगडीत पडू नका, उत्कृष्ट सिनेमाची मजा गमवाल.

- अमित उजागरे

amit.ujagare@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT