Nagnathwadi Shivmandir sakal
संस्कृती

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : नागनाथवाडीचे शिवमंदिर

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांतून हजारो भाविक येथील पवित्र स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात.

केशव कचरे

श्रावणमासानिमित्त श्री. क्षेत्र नागनाथवाडी येथे नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांतून हजारो भाविक येथील पवित्र स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात. श्रावणातील आज (ता. ४) तिसरा सोमवार श्री. नागनाथाच्या यात्रेचा मुख्य दिवस. त्यानिमित्त...

ललगुणपासून दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर येरळा नदीच्या तीरावर गर्द वनराईने नटलेल्या क्षेत्र नागनाथवाडी येथे स्वयंभू नागनाथाचे एक हजार वर्षे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. शिवरात्रीच्या पर्व काळात व श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

परप्रांतातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून गेल्या तीन वर्षांपासून येथे श्रावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे आता श्रावणातील प्रत्येक दिवशी मंदिर भाविकांसाठी खुले राहात असल्याने येथील पवित्र स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेणे परप्रांतीय भाविकांसाठी सोयीचे झाले आहे.

देशात अनेक शिवमंदिरे आहेत. मात्र, येथील शिवमंदिर आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी भाविकांना आकर्षित करत आहे. हे शिवमंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण बांधकाम घडीव दगडात आहे. मंदिर प्रवेशासाठी २० फूट उंचीचे दगडी कमानीचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात मेघडंबरी, दगडी चैाथरा आहे. त्यावर नंदीच्या तीन आकर्षक मूर्ती आहेत.

यातील दक्षिणेकडील नंदी स्वयंभू आहे. चौथऱ्यासमोरच मुख्य मंदिराची तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यातून २५ फूट खोल असलेल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी जाताना छोट्या दगडी पायऱ्या सावधपणे उतरून जावे लागते. लहान पायऱ्या उतरून १० फूट खाली गेल्यावर फूटभर पाण्याने भरलेल्या छोट्या हौदात भाविकांचे पाय आपोआप धुतले जातात.

२५ फूट खोल उतरल्यानंतर बैलगाडीच्या चाकाच्या आकाराचे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते. हे शिवलिंग वर्षभर पाण्याखाली असते. शिवरात्रीच्या पर्व काळात व पवित्र श्रावण मासात भाविकांना दर्शनासाठी ते खुले केले जाते. श्री. नागनाथ हे राज्यातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. बुध येथील राजेघाटगे संस्थानाचे ते कुलदैवत आहे.

या देवस्थांनाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, बुध संस्थानचे अधिपती पराक्रमी राजेघाटगे बुध पाचेगावचा कारभार पाहात होते. हजारो एकर जमिनीवरील डोंगर, जंगले, गवताची कुरणे त्यांच्या मालकीची होती. महाराजांचा त्याकाळात मोठा गौळीवाडा होता. गौळीवाड्यातील गाई येरळा नदीतीरावर गवती कुरणात चरावयास येत असत.

गायी राखणाऱ्या गुराख्यास सर्व नाथागौळी म्हणत असत. नाथागौळी शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीची परीक्षा पहाण्यासाठी महादेवांनी एक चमत्कार दाखवला. सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे. त्याठिकाणी त्याकाळी भले मोठे वारूळ होते. दूध देणाऱ्या गायी वारुळाजवळ येताच वारुळातील नाग वर येऊन गायीचे स्तनपान करीत असे. हा नित्यक्रम अनेक दिवस सुरू होता. एक दिवस नाथगौळ्याने हा सारा प्रकार पाहिला. तो आश्चर्यचकित झाला.

सापाच्या विषारी स्पर्शामुळे असे दूध वासरांना व लोकांना पिण्यासाठी धोकादायक असून, हा नाग लवकरात लवकर नाहीसा केला पाहिजे, असा विचार करून नाथागौळ्याने हा सारा प्रकार महाराजांच्या कानावर घातला. महाराजांनी नाथासमवेत वारुळाच्या बाजूला लपून हा सारा प्रकार पाहिला. महाराजांनी अनेक सेवकांना एकत्र करून नाथाच्या मदतीने वारूळ खोदण्यास प्रारंभ केला.

खोदकाम करताना प्रथम दहा फुटांवर स्वयंभू नंदी सापडला. पुढील खोदकाम जोमाने केल्यानंतर २० फुटांवर पाण्याची कारंजी उसळली. या उसळणाऱ्या पाण्यात उपस्थित सर्वांना स्वयंभू, तेजस्वी शिवलिंगाचे दर्शन झाले. नाथाने अतिआनंदाने व प्रेमाने शिवपिंडीला मिठी मारली. स्तनपान करणारा नाग हा ईश्वरी अवतार असल्याची नाथाची खात्रीच पटली. जोपर्यंत तो भेटत नाही, तोवर खोदकाम सुरू ठेवायचे, असे नाथांनी महाराजांना सांगितले.

खोदकाम २५ फुटांवर जाताच स्तनपान करणारा तो नाग सर्वांना दिसला. नाथाने ईश्वराकडे आपले मोठे रूप बदलून छोटे रूप धारण करावे व फक्त श्रावणात प्रकट होऊन कलियुगातील मानवाला आशीर्वाद देण्याची विनंती केली. त्याक्षणी लहान रूपातील नागराज त्याठिकाणी फणा काढून डोलू लागले.

महाराजांनी आपल्या कुटुंबासोबत नागराजाचे दर्शन घेतले व येथे नागनाथाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला. बुध पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन वर्षभरातच भव्य नागनाथाचे मंदिर उभारले. त्यानंतर भाविकांच्या देणगीतून व ग्रामस्थांच्या सहभागातून नागनाथ सेवा विकास मंडळाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले.

भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह, सुंदर रेखीव मंदिराचे प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, मंदिराचे सुशोभीकरण, येरळा नदीतीरावर भक्कम तटबंदी आदी लाखो रुपयांची विकासकामे भाविकांच्या देणगीतून व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून सुरू आहेत.

क वर्गात मोडणाऱ्या या देवस्थानला शासनाच्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. शासनाने या देवस्थानला अ वर्ग दर्जा बहाल करावा, अशी भाविक व ग्रामस्थांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT