BCCI announces its official stand on the much-anticipated India vs Pakistan cricket match.
esakal
BCCI Clears Stand on India vs Pakistan Match: आशिया कप २०२५मध्ये उद्या(रविवार) भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आमने-सामने येणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबध कमालीचे ताणले गेलेले आहेत. अशात या सामन्याला भारतामधून जोरदार विरोधही सुरू आहे. शिवाय, बीसीसीआयवरही टीका, टिप्पणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ‘आज तक’शी बोलताना उद्याच्या या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी भारतीय संघ पूर्ण उत्साहाने मैदानात उतरेल अशी आशाही व्यक्त केली.
याचबरोबर देवजीत सैकिया म्हणाले, "मला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरतील. असे करणे हे त्या घटनांना योग्य उत्तर असेल ज्या आपण जास्त लक्षात ठेवू इच्छित नाही. भारताला अशा देशासोबत खेळावे लागत आहे, ज्याच्याशी आपले चांगले संबंध नाहीत. परंतु बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. म्हणूनच आपण या सामन्यांना नकार देऊ शकत नाही."
याआधी माजी क्रीडमंत्री अनुराग ठाकूर यांनीही उद्याच्या या सामन्याबाबत प्रतिक्रिया देताना, नेमकं का हा सामना भारताला खेळावा लागत आहे, यामागचे कारण सांगितले होते. टीम इंडियाला आशिया कप किंवा विश्वचषक सारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य झाले आहे. असे न केल्यास भारताला स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला विजयी घोषित केले जाईल, त्यांना अधिकचे गुण मिळतील. मात्र भारत आणि पाकिस्तान कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.