नवी दिल्ली, ता. १२ : सध्याच्या ‘अनलॉक १’ काळात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांच्या हालचालींवर असलेले निर्बंध कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवित सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी महामार्गांवरील प्रवासी तसेच मालवाहतूक करण्यास मात्र कोणताही अडथळा नसून राज्यांनीही तो येऊ देऊ नये, असे सरकारने सांगितले आहे. लोकांचे अनावश्यक एकत्र येणे रोखले जावे आणि मालवाहतुकीवरही परिणाम होऊ नये म्हणून हा निर्बंध घालण्यामागील उद्देश असल्याचे अजय भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारने ३० मेस राज्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना जारी करत कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि मालवाहतुकीव्यतिरिक्त इतरांना बाहेर पडण्यास निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांची आठवण भल्ला यांनी राज्यांना करून दिली आहे.
बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही रात्री नऊ ते पहाटे पाच दरम्यानच्या निर्बंधांसाठी आग्रही असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, महामार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस आणि विमान, रेल्वे किंवा बसमधून उतरून आपल्या घराकडे निघालेल्यांनाही निर्बंधातून वगळण्यात आले आहे. या सूचना स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास भल्ला यांनी राज्यांना सांगितले आहे.
गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर पालनासाठी हे निर्बंध आवश्यक आहेत. परंतु जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी, मालाची चढ-उतार करण्यासाठी, बसवाहतूक, मालवाहतूक करणारी वाहने, यासह रेल्वे आणि विमान प्रवासासाठी हे निर्बंध लागू नसतील. राज्यांनीही अशा वाहतूक, प्रवासावर बंधने आणू नयेत असे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.
कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून एकाच दिवसात रुग्णसंख्यावाढीचा उच्चांक भारतात नोंदवला गेला आहे. मागील २४ तासांत तब्बल १०,९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना प्रसार वाढत असला तरी पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची राज्यांची मनस्थिती नसल्याचे सूतोवाच मिळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या १,४१,८४२ सक्रीय रुग्ण आहेत. तर १,४७,१९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ८४९८ रुग्ण कोरोनामुळे दगावले.
कोरोना संक्रमणामुळे दिल्लीतील जामा मशिद बंद करण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत जामा मशिदीत सार्वजनिक नमाजपठण बंद करण्याचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी जाहीर केले आहे. मध्य प्रदेशने पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा विचार नसल्याचे महटले असले तरी आठवड्यातील दोन दिवस (शनिवार आणि रविवार) राज्याची राजधानी भोपाळ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.