Amit Shah Devendra Fadnavis
Amit Shah Devendra Fadnavis Sakal
देश

Eknath Shinde: दिल्लीत भाजपच्या हालचाली गतिमान; करेक्ट कार्यक्रम होणार?

मंगेश वैशंपायन

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली, ता. २१ - ज्येष्ठ शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दिल्लीत भाजपच्या हालचाली गतिमान झाल्या असून भाजपने सत्तास्थापनेची तयारी म्हणून भाजपने आपल्या आमदारांनाही परराज्यांत, शक्यतो गुजरातमध्ये हलवावे अशा सूचना दिल्लीतून देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) व भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांनी दीर्घ चर्चा करून महाराष्ट्र व सूरतमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांनीही दिल्ली गाठली व शहा तसेच नड्डा यांना राज्यातील घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर दुपारी ते अहमदाबाद कडे रवाना झाले. यापूर्वीच्या पहाटेच्या शपथविधीचा कटू अनुभव गाठीशी असल्याने दिल्ली व महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने यावेळेस सावध पावले टाकण्याचे ठरविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व राजकीय घडामोडींत महाराष्ट्राच्या राजभवनाचीही भूमिका महत्वाची राहणार हे उघड आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत झालेल्या भूकंपाचे परिणाम राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही जाणवत आहेत. भाजपचे राज्यातील घटनाक्रमाकडे बारीक लक्ष आहे. शहा व नड्डा यांनी चर्चा केल्यावर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला याबाबतची माहिती देण्यात आली. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून तेथील खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्याशी शहा सातत्याने संपर्कात आहेत. गृहमंत्री शहा यांनी नड्डा यांच्याशी राज्यातील घटनाक्रमाबाबत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून नड्डा यांच्या निवासस्थानाबाहेर पडले.

राज्यातील घडामोडींवर भाजपचे बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यात सूरतमध्ये चाललेल्या चर्चेतील खडानखडा माहिती दिल्लीपर्यंत पोहोचण्याची चोख व्यवस्था करण्यात आल्याचेही समजते. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसचे अनेक नेते-आमदारही समाधानी नाही या ॲंगल' कडेही भाजप नेतृत्वाचे सूचक लक्ष आहे. शिंदे यांच्या बंडाला ठोस स्वरूप येईपर्यंत दिल्लीतून ‘वेट ॲंड वॉच' असे धोरण भाजपने ठेवले आहे.

पक्षसूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) हे मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल गेली किमान दोन वर्षे अस्वस्थ होते. याचसुमारास भाजपने त्यांच्याशी संपर्क केला व हे ‘संपर्क सूत्र' हळूहळू वाढवत नेले. राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत थांबा असा मेसेज फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर दिल्लीतून ठरविण्यात आले होते. दोन्ही निवडणुकांत भाजपला घवघवीत यश मिळाल्यावर महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस' वेगवान करण्याचा निर्णय झाला. विधान परिषदेचे मतदान काल सुरू असतानाच दिल्लीतून गुजरात मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क साधून पुढील नियोजनाची आखणी करण्यात आली व मध्यरात्री ‘ऑपरेशन महाराष्ट्र' चा पहिला अंक भाजपने नेतृत्वाने यशस्वीपणे तडीला नेला.

दरम्यान महाराष्ट्रातील प्रस्तावित सत्तास्थापनेबाबत ‘मध्य प्रदेश' पॅटर्नने जाण्याचे ढोबळमानाने ठरविल्याचे दिसते. फक्त आता शिंदे आडनावाच्या दीच्या नावात बदल होऊन ते ज्योतिरादित्य ऐवजी एकनाथ असे झाल्याचे भाजप नेते सांगतात. शिवसेनेतील बंडाळी उघड दिसत असली तरी भाजपला पूर्ण अनुकूल परिस्थिती निर्माण होईपर्यंत थांबायचे व नंतर राज्य सरकारवर अविश्वास ठराव आणून सरकारचा मोरया करायचा ही मध्य प्रदेशातील रणनीती भाजप महाराष्ट्राबाबतही वापरणार असे दिसत आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांच्या हयातीत शिवसेना सोडणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेतला‘ असे आपल्या एकेकाळच्या पक्षसहकाऱयांना सांगतानाच, शिंदे यांनी आताच निर्णय घेतला नसता तर त्यांचे ‘आनंद दिघे‘ झाले असते, असेही राणे यांनी सूचकपणे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT