नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या २३ व्या दिवशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आज बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली. सिंघू सीमेवरील नेत्यांनी मागणी केली की पंतप्रधानांनी वेगवेगळ्या ठिकाणी बोलण्याऐवजी आमच्याशी थेट चर्चा करावी व आमचे आक्षेप समजून घ्यावेत. कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेली लढाई कोणत्याही स्थितीत थांबविणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान आता आंदोलकांमधील पंजाब व हरियानातील शेतकरी नेत्यांमध्ये पडद्याआड वाद वाढत चालल्याची माहिती आहे.
या आंदोलनामुळे उत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेचे रोज किमान ३००० कोटींचे नुकसान होत असल्याचे निरीक्षण उद्योगसंस्था फिक्कीने नोंदविले आहे. आंदोलकांशी चर्चा पुन्हा सुरू होईल व या वर्षाअखेरपर्यंत ही कोंडी फुटेल अशी आशा कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी विरोधकांच्या सापळ्यात न अडकता आंदोलन शेतकऱ्यांचेच राहील याची दक्षता घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले. दुसरीकडे दिल्लीतील थंडीची लाट पाहता आंदोलकांसाठी टिकरी, सिंघू व अन्य सीमांवर अधिक तंबूंची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नेत्यांमध्ये मानापमान ?
शेतकरी आंदोलनातील सुमारे ४० संघटनांच्या नेत्यांमध्ये आता मानापमान नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे.पंजाब व हरियानातील नेत्यांचे विचार व मते बहुतांश मुद्यांवर परस्परविरोधी असतात व एखाद्या राजकीय शक्तीच्या दबावाखाली ते मंचावर एकत्र येतात असेही चित्र दिसत आहे. पंजाबातील शेतकरी नेते हे आंदोलन व निर्णय प्रक्रियेवर त्यांचाच वरचष्मा राहील याची दक्षता घेत असल्याने हरियानातील शेतकरी नाराज असल्याचे समजते. काल संध्याकाळी झालेल्या बैठकीवेळी टिकरी सीमेवरील आंदोलनकर्त्या भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनामसिंग चढूनी व अन्य नेते जोगिंदरसिंग उगराहा यांना सरकारशी पुन्हा चर्चा करणे, न्यायालयातील प्रस्तावित सुनावणीवेळी मांडायचे मुद्दे आदींबाबत इतरांना अंधारात ठेवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे चढूनी यांनी मात्र, अशा मतभेदांच्या बातम्या पसरवून आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा डाव आहे. आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही असे पत्रकारांना सांगितले.
सिनेताऱ्यांचा पाठिंबा
आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री स्वरा भास्कर आज सिंघू सीमेवर पोहोचली. त्यानंतर तिने शेतकऱ्यांबरोबरचे फोटो ट्विट करत आंदोलनाला पाठिंबा दिला. टिकरी व सिंघू सीमेवर जाऊन आंदोलनाला पाठिंबा देणारे गुरुदास मान व दिलजीत दोसांज या गायकांपाठोपाठ स्वरा प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांमध्ये पोचणारी तिसरी सेलिब्रेटी ठरली आहे. दोसांज याने तर आंदोलकांच्या व्यवस्थेसाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्याचाही घोषणा केली होती. आंदोलनस्थळी न जाता शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अभिनेता सोनू सूद तसेच अभिनेत्री प्रियांका चोपडा, सोनम कपूर, तापसी पन्नू, ऋचा व हंसल मेहता या तारेतारकांचाही समावेश आहे.
बहुगुणांचा पाठिंबा
भारतीय किसान संघटनचे नेते राकेश टिकैत व हरियाना किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश बैस यांनी, आंदोलनाचे श्रेय कोणीही घ्यावे, आमचा उद्देश शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई जारी ठेवणे व शेतकऱ्यांची एकजूट करणे हा असल्याचे सांगून आपली नाराजी दर्शविली. शेतकरी आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांनीही या कायद्यांचे समर्थन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.