Gofan Article
Gofan Article esakal
देश

गोफण | येडी कोठडीत 'अन्नाजी' प्रगटले

संतोष कानडे

स्थळः येडी कोठडी

वेळः सांजवेळ

जेलमध्ये हळूहळू अंधार दाटून येऊ लागला होता. सांजवेळच्या लगबगीला अंधाराचा अजगर गिळून टाकणार होता. आत शांतता..निरव शांतता पसरणार होती. जेल कर्मचारीही निघून गेले होते.. फक्त शिपायाच्या पावलांचा सर्रS..सर्रSS..सर् आवाज शिल्लक राहणार होता. कुठल्यातरी अडगळीच्या कोठडीतून कैद्यांच्या कुजबुजण्याचा आवाज येई. पण शिपायाने जोरदार दम दिला की तोही शांत होई. रोजचीच अशी परिस्थिती होती.

आणखी तास-दीड तासाने फक्त एक मोठं भांडं ओढत नेल्याने फरशीवर चर्रS चर्रर्रSS.. आवाज येणार होता. मग जरावेळाने ताट-वाट्यांची खळखळ होणार.. ती झाली की पुन्हा शांतता.. गडद शांतता. मग एकदा सगळे झोपी गेले की, त्या महाकाय तुरुंगात फक्त आणि फक्त अंधाराचं साम्राज्य पसरत असे.

दूरच्या कोठडीत कुणीतरी पांघुरणाच्या आत हळूच चोरट्या मार्गाने मिळवलेली तंबाखू मळीत असे. तो आवाज भयावह होऊन दुसऱ्या कोपऱ्यातल्या कोठडीतल्या कैद्यांची झोप उडवीत असे. एखाद्या हलक्या काळजाच्या कैद्याला हा आवाज सहज ऐकू जाई, त्यामुळे आतल्या आतच त्याची मग भीतीने गाळण होई.

आजचा दिवस जरा वेगळा होता. जेलमध्ये एक विशेष कैदी दाखल झाला होता. कुठल्यातरी दारुच्या घोटाळ्यात तो अडकला होता. जेलमधलं हे वातावरण बघून तो गर्भगळीत झालेला.. बाहेरच्या जगात मारलेल्या हिंमतीच्या, शौर्याच्या गप्पांचा इथे काहीही उपयोग नाही, हे त्याला कळलं होतं. त्यामुळे त्याने देवाचा धावा केला होता. त्याचं नाव होतं केसरीलाल दिल्लीवाले.

कोठडीतल्या एका कोपऱ्यात केसरीलाल दिल्लीवाले गायत्री मंत्राचं पठण करत होते. ते जवळजवळ ओरडतच होते. साधना करणाऱ्या साधूच्या अवस्थेत ते बसलेले होते. 'कोठडीमध्ये डांबलं तरीही धर्माचा जागर सुरुय', हे तमाम जनतेला कळावं हाही एक त्यामागचा सुप्त उद्देश होताच म्हणा. भीती अधिक महत्त्वकांक्षा, असा चाणाक्ष विचार घेऊन त्यांनी मंत्रोच्चार सुरु केला होता.

जेलमधल्या एकाही शिपायाने केसरीलाल यांच्या ओरडण्यावर आक्षेप घेतला नाही. कारण बाहेरच्या जगात त्यांचा मानमरातब मोठा होता. दोन मुलुखातल्या सत्तेची सूत्र हातात होती. आपल्यावर खोटा आळ घालून फसवल्याची त्यांची भावना होती. जेलबाहेर त्यांच्या निर्भिड बाण्याचं कौतुक झालं होतं. लोकांसाठी थोडीबहूत का होईना पण त्यांनी कामं केली होती.

गायत्री मंत्राचं पठण उरकत आलं होतं, आवाज खाली आला होता.. तेवढ्यात त्या निर्मनुष्य कोठडीकडे कुणीतरी चालत येतंय याची जाणीव त्यांना झाली. कोठडीच्या दाराकडे वळून बघण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. ती अडखळत-अडखळत चालणारी पावलं दाराच्या अगदीच जवळ आली. धीर करुन खालच्या मानेनं केसरीलाल बारीक नजरेने बघू लागले.

पायात काळं चकचकीत पायताण, शुभ्र धोतर.. धोतराचं पान डाव्यात हातात धरलेलं. धोतरावर कडक खादीचा पांढरा कुर्ता.. आणि डोक्यावर तेवढीच कडक टोपी. चेहऱ्यावर निर्मळ हास्य अन् उजव्या हाताचं बोट चक्रधारी श्रीकृष्णासारखं सरळ. हे रुप बघून साक्षात देव भेटल्याचा आनंद केसरीलाल यांना झाला.

केसरीलाल दिल्लीवाले यांच्या तोंडून आपसूक शब्द फुटले, ''अन्नाजी अनशनवाले! अन्नाजी आप? कहाँ थे इतने दिन? आपकी याद हमेशाही सताती रही अन्नाजी'' असं म्हणून त्यांनी अन्नाजींचे पाय धरले. ''जय हो अन्नाजी की.. जय हो अन्नाजी की!'' असा जयघोष सुरु केला.

'अन्नाजी अनशनवाले' मात्र शांतपणे हसत होते. त्यांनी केसरीलाल यांना उठवलं.. ''उठ मेरे लाल उठ.. क्यों रोता हैं''

''अन्नाजी मैंने कुछभी नहीं किया.. फिर भी-''

मध्येच 'अन्नाजी' बोलले- ''कुछ कैसे नहीं किया.. मैंने क्या सिखाया था और तुमने क्या किया? मैं सब जानता हूं.. मैं अंतरयामी हूँ''

केसरीलाल बोलले, ''हां अन्नाजी आप महान हो.. लेकीन जो लोग पिते हैं उनके लिए-''

''चूप हो जाओ लाल.. हम पिने वालों के खिलाफ में हैं! तुम भी ऐसेही हमारे साथ काम करते थे.. करते थे ना? अब नीतीयाँ बनाने लगे हो..''

'अन्नाजींच्या' या रोषापुढे केसरीलाल यांचं आवसन गळून गेलं. तरीही त्यांनी धीर एकवटून मुद्दा मांडलाच-

''अन्नाजी राज्य चलाने के लिए सबको देखना पडता हैं.. नीतीयाँ नहीं बनायी तो सब गडबड हो जाएगा. लेकीन उसमें हमने किसीसे भी पैसा नहीं लिया ''

'अन्नाजी अनशनवाले' चिडलेलेच होते- ''पैसे की बात नहीं हैं लाल.. बात शराब कि हैं. शराब बंद करणे के बजाय उसके लिए नीतीया बनाने लगे? तुमको कुछ लाज वगैरे है क्या नहीं?''

''माफ करो अन्नाजी माफ करो.. गलती हो गई. अपने लाल को बचाओ अन्नाजी.. बचाओ'' केसरीलाल ओरडायलाच लागले होते. ''जय हो अन्नाजी की जय होSS''

'अन्नाजी' एकच वाक्य बोलले अन् गडप झाले- ''अब भोगो अपने कर्मो का फल''

''नहीं..नहीं.. नहीं.SS अन्नाजी ऐसा मत करो. अपने लाडले लाल को बचाओ अन्नाजी.. बचाओ-बचाओ-बचाओ'' मोठमोठ्याने ओरडा सुरु होता.

''अन्नाजी की जय हो.. बचाओ..अन्नाजी की जय हो.. बचाओ.. नहीं-नही.. मुझे छोडो. अन्नाजी-अन्नाजीSS''

ध्यानमुद्रेत बसून ओरडणाऱ्या केसरीलाल यांना दोन-चार शिपयांनी यांना गदागदा हलवून जागं केलं. 'आत्ता तर गायत्री मंत्र म्हणत होते, मध्येच अन्नाजी..अन्नाजी-बचाओSS' हे काय लावलंय. असं म्हणून शिपायांनी त्यांना नीट जागं केलं आणि पुढ्यात जेवणाची ताटली ठेवून निघून गेले...

समाप्त

Santosh Kanade

santosh.kanade@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT