Fire engulfs homes in a Himachal Pradesh village near Kullu — emergency teams battle the raging blaze as residents watch helplessly.
esakal
Himachal Pradesh fire tragedy : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील एका गावात आज (सोमवार) दुपारी भीषण आग लागली. जिल्ह्यातील तीर्थंकर खोऱ्यातील झनियार गावात नोहांडा येथे हे भीषण अग्नितांडव घडलं. सुरुवातीला ही आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थांकडून प्रयत्न झाला, परंतु पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केलं आणि मग ती जवळपास संपूर्ण गावातच पसरली.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, १६ घरं, जनावरांचे चार गोठे आणि दोन मंदिरं या भीषण आगीत जळून खाक झाली आहेत. गावात अवघी चार ते पाच घरे उरली आहेत आणि ही उर्वरित घरं आगीत सापडलेल्या घरांपासून काही अंतरावर होती, त्यामुळे ती वाचल्याचे समोर आले आहे.
हे गाव दुर्गम डोंगराळ भागात असून येथील घरं ही मोठ्याप्रमाणात लाकडी असल्याने आग संपूर्ण गावात पसरल्याचे समोर येत आहे. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ग्रामस्थांच्या घरांचे, जनावरांचे गोठ्याचे नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे.
गावात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या, मात्र या गावाकडे जाण्यास नीट रस्ता नसल्या या गाड्या मध्येच अडकल्या होत्या. यानंतर मग अग्निशामक दलाचे कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीसाठी पायीच रवाना झाले, तोपर्यंत ग्रामस्थांनी जीवाच्या आकांताने आपली घरी वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रचंड नुकसान झालेलं होतं.