सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या मोठ्या देशात आज जी लोकशाही (Democracy) व्यवस्था आहे, ती निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी, राज्यकर्त्यांनी आणि स्वतंत्र भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार तर दिला, मात्र ती लोकशाही अंमलात आणण्यासाठी मतदान प्रक्रिया घडवून आणण्याचं एक मोठं आव्हान होतं. मतदारांच्या (Voters) नावाची नोंदणी करणे, मतदार संघ तयार करणे, उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेणे या आणि असंख्य गोष्टी करणं म्हणजे निवडणूक आयोगासाठी (Election Commission of India) मोठं आव्हान असतं. आज तंत्रज्ञानाची मोठी मदत असताना देखील निवडणूक प्रक्रिया आव्हानात्मकच आहे. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का, की स्वातंत्र्य भारतातील पहिली निवडणूक (First Loksabha Elections of India) कशी पार पडली असेल. या ऐतिहासिक निवडणुकीची कथा मोठी रंजक आहे.
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर 1951 साली पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काय परिस्थिती असेल? लोकांनी मतदान कसं केलं असेल? त्या काळात भारतात वातावरण कसं असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या ऐतिहासिक गोष्टी निदर्शनास येतात. मागच्या काही वर्षांत निवडणुकीचं चित्र आणि प्रचाराची पद्धत मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. ज्या ठिकाणी पूर्वी मतदान पेटीत मतं टाकली जायची, त्यांची जागा आता मतदान यंत्राने (EVM) घेतली आहे. मात्र पहिल्या निवडणुकीत दुर्गम भागात निवडणुका घेणं फार जिकरीचं काम होतं.
25 ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 या कालावधीत निवडणुका झाल्या. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या 53 राजकीय पक्षांनी निवडणूक लढवली होती. देशभरात 1874 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 489 लोकसभा मतदार संघात ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी 18 वयोमर्यादा जास्त होती. आज १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, मात्र त्यावेळी ही वयोमर्यादा 21 पर्यंत होती. त्यानुसार 36 कोटी लोकसंख्येपैकी 17.32 लोक मतदानासाठी पात्र ठरले होते. तर त्यापैकी ४५ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
देशात ही निवडणून घेताना निवडणूक आयोगासमोर शेकडो आव्हानं होती. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. अनेक भागांत लोकांचा राजेशाहीवर विश्वास होता. मोठ्या प्रमाणात निरक्षरता होती. महिलांना समाजात फारसं स्थान नसल्यानं, त्यांना या सर्व गोष्टींमध्ये सहभागी करून घेणं कठीण होतं. मतदारसंघांच्या सीमारेषा आखणं, मतदार याद्या किंवा मतदानासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांची यादी तयार करणं अशा अनेक पातळ्यांवर निवडणूक आयोगाला काम करावं लागलं होतं. पहिल्या मतदार यादीसाठी जी माहिती गोळा करण्यात आली होती, त्यामध्ये जवळपास ४० लाख महिला मतदारांची नावं यादीत नसल्याचे आढळून आलं होतं. म्हणजे आमक्याची पत्नी, आमक्याची बहीण... असा उल्लेख मतदार यादीत होता. निवडणूक आयोगानं या नोंदी स्वीकारण्यास नकार दिला आणि पुन्हा माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुकांचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. यापुर्वी फक्त युरोप आणि उत्तर अमेरिकेत असा प्रयत्न झाला होता, मात्र त्याठिकाणी प्रत्येकजण साक्षर होता. युरोपमध्येही बहुतांश देशांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला नव्हता. सर्वच प्रौढ मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा भारताचा हा प्रयोग धाडसी आणि धोकादायक वाटत होता. मात्र भारताच्या या प्रयोगानं टीकाकारांना चुकीचं ठरवलं. लोकांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अर्ध्याहून अधिक पात्र मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे 1952 च्या भारतातील सार्वत्रिक निवडणुका जगभरातील लोकशाहीच्या इतिहासात ऐतिहासिक ठरल्या.
देशात होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीची जबाबदारी पेलण्यासाठी तेवढ्याच ताकदीच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची गरज होती. नेहरुंनी ही जबाबदारी सुकूमार सेन यांच्यावर सोपवली होती. प्रसिद्ध विधिज्ञ आणि तत्कालीन माजी केंद्रीय कायदा मंत्री अशोककुमार सेन यांचे जेष्ठ बंधू असलेले सुकुमार सेन हे एक कार्यक्षम सनदी अधिकारी होते. त्यांनी आपलं पदवी नंतरचं सर्व शिक्षण विदेशात घेतलं होतं. भारतात आल्यानंतर ते जिल्हाधिकारी झाले, त्यानंतर त्यांना पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यावर थेट मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी सोपावण्यात आली.
पहिली निवडणूक घेण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. आपल्या कामाचा अनुभव, विदेशातील निवडणुका आणि देशातील परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी निवडणुकांच्या नियोजनाला सुरुवात केली. यावेळी देशातील वेगवेगळ्या भागांत असलेली भौगोलिक परिस्थिती, मतपेटयांचं नियोजन, त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलं. त्यामध्ये त्यांनी अनेक आयएएस अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची पहिली निवडणून यशस्वीरित्या पार पाडली.
मॉक इलेक्शनही घेतले होते...
भारतात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या, तेव्हा अनेकांना बहुतांश लोकांना प्रक्रियाच माहिती नव्हती. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये लोकांसाठी मॉक इलेक्शनही घेण्यात आले होते. या माध्यमातून निवडणुका कशा होतात आणि मतदान कसं करायचं याचा डेमो आधी लोकांना देण्यात आला होता.
निवडणूक कोणी जिंकली?
ही निवडणूक इंडियन नॅशनल काँग्रेसनं जिंकली होती. निवडणुकीनंतर जवाहरलाल नेहरू हे पहिले निवडून आलेले पंतप्रधान झाले. काँग्रेसला त्यावेळच्या इतर मोठ्या पक्षांच्या तुलनेत चौपट मतं मिळाली होती. काँग्रेसला तब्बल 364 जागांवर विजय मिळाला होता. सीपीआयला 16 जागा मिळाल्या होत्या. टक्केवारीचा विचार केल्यास ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी काँग्रेसला मतदान केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.