India and African nations are deepening strategic, economic and cultural ties amid changing global political and economic dynamics.
Sakal
Indo-Africa Summit : आज जागतिक राजकारण आणि अर्थकारण वेगाने बदलत आहे. पण या बदलत्या समिकरणांमध्येही भारत आणि आफ्रिका खंडातील 54 देशांचे संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. अनेकदा आंतरराष्ट्रीय संबंधांकडे फक्त 'व्यापारी देवाण-घेवाण' किंवा 'नफा-तोटा' या दृष्टीने पाहिले जाते. परंतु, भारत आणि आफ्रिकेचे नाते केवळ 'देवाण-घेवाण' किंवा तात्पुरत्या व्यापाराचे नाही. या संबंधांना शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा, समान संघर्षाची पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक धागे आहेत. एकेकाळी वसाहतवादाविरुद्ध खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोन भूप्रदेश आज जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी -
प्राचीन काळापासून भारत आणि पूर्व आफ्रिकेमध्ये सागरी व्यापार चालत आला आहे. भारतातील रेशमी कापड, मसाले आफ्रिकेत जात असत, तर आफ्रिकेतून मौल्यवान वस्तू भारतात येत असत. भारत आणि आफ्रिकेतील हजारो वर्षांच्या संबंधाच्या इतिहासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंनी कधीही एकमेकांवर आक्रमणे केली नाहीत किंवा साम्राज्यविस्ताराचा प्रयत्न केला नाही. हाच शांततापूर्ण वारसा आजच्या आधुनिक मुत्सद्देगिरीचा पाया ठरला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे 19 व्या आणि 20 व्या शतकात भारत आणि बहुतांश आफ्रिकन देश ब्रिटन किंवा इतर युरोपीय सत्तांचे गुलाम होते. या समान इतिहासाने दोन्ही संस्कृतींना जवळ आणले. महात्मा गांधी यांच्यामुळेही आफ्रिकेसोबत भारताचे एक भावनिक नाते आहे. गांधीजींनी त्यांच्या सत्याग्रहाची पहिली प्रयोगशाळा दक्षिण आफ्रिकेत तयार केली. गांधीजींचे विचार आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिका), क्वामे न्क्रुमा (घाना) आणि जोमो केन्याटा (केनिया) यांसारख्या आफ्रिकन नेत्यांना प्रेरित केले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताने आफ्रिकेची साथ सोडली नाही. जोपर्यंत संपूर्ण आफ्रिका खंड गुलामगिरीतून मुक्त होत नाही, तोपर्यंत भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे, अशी भूमिका तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सातत्याने मांडत होते. आफ्रिकेतील अनेक देश स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये आफ्रिकेच्या हक्काचा आवाज उठवला. 1955 ची प्रसिद्ध 'बांडुंग परिषद' आणि त्यानंतर सुरू झालेली 'अलिप्ततावादी चळवळ' (NAM) यांमुळे भारत-आफ्रिका मैत्रीला एक भक्कम राजकीय स्वरूप मिळाले.
धोरणात्मक बदल -
1990 च्या दशकानंतर जागतिक राजकारणाने कूस बदलली. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले तर आफ्रिकेने विकासाची नवी वाट धरली. यामुळे नव्या युगातील संबंधांचे दोन्ही बाजूंनी स्वरूपही बदलले. आता भारत केवळ भावनिक मैत्रीवर भर न देता 'आर्थिक आणि धोरणात्मक' भागीदारीकडे वळला आहे. 2008 मध्ये सुरू झालेली भारत-आफ्रिका फोरम समिट भारत-आफ्रिका संबंधांतील मैलाचा दगड ठरली.
या परिषदेच्या माध्यमातून भारताने आफ्रिकेला अब्जावधी डॉलर्सची सवलतीची कर्जे दिली आहेत. भारताच्या मदतीने आफ्रिकेत रेल्वे लाईन्स, सिंचन प्रकल्प, सिमेंट कारखाने आणि वीज निर्मिती केंद्र उभी राहिली आहेत. भारताचे हे धोरण केवळ व्यापार करण्यापुरते नाही, तर आफ्रिकन देशांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे. भारताने आफ्रिकेतील 40 हून अधिक देशांमध्ये जवळपास 200 हून अधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
'ग्लोबल साऊथ'चा आवाज -
सध्याच्या काळातीस भारत-आफ्रिका धोरणात्मक संबंधांचा सर्वात सुवर्णक्षण म्हणजे भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली G20 शिखर परिषद. भारताने अत्यंत यशस्वी मुत्सद्देगिरी करून 'आफ्रिकन युनियन'ला G20 शक्तिशाली संघटनेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून दिले. या एका निर्णयामुळे जागतिक राजकारणात आफ्रिकेचे वजन वाढले. यातून भारतानेही स्वतःला 'ग्लोबल साऊथ' म्हणजेच विकसनशील देशांचा पाठीराखा म्हणून सिद्ध केले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा असो, जागतिक व्यापार संघटनेचे कडक नियम असोत की हवामान बदलाचे मुद्दे असोत, भारत आणि आफ्रिका नेहमीच विकसनशील देशांचा आवाज म्हणून एकत्र उभे राहिले आहेत. भारत आणि आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेत विकसनशील देशांमधील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी घेतलेली भूमिका वाखाणण्याजोगी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाश्चात्त्य देशांच्या दबावाला तोंड देण्यासाठी ही दोन शक्तींची एकजूट अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
सुरक्षा आणि शांततेसाठी संरक्षण भागीदारी -
भारत आणि आफ्रिकेतील धोरणात्मक भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संरक्षण क्षेत्र होय. आफ्रिकेतील देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेत भारतीय जवानांचे योगदान अतुलनीय आहे. काँगो, सुदान आणि सोमालिया यांसारख्या युद्धग्रस्त भागात भारतीय सैन्याने स्थानिक नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
यासोबतच, हिंदी महासागराच्या सुरक्षेसाठी पूर्व आफ्रिकेतील मॉरिशस, सेशेल्स, मादागास्कर हे देश भारतासाठी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. भारताचे 'सागर' (SAGAR - Security and Growth for All in the Region) धोरण हे याच सागरी सुरक्षेवर आधारित आहे. 'AFINDEX' सारख्या संयुक्त सैन्य सरावांच्या माध्यमातून भारत आज आफ्रिकन देशांच्या लष्कराला आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहे. याशिवाय, हिंदी महासागरातील Maritime Piracy चा बंदोबस्त करण्यासाठी दोन्ही बाजूंचे नौदल एकत्र काम करत आहे.
थोडक्यात सांगायचे तर, भारत आणि आफ्रिका खंडाचे नाते हे केवळ कागदावरच्या करारांपुरते किंवा तात्पुरत्या आर्थिक नफ्यापुरते मर्यादित नाही. हे नाते परस्पर विश्वास, इतिहास, भूगोल आणि उज्ज्वल भविष्याच्या आकांक्षेवर टिकून आहे. 21 व्या शतकातील हा नवा धोरणात्मक अध्याय, ही भागीदारी केवळ दोन्ही देशांच्या हिताची तर आहेच, पण संपूर्ण जगामध्ये एक नवी आणि संतुलित व्यवस्था निर्माण करणारा ठरेल यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.