नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने लादलेली टाळेबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करणे आणि भिन्न निकालाची अपेक्षा करणे म्हणजे विवेकभ्रष्टता आहे, असा कोट वापरत राहुल गांधी यांनी सरकारला सुनावलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
भारतात कोरोना महामारी भयंकर रुप धारण करत असल्याचं दिसत आहे. कारण शुक्रवारी 11,455 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून हा आकडा आतापर्यंतचा एकादिवसातील सर्वाधिक आहे. यासोबतच देशाने एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत 3 लाखाचा आकडा पार केला आहे. सध्या भारतात 3 लाख 8 हजार 993 कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत 8,884 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. या आकडेवारीचा संदर्भ देत राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारने लागू केलेली टाळेबंदी पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचं गांधी म्हणाले आहे. त्यांनी एक ग्राफ शेअर केला असून यात त्यांनी भारताची स्थिती अन्य देशांच्या तुलनेत कशी बिघडत चाचली आहे हे दाखवून दिलं आहे. तसेच गेल्या चार टाळेबंदीच्या काळात कोविड-19 च्या रुग्णांची कशाप्रकारे वाढ होत गेली हेही ग्राफच्या माध्यमातून सांगितलं आहे.
सरकारने लादलेली टाळेबंदी प्रभावी ठरली नाही. टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याऐवजी उलट वाढतच गेला आहे. तरीही सरकार टाळेबंदीच्या स्वरुपात निर्बंध लादतच आहे. आता वेगळा मार्ग अवलंबण्याची गरज आहे. अपयश येत असूनही तेच मार्ग वापरणे म्हणजे वेडेपणा आहे, असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
गांधी यांनी शुक्रवारीही एक ट्विट करत सरकारला धारेवर धरले होते. भारत चुकीची शर्यत जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताचा चौथा क्रमाक आहे. भारत वेगाने पहिल्या क्रमांकाच्या दिशेने जात आहे. हे खूप भयंकर आहे, सरकारची मग्रुरी आणि अक्षमता यामुळे हे घडत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी सरकारने लादलेली टाळेबंदी आणि त्याचे आलेले परिणाम यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जगातील काही देशांनी टाळेबंदी लागू करुन कोविड-19 वर नियंत्रण मिळवले. पण भारतात तसे होताना दिसत नाही. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.