लिखित - पूजा करांडे कदम
Article: मला आठवतं की, दोन वर्षामागे मी एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. तिथे काम सुरू केलं तेव्हा तरी काही नियम अटी नव्हत्या मात्र काही महिन्यातच तिथे ड्रेसकोडची सक्ती करण्यात आली होती. ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांनी पंजाबी ड्रेस किंवा साडीच घालावी, वेस्टर्न कपडे घालू नयेत असा नियम करण्यात आला होता. मनाला ते पटायच नाही. पण नाईलाज म्हणून तसे वागावे लागायचे.
साडी, जीन्स घाला किंवा बुरखा पुरुषांच्या वाईट नजरा तर आमचे स्तन हेरतातच. मग ते गर्दीतील एखादा अनोळखी असो किंवा शेजारच्या टेबलावर बसलेला ओळखीचा कलीग. जीन्स टाईट असेल तर तिथून बरोबर आमच्या मागील शेप बघितला जातो. ऑफिसमध्ये साडी नेसून गेलो तर तीच घाणेरडी नजर आमच्या कमरेवर येते. बुरखा घाला किंवा स्कार्फने चेहरा झाकून घ्या आमच्या नजरेशी नजर भिडवायला घाबरणारे पुरुष आमच्या छातीवर आणि पाठीकडे नजर खिळवून असतात.
या सगळ्या घटना घडत असताना त्या लोकांना न जुमानता आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत. अशा घटनांना ठामपणे सामोरे जात आहोत. अशात आधी टिकली लावा तरच मुलाखत देतो हे संभाजी भिडे यांचे वक्तव्य ताजे असताना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
मराठी महिलांनी आपली संस्कृती जपावी. त्यासाठी महिला पत्रकारांनी वार्तांकन करताना साडीच घालावी. जीन्स ट्राऊजर नको, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. यावरून काही प्रश्न पडतात.
मराठी वृत्त वाहिन्यावरील मुली मराठी बोलतात. मग मराठी संस्कृती जपण्यासाठी साडी का नेसत नाहीत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना? मग मराठी संस्कृतीला शोभतील असे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींत वेस्टर्न कल्चर का आत्मसात करतोय', असं सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. मंत्रालयातून बाहेर पडताना एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. तुम्ही कपाळावर टिकली लावली नसल्यामुळे आपण उत्तर देणार नसल्याचं संभाजी भिडे म्हणाले.
२०१९ मध्ये तामिळनाडू सरकारनं महिलांनी साडी किंवा सलवार-कमीज परिधान करून कामावर यावं, असं फर्मान काढलं होतं. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या ड्रेस कोडची सर्वत्रच चर्चा होती. त्यामुळे आता इतर कोणत्याही कपड्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येता येणार नाही. भारतीय परंपरेची झलक सरकारी कार्यालयातही पाहायला मिळावी, या उद्देशानं तिथल्या सरकारनं हा फतवा काढला होता.
महिला आणि तिचे कपडे यावर आधीही अनेकदा वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध पत्रकार क्रिश्चियन अमनपौर इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांची न्यूयॉर्कमध्ये मुलाखत घेणार होत्या. पण शेवटच्या क्षणी ती मुलाखत रद्द करण्यात आली. कारण, अमनपौर यांनी हिजाब परिधान करून मुलाखत घ्यावी, असं रईसी यांना वाटत होतं. पण, अमनपौर यांनी तसं करण्यास नकार दिल्यानं शेवटी ही मुलाखत होऊ शकली नाही.
कर्नाटकातील एका महाविद्यालयात गेल्या वर्षी कॉलेज व्यवस्थापनानं मुस्लिम मुलींना हिजाब घालून वर्गात जाण्यास मनाई केली होती. 6 विद्यार्थिनींनी या निर्णयास विरोध करत हिजाबशिवाय वर्गात जाण्यास नकार दिला होता. त्यांनी न्यायालयात धाव घेतली, पण कर्नाटक उच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. अखेर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आणि आता सर्वच जण या निकालाची वाट पाहत आहेत.
मुद्दा जर केवळ संस्कृती जपण्याचा असेल तर, साडी घालणारी महिला सुस्कृत आणि जीन्स महिला संस्कृती जपत नाहीत, असा याचा अर्थ होतो. परंपरांचं पालन आणि पोशाख या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकवेळी पोशाखाला परंपरेच्या नावाखाली खपवणं योग्य नाही.
वार्तांकन करताना काही सण समारंभ असेल तेव्हा महिला साडी, टीकली आणि पारंपारिक दागिने घालतात. तर पुरुष कुर्ता फेटाही घालतात. ते कधीतरी एक प्रेक्षक म्हणून पहायला चांगलं वाटतं. पण त्यांनी नेहमी साडीतच दिसायला हवे असे मला तरी वाटत नाही.
आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली असली तरी त्यांच्या बोलण्याने गदारोळ निर्माण झाला आहे. कपड्यांवर बोलण्यापेक्षा आधी आम्हाला स्वच्छतागृह, सुरक्षा अशा बेसिक गोष्टी मिळतात का यावर विचार करावा असे मला वाटते. कारण महिलांना मासिक पाळीचाही दर महिन्याला सामना करावा लागतो. त्या काळात अधिच दुखणे मागे असते त्यात साडी सांभाळत लांबचा पल्ला गाठायचा म्हणजे अक्षरश: जीवावर येत.
त्यामूळे केवळ संस्कृती जपण्याचा हट्ट न धरता बदलत्या काळासोबत पूढे जाण्यासाठी तिला प्रोत्साहन द्यावे. कारण शेवटी सर्व गोष्टी ‘तीला काय वाटतं’ इथेच येऊन थांबतात. आणि तीला ज्या कपड्यात आरामदायक वाटत असेल तीने ते घालावे. शेवटी तिची लाईफ, तिची स्टाईल आणि तिची चॉईस हेच महत्त्वाचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.