esakal
Vande Bharat Sleeper Train Route Details : केंद्र सरकारने देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग जाहीर केला आहे. गुरुवारी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या मार्गाची घोषणा केली. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
ही देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल, ज्याची काही दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यावेळी मार्गासोबतच वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर देखील जाहीर करण्यात आले आहे. १६ डब्यांची ही वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर किलोमीटरनुसार निश्चित केले जाईल. यामध्ये फर्स्ट एसीसाठी भाडे प्रति किलोमीटर ३.८० रुपये आकारले जाईल. तर सेकंड एसी भाडे प्रतिकिलोमीटर ३.१० रुपये आणि थर्ड एसीसाठी प्रतिकिलोमीटर भाडे २.४० रुपये असेल.
भारतीय रेल्वेने नुकतीच स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम हाय-स्पीड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी कोटा-नागदा सेक्शन दरम्यान घेण्यात आली, यावेळी ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावली. यावेळी ट्रेनमध्ये काठोकाठ पाण्याने भरलेल्या ग्लासमधून एक थेंबही पाणी पडले नसल्याचेही दिसले. ही चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली घेण्यात आली होती.
चाचणी दरम्यान, ट्रेनची गुणवत्ता, स्थिरता, ब्रेकिंग सिस्टम, आपत्कालीन ब्रेक, सुरक्षा प्रणाली आणि इतर तांत्रिक बाबींची चाचणी घेण्यात आली. सर्व चाचण्यांमध्ये ट्रेनची कामगिरी पूर्णपणे समाधानकारक असल्याचे आढळून आले आणि सीआरएसने चाचणी यशस्वी झाल्याचे घोषित केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या हाय-स्पीड ट्रायलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
याशिवाय, रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केली की सहा महिन्यांत आठ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होतील. तर वर्षाच्या अखेरीस बारा नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील. अंतिम उद्घाटन ट्रेनची तारीख एक-दोन दिवसांत जाहीर केली जाईल, तर ट्रेन १५-२० दिवसांत सुरू केली जाईल.