Elvish Yadav
Elvish Yadav sakal
देश

Youtuber Elvish Yadav : रेव्ह पार्टीत सापाचे विष! यूट्यूबर एल्विश यादववर गुन्हा; पाच जणांना पकडले, नऊ जिवंत साप जप्त

सकाळ वृत्तसेवा

नोएडा - रेव्ह पार्टीत अमली पदार्थांसोबत सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्यासह सहा जणांविरुद्ध नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पाच जणांना अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच एल्विश यादव फरार झाला आहे. नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करणारा एल्विश यादव हा पार्टीत परदेशातील मुलींना आणण्याबरोबरच अमली पदार्थांत सापाचे विष मिसळायचा. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाच जणांकडून नऊ विषारी साप जप्त केले आहेत.

नोएडाच्या सेक्टर-९५ मध्ये प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘पीपल्स फॉर अनिमल्स’ या संघटनेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. खासदार मेनका गांधी या संघटनेशी संबंधित आहेत. नोएडा-५१ येथील बॅक्वेंट हॉलमध्ये पार्टी करणे आणि सापाचे विष उपलब्ध करून दिल्याप्रकरणी राहुल (वय ३२), टीटूनाथ (वय ४५), जयकरण (वय ५०) , नारायण (वय ५०) आणि रविनाथ (वय ४५) (सर्व रा. मोहरबंद) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी एल्विश यादव हा फरार आहे.

नोएडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीएफए संघटनेत प्राणी कल्याण विभागाचे अधिकारी गौरव गुप्ता यांना सापाच्या विषाचा नशेसाठी वापर केला जात असल्याची माहिती मिळाली. यूट्यूबर एल्विश यादव हा सापाचे विष आणि जिवंत सापांबरोबर नोएडातील फार्म हाऊसमध्ये व्हिडिओचे चित्रीकरण करतो, असे त्यांना समजले. तसेच तो बेकायदापणे रेव्ह पार्टीचेही आयोजन करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यात परदेशातील मुली सापाचे विष आणि अमली पदार्थाचे सेवन करतात.

त्यामुळे पीएफए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका खबऱ्याच्या मदतीने एल्विश यादवशी संपर्क केला आणि एक रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यास सांगितले. तेव्हा एल्विशने एका एजंटाचा नंबर दिला त्याला माझा संदर्भ सांगा असे सांगितले. यानुसार एल्विश आणि त्याची टोळी ही पुरती जाळ्यात अडकली. संघटनेने एल्विशच्या एजंटामार्फत रेव्ह पार्टीचे आयोजन केले. तेथे एजंट हा आपल्या साथीदारासह नोएड सेक्टर ५१ मधील एका बॅक्वेंट हॉलमध्ये पोचले होते. मात्र सापळा रचलेल्या नोएडा पोलिस आणि वनविभागाच्या पथकाने त्यांना तात्काळ पकडले. आरोपींकडून नऊ विषारी साप आणि बाटलीत २० एमएल विष जप्त केले.

एल्विश यादवने फेटाळले आरोप

बिग बॉस ओटीटी सिझन-२ चा विजेता झाल्यानंतर चर्चेत आलेला एल्विश यादव याने आरोप फेटाळले आहेत. इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले, ‘‘ आज सकाळी झोपेतून जागे झालो असता माझ्याविरुद्ध कशा रितीने बातम्या पसरविल्या जात होत्या, ते पाहिले. एल्विश यादव अमली पदार्थासह पकडला गेला. त्याला अटक झाली,

अशा प्रकारचे वृत्त आपण पाहिले. या सर्व गोष्टी माझ्याविरुद्ध पसरविल्या जात आहेत, माझ्याविरुद्ध आरोप केले जात आहे, ते बिनबुडाचे आहेत. सर्व खोटे आहे. यात एक टक्के देखील सत्यता नाही. आपण उत्तर प्रदेश पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहोत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करू इच्छित आहे की, या प्रकरणात माझा ०.१ टक्के जरी सहभाग असेल तर सर्व जबाबदारी घेण्यास आपण तयार आहोत.’’

रेव्ह पार्टीत अमली पदार्थाचा वापर

रेव्ह पार्टीत कोकेनव्यतिरिक्त ‘एमडीएमए’ चा नशेसाठी वापर केला जातो. यात मेफेड्रोन किंवा पार्टीच्या भाषेत म्याऊ म्याऊ या नावाने बोलतात. हा अमली पदार्थ मेंदूला पूर्णपणे सून्न करतो. साप, पाल, विंचू यांच्यातून अधिक गुंगी आणणारे द्रव्य तयार केले जाते. रेव्ह पार्टीसाठी कोब्रा आणि दुसऱ्या प्रजातीच्या सापांचे विष गोळा केले जाते. हे विष मुले-मुली हे शरीरावर वापरतात. याशिवाय विंचू व पाल यांचा देखील गुंगीसाठी वापर केला जातो. त्यांना मारत पेयात त्याचे मिश्रण केले जाते. या पार्टीत प्रवेशासाठी लाखभर रुपयेही घेतले जातात.

आम्ही असेही ऐकले की एल्विश हा अनेक दिवसांपासून साप घेऊन फिरत होता व तो रेव्ह पार्टीचे आयोजन करतो. यात तो कोब्रा, अजगरची विक्री करून त्यातून काढलेले विषही विकतो. कोणाकडे अशी माहिती असेल तर आम्हाला सांगा. आम्ही आणखी काही लोकांना पकडून देऊ. आमच्या टीमने यूट्यूबवर हे पाहिले व सापळा रचत त्याला पकडून दिले.

मेनका गांधी, खासदार, भाजप

गणपती पूजनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या एल्विश यादवला ‘वर्षा’ या बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते. आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे ‘वर्षा’वर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार.

विजय वडेट्टीवार, आमदार काँग्रेस

यूट्यूबवर एल्विश यादवला हरियानाचे मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावरून प्रोत्साहन देतात. एकीकडे साक्षी मलिक, बजरंग पुनियासारख्या खेळाडूंना काठ्या खाव्या लागतात आणि दुसरीकडे हरियाना सरकार अशा लोकांना प्रमोट करते. मतांसाठी नेते काहीही करतात.

स्वाती मालिवाल, अध्यक्ष दिल्ली महिला आयोग

पोलिसांच्या कारवाईत पाच कोब्रा, दोन मांडूळ, एक अजगर आणि एक धामण हस्तगत केले असून हे प्राणी लुप्तप्राय श्रेणीत येतात. वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार दाखल केलेले गुन्हे कठोर असून ते अजामीनपात्र आहेत. या प्रकरणी त्यांना सात वर्षाची शिक्षा होऊ शकते. आरोपीकडून जप्त केलेले सापाचे विष आणि त्याची गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

प्रमोद कुमार श्रीवास्तव, विभागीय वन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT