Sudan Gold Sakal
ग्लोबल

Sudan Gold: सुदानमध्ये KGF राडा! सोन्याच्या खाणीसाठी रक्तरंजीत संघर्ष; आतापर्यंत...

सोन्याच्या खाणीचा ताबा मिळवण्यासाठी KGF चित्रपटापेक्षाही भयंकर रक्तरंजित संघर्ष आहे सुदानचा

राहुल शेळके

Sudan Gold Crisis: पश्चिम सुदानमधील दारफूर हे ठिकाण सोन्याची खान म्हणून ओळखले जाते. येथील सोने मिळवण्यासाठी टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणावर होते. आदिवासी सरदार, जमीनदार, परकीय शक्तींचा डोळा या सोन्याच्या खाणीवर आहे. सोने काबीज करण्यासाठी मोठा रक्तपात झाला आहे.

सुदानमधील अलीकडच्या युद्धात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 1500 लोक जखमी झाले आहेत. सुदानच्या 40,000 सोन्याच्या खाणींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कारण लोकशाही प्रक्रियेपासून दूर असलेल्या या देशात खाणीतून काढलेले सोने आणि त्यातून मिळणारा डॉलर हेच सुदानमधील सत्ता संतुलन ठरवते.

ज्याच्याकडे जितके सोने तितका तो अधिक शक्तिशाली. कारण तो डॉलरच्या जोरावर अधिक शस्त्रे खरेदी करू शकतो, खासगी लष्कर बनवू शकतो आणि देशाच्या सत्तेसाठी आपला दावा मांडू शकतो.

सुदान हा ईशान्य आफ्रिकेतील एक देश आहे. हा आफ्रिका आणि अरब जगतातील सर्वात मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुदान हा जगातील दहाव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वात लांब नदी नाईल या देशाला पूर्व आणि पश्चिम भागात विभागते.

सुदानमधील सोने शोधणारे कर्मचारी

सुदानमध्ये किती सोने आहे?

सुदानमध्ये अशी 40,000 ठिकाणे आहेत जिथे देशातील 13 प्रांतांमध्ये 60 सोने शुद्धीकरण कंपन्या आहेत, त्यापैकी 15 कंपन्या फक्त दक्षिण कोर्दोफ़ानमध्ये आहेत. जरी सुदानच्या बहुतेक सोन्याच्या खाणी अद्याप पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत.

जगाच्या सोन्याच्या बाजारपेठेत सुदानचा वाटा दरवर्षी 90 टन इतका आहे. सुदान हा जगातील 10 वा सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. संपूर्ण आफ्रिकन खंडात सुदानमध्ये सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे.

बीबीसीच्या अहवालानुसार, जर आपण सुदानच्या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर केवळ 2022 मध्ये सुदानने 41.8 टन सोन्याच्या निर्यातीतून सुमारे 2.5 अब्ज डॉलर कमावले आहेत.

Sudan Tribune.com नुसार, 2018 मध्ये सुदानमध्ये 78 टन सोन्याचे उत्पादन झाले. मात्र, सुदानमधील सोन्याच्या तस्करीमुळे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन गमवावे लागत असल्याचेही सरकारी यंत्रणांचे मत आहे.

सुदानमधील सोने शोधणारे कर्मचारी

देशाची फाळणी आणि सोन्यासाठी युद्ध :

1956 मध्ये सुदान ब्रिटनच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यानंतर सुदानला राष्ट्राचे स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, सुदानने आपल्या भूमीवर कच्च्या तेलाचा शोध लावला. कच्चे तेल हा सुदानच्या अर्थव्यवस्थेचा आधार बनला.

पण मजबूत केंद्रीय सरकार नसताना सुदानमध्ये गृहयुद्धाची परिस्थिती कायम राहिली. सुदानचे अखेर 2011 मध्ये विघटन झाले आणि दक्षिण सुदान हा वेगळा देश बनला.

परंतु दक्षिण सुदानच्या निर्मितीमुळे सुदानला कच्च्या तेलाच्या निर्यातीतून मिळणाऱ्या कमाईला मोठा धक्का बसला. सुमारे दोन तृतीयांश उत्पन्न सुदानच्या हातातून गेले. यानंतर सुदानमधील अनेक जमाती आणि सशस्त्र गट सत्ता काबीज करण्यासाठी लढू लागले.

दरम्यान, 2012 मध्ये देशाच्या उत्तर भागात असलेल्या 'जेबेल अमीर'मध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला होता. दारफूरमध्ये 10 किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या या सोन्याच्या पट्ट्याला 'जेबेल आमेर गोल्ड माईन' असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच सुदानमध्ये सोन्यासाठी संघर्ष आणखी वाढला.

सुदानमधील सध्याचे संकट हे तेथील लष्कर आणि निमलष्करी दलांमधील सत्तेसाठीच्या संघर्षासाठीचे आहे.

ही अतिशय विचित्र परिस्थिती आहे की सुदानमधील लष्कर सध्या आपल्याच देशाच्या निमलष्करी दलाच्या म्हणजेच 'रॅपिड सपोर्ट फोर्स'च्या विरोधात आहे. राजधानी खार्तूममधील जवळपास सर्वच मोक्याच्या ठिकाणी चकमकी सुरू आहेत.

सुदानमधील सत्तेच्या लढाईत दोन व्यक्ती समोरासमोर आहेत. यामध्ये एकीकडे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल बुरहान आणि दुसरीकडे रॅपिड सपोर्ट फोर्सचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डॅगलो आहेत. ज्यांना हेमदाती या नावानेही ओळखले जाते.

सुदानमधील सोन्याच्या खाणी

सत्तेच्या संघर्षात हेमदाती यांनी देशातील राजकीय पक्षांशी तडजोड करून फोर्सेस फॉर फ्रीडम अँड चेंज (FFC) नावाची संघटना स्थापन केली. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, हेमदाती आणि एफएफसी यांनी सोन्याच्या खाणीतून भरपूर पैसा कमावला.

सुदानच्या संकटावर लक्ष ठेवणारे शेविट वोल्डमायकेल यांचा हवाला देत बीबीसीने लिहिले आहे की, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या देशासाठी सोन्याच्या खाणी हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सत्तेसाठी भांडण सुरू असताना या सोन्याच्या खाणी सत्तेची केंद्रे बनल्या आहेत.

शेविट म्हणतात की जिथे लोकशाही प्रक्रिया पाळली जात नाही तिथे सत्ता हाच सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मुख्य मार्ग असतो. त्यामुळे सुदानमध्ये हिंसाचार सुरूच आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेव्हा करार झाला तेव्हा सुदानमध्ये जे काही सोने काढले जाईल ते निवडून आलेल्या सरकारला दिले जाईल, असे ठरले होते, परंतु हेमदाती यांची वाढती ताकद पाहता लष्करप्रमुख अल बुरहान यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.

सुदानमधील आर्थिक आणि राजकीय समीकरण असे आहे की लष्कर देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते तर आरएसएफ संघटना सोन्याच्या खाणी चालवते.

आरएसएफ प्रमुख हेमदाती याचे संपूर्ण कुटुंब सोन्याच्या खाणीत गुंतले आहे. त्यामुळेच हेमदाती सोन्याच्या व्यवसायावर कोणत्याही प्रकारे सैन्याचे नियंत्रण स्वीकारण्यास तयार नाहीत. अशी सुदानमधील सध्याची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Fake Farmer Card: सिल्लोडमध्ये बनावट ‘फार्मर कार्ड’; योजनेच्या नावाखाली केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Satara Crime: 'दहिवडीनजीक एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला'; जखमीवर उपचार सुरू, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

Doha ISSF World Cup 2025: नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र; दोहा येथे डिसेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT