थोडक्यात:
बदलत्या जीवनशैलीमुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
वेळीच निदान व उपचार न केल्यास फॅटी लिव्हर सिरोसिस व लिव्हर कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतो.
कोणताही विलंब न करता लक्षणे ओळखून उपचार करणे हे यकृताच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
Non-Alcoholic Fatty Liver Disease and Cancer Risk: बदलत्या जीवनशैलीबरोबरच सध्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे (NAFLD) प्रमाण वाढत आहे. वेळीच उपचार न केल्यास ते लिव्हर सिरोसिस आणि अगदी लिव्हर कॅन्सरमध्ये देखील विकसित होऊ शकते. फॅटी लिव्हरसारख्या समस्येवर कोणताही विलंब न करता व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यामागची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेतल्यास एखाद्याचा अमूल्य जीव वाचविता येतो.
सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये यकृताच्या समस्या हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. ती समस्या गंभीर होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजकाल सर्वात सामान्य यकृताच्या आजारांपैकी एक म्हणजे फॅटी लिव्हर; दारु न पिणाऱ्या लोकांमध्येही ही समस्या सामान्यतः आढळून येते. सुरुवातीला चटकन समजून न येणाऱ्या फॅटी लिव्हरमुळे कालांतराने गंभीर गुंतागुंत होऊ शकते, ज्यामध्ये लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा समावेश आहे. म्हणून वेळीच लक्षणे ओळखून त्यानुसार उपचार केल्यास नक्कीच फायदेशीर ठरते.
फॅटी लिव्हर डिसीज तेव्हा होतो जेव्हा यकृतात जास्त चरबी जमा होते. फॅटी लिव्हरचे अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) असे दोन प्रकार आहेत. म्हणून, आजकाल चूकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज अधिक सामान्यपणे आढळून येते. त्याच्या कारणांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, बैठी जीवनशैली, तेलकट आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन आणि काही ठराविक औषधांचे सेवन असू शकते.
त्याची लक्षणे म्हणजे थकवा किंवा उजव्या बाजूस ओटीपोटात वरच्या भागात होणाऱ्या सौम्य वेदना किंवा जडपणा, भूक न लागणे आणि वजन कमी होणे. या आजाराच्या गुंतागुंतींमध्ये यकृताचा दाह (स्टीटोहेपेटायटीस), फायब्रोसिस (चट्टे), सिरोसिस (यकृताचे प्रगत नुकसान) आणि शेवटी यकृत निकामी होणे किंवा यकृताच्या कर्करोगाचा समावेश आहे.
यकृताचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा यकृतामध्ये असामान्य पेशी या अनियंत्रितपणे वाढतात. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा. तो यकृतातून सुरू होऊ शकतो किंवा शरीराच्या इतर भागांमधून पसरू शकतो. कारणांमध्ये क्रॉनिक हेपेटायटीस बी किंवा सी संसर्ग, सिरोसिस, उपचार न केलेले फॅटी लिव्हर डिसीज, अल्कोहोलचा गैरवापर, दीर्घकालीन यकृताचे नुकसान आणि अफलाटॉक्सिन सारख्या विषारी पदार्थांचा संपर्क यांचा समावेश आहे.
पोटाच्या उजव्या बाजूस वरच्या भागात वेदना, वजन कमी होणे, पोटात सूज येणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ), भूक न लागणे आणि थोडे जेवण केल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच उपचार न केल्यास, यकृताचा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरू शकतो, अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा यकृत निकामी होऊ शकतो. नंतरच्या टप्प्यात उपचार करणे अधिक कठीण होते. म्हणून, यकृताच्या आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आणि वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष केल्यास तो लिव्हर सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगात विकसित होऊ शकतो. फॅटी लिव्हर यकृतामध्ये दीर्घकालीन दाह निर्माण करतो, ज्यामुळे कालांतराने जखमा (फायब्रोसिस) आणि सिरोसिस होतात. या सततच्या यकृताच्या होणाऱ्या नुकसानीमुळे असामान्य पेशींच्या वाढीचा धोका वाढतो, ज्यामुळे यकृताचा कर्करोग होतो. यकृताला जितक्या जास्त काळ सूज असते आणि यकृताचे कार्य बिघडते तेव्हा यकृताच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
यकृताचे संरक्षण करण्यासाठी आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर टाळण्यासाठी महत्वाचे उपाय: वजन नियंत्रित राखण्याची खात्री करा, ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी भरलेला संतुलित आहार घ्या, जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा, धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन सोडा, मधुमेह, लठ्ठपणा किंवा यकृताच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास वेळोवेळी यकृत तपासणी करा. फॅटी लिव्हर असण्याचे सध्या कोणतेही तात्काळ परिणाम नसले तरी, दीर्घकाळात ते गुंतागुंत निर्माण करू शकते. जीवनशैलीतील बदल आणि नियमित आरोग्य तपासणी यकृताच्या कर्करोगापासून बचाव करण्यास आणि तुमच्या यकृताचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
- डॉ. अमीत मंडोत, संचालक - हेपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट - मेडिसिन विभाग, ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स, परळ, मुंबई.
फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय असतं? (What exactly is fatty liver?)
फॅटी लिव्हर ही अशी स्थिती आहे जिथे यकृतामध्ये चरबीचा साठा सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात होतो. हे अल्कोहोल घेत नसलेल्या लोकांमध्येही आढळू शकते आणि त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) म्हणतात.
फॅटी लिव्हरमुळे लिव्हर कॅन्सरचा धोका कसा वाढतो? (How does fatty liver increase the risk of liver cancer?)
फॅटी लिव्हरमुळे यकृतात सूज येते, जी दीर्घकाळ राहिल्यास फायब्रोसिस, सिरोसिस आणि शेवटी असामान्य पेशी वाढून कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
फॅटी लिव्हर टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? (What precautions can help prevent fatty liver?)
संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे, आणि वेळोवेळी यकृताची तपासणी करणे ही महत्त्वाची काळजी आहे.
लिव्हर कॅन्सरची लक्षणं कोणती असतात? (What are the symptoms of liver cancer?)
पोटाच्या उजव्या भागात वेदना, वजन कमी होणे, पोट फुगणे, त्वचा व डोळ्यांना पिवळसरपणा (कावीळ), थकवा, भूक मंदावणे व लवकर पोट भरल्यासारखे वाटणे ही लक्षणं असू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.