जळगाव : दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहारासह इतर आरोपांखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने (एटीएस) देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत. जळगावातून ताब्यात घेतलेल्या अब्दुल हद्दी अब्दुल रऊफ याला त्याच्या इतर तीन साथीदारांसह औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना १० दिवसांच्या पोलिस कोठडीत रवाना केले आहे. (10 days remand for 4 under charges of Terror Funding Latest Jalgaon News)
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अकोला एटीएसला मूळ जालना येथील रहिवासी अब्दुल हद्दी अब्दुल रऊफ या ट्रक चालकाला अटक करण्याची सूचना केली होती. अकोला एटीएसने जळगावच्या मेहरुण शिवारातून संशयिताला अटक करून त्याला औरंगाबाद येथे नेण्यात येऊन तेथील स्वतंत्र पथकाच्या स्वाधीन करण्यात आले.
या पथकाने अगोदरच औरंगाबाद येथून इतर तीन संशयित शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. मक्का मशिदीजवळ, किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलिल (२८, रा. प्लॉट. क्र. ९५, नॅशनल कॉलनी, रोजाबाग, सध्या रा. महेमूदपुरा, रोजाबाग), परवेझ खान मुजम्मील खान (२९, रा. खासगेट, जुना बायजीपुरा, जिन्सी) यांना अटक करून ठेवली होती.
अटकेतील चारही संशयित पीएफआयमध्ये सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. चौघे संशयित आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना एकूण दहा दिवसांची (२ ऑक्टोबरपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.
या शिवाय पाचव्या संशयिताला बाहेर जिल्ह्यातून २३ सप्टेंबर रोजी अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यांनी काळाचौकी मुंबई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यानंतर ही कारवाई झाली.
संशयितांच्या घरात हस्तलिखित
२०२१-२२ या वर्षभरात एटीएसची आरोपींवर करडी नजर होती. दरम्यान संघटनेने घेतलेल्या सभांतून देश विरोधी कट रचल्याचा एटीएसला संशय होता. तसेच टेरर फंडिंग, दहशतवादाच्या अनुषंगाने विविध राज्यांत संपर्क आदी आरोपाखाली चौघांना अटक केली आहे. अटकेदरम्यान संशयितांकडे संशयास्पद हस्तलिखित दस्तऐवज सापडला असून ‘जिहाद’ संदर्भातील पुस्तके असल्याच्या संशयावरून ती जप्त करण्यात आली आहेत.
काय झाले न्यायालयात?
न्यायालयात युक्तिवाद करताना हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याच्या अनुषंगाने काही कट आहे का? चौघांची बॅंक खाती तपासावयाचे असून यामध्ये चौघांनी कोणाला पैसे पुरविले का, किंवा चौघांना कोणी पैसे पुरविले का, यासोबतच अशा कृत्यात आरोपींचे कोणी, किती साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती तपास अधिकारी तथा एसीपी सुनील तांबेंसह सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेचा यांनी केली.
वरिष्ठ न्यायालयात जाण्यावर आक्षेप
एटीएसकडून आरोपींना सत्र न्यायालयात हजर केले असता, आरोपींच्या वकिलांनी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी आणली नाही, मग एटीएसने आरोपींविरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) (ब) कसे काय दाखल केले असा सवाल करत हे प्रकरण कनिष्ठ म्हणजेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालविण्यात यावे असा युक्तिवाद केला.
या युक्तिवादावर सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेचा यांनी आरोपींविरोधातील आरोप हे गंभीर आहेत. संघटनेवर बंदी असो वा नसो, मात्र एखादी संस्था, संघटना अनधिकृत कृत्य करीत असेल तर कारवाई गरजेची असल्याचा युक्तिवाद केला.
चौघे संशियतात करतात काय?
अटकेतील चौघेही आरोपी पीएफआयमध्ये सक्रिय कार्यरत असून ते काही ना काही कामधंदा करून उदरनिर्वाह भागवितात. यापैकी शेख इरफान हा उर्दू शिकवणीचे वर्ग चालवितो, तर सय्यद फैजल हा अत्तर विक्रीचा व्यवसाय करतो. याशिवाय परवेज खान हा प्लास्टर ऑफ पॅरिसचे काम तर जळगावात दडून बसलेला अब्दुल हद्दी हा ट्रकचालक असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.