jalgaon municipal corporation news
jalgaon municipal corporation news esakal
जळगाव

Jalgaon Municipal Corporation : नव्या रस्त्यांची ‘अंत्ययात्रा’ काढणारी शहरद्रोही यंत्रणा!

सकाळ वृत्तसेवा

जळगावातील एकेक रस्ता गेल्या काही वर्षांत कितीदा खोदला गेला असेल, त्याची मोजदाद होणे अशक्य. अनेक वर्षांनी रस्त्यांची कामे मार्गी लागत असताना, अक्कलशून्य महापालिका प्रशासन या नव्याने जन्माला आलेल्या रस्त्यांचीही या ना त्या कारणाने जेसीबी फिरवून ‘अंत्ययात्रा’ काढतेय, हे अत्यंत संतापजनक. (article on road work done on city by jalgaon municipal corporation)

अशा स्थितीत आमदार, मंत्र्यांनी विकासासाठी निधीचा पाऊस पाडला, तरी या यंत्रणा व त्यातील शहरद्रोही घटक त्याची मातीच करणार. षंढ झालेल्या नागरिकांना नगरसेवक गृहित धरतात आणि एकमेकांच्या ‘टक्के’वारीची माहिती असल्याने नगरसेवक व महापालिका अधिकारी एकमेकांना ‘गृहित’ धरतात. परिणामी, जळगावची व्हायची ती खराबी अविरत सुरूच आहे.

नियोजन या शब्दाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेल्या महापालिका व त्याला तोडीस तोड सार्वजनिक बांधकाम विभाग, या यंत्रणांकडून जळगाव शहरातील सहा लाखांवर रहिवाशांना वेठीस धरण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

या दोन्ही यंत्रणांमध्ये काम करण्याची धमक नसल्याने त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामांचे मक्तेदारही मुजोर होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे, अन्यथा सहा-सात वर्षे उलटून गेल्यानंतरही ‘अमृत’च्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम अपूर्ण राहिलेच नसते.

या योजनांमुळे रस्ते खोदले जातील, या कारणाखाली पाच-सात वर्षे रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक रखडविण्यात आली आणि जळगावकरांना खड्ड्यात घालण्यासह सांधे-मणक्याचे रोगी बनविण्याचे काम या यंत्रणांनी इमाने इतबारे केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अजूनही त्यात बदल झालेला नाही आणि हवे त्या ठिकाणी हव्या त्या वेळेस रस्त्यावर जेसीबी फिरविण्याचे काम सुरूच आहे. आधीच अनेक वर्षे नरकयातना भोगाव्या लागल्यानंतर कुठेतरी रस्त्यांची कामे मार्गी लागताय, असे चित्र असताना आतातर नव्याने झालेल्या रस्त्यांनाही खड्ड्यात घालण्याचे षडयंत्र काही शहराचे शत्रू करताहेत.

स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका, काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी व अशा काही रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यावर तिथे महापालिकेने खोदकाम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. इच्छादेवी चौक ते डी-मार्ट या अत्यंत खड्डेयुक्त व शेतरस्त्याच्या अवस्थेलाही मागे टाकेल, अशा रस्त्याचा ‘मालक’ सापडल्यानंतर कोट्यवधींच्या निधीतून या रस्त्याचे काँक्रिटीकरण मार्गी लागले अन्‌ या रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला, पण ‘शहरद्रोही’ महापालिका यंत्रणेला चांगला रस्ता पाहण्याची सवयच राहिली नाही, म्हणून या तयार काँक्रिटच्या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे करण्याची अवदसा महापालिकेला आठवली.

भुयारी गटाराचे चेंबर काढण्याच्या नावाखाली या रस्त्याची ‘अंत्ययात्रा’ निघाली आणि कोटींचा निधी पुन्हा खड्ड्यात गेला. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर रस्त्याची निविदा होऊन, कार्यादेश देऊन, काम सुरू होण्याच्या वेळेपर्यंत महापालिका प्रशासन झोपले होते की मुर्दाड पडून होते, असा संतप्त प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत असेल, तर ते स्वाभाविकच आहे.

लोकप्रतिनिधी, शासकीय- प्रशासकीय यंत्रणा नागरिकांना गृहित धरून मनमानी करत असतील, तर आपण पुन्हा गुलामगिरीत आहोत, असे समजले पाहिजे. असेच चित्र राहिले तर जळगावचे आणखीच वाटोळे होऊन आपले श्र्वास घेणेही कठीण होईल. त्यामुळे आतातरी नागरिकांनी तयार रस्ता कुठे खोदला जात असेल, तर एकत्रित येऊन त्याबाबत जाब विचारला पाहिजे, ते काम रोखले पाहिजे. आपल्या स्वतःसाठी ही किमान गोष्ट आपण नक्कीच करू शकतो, अशी अपेक्षा आहे.

‘त्या’ पालिकेत अन्‌ शहरात यापेक्षा दुसरे काय होणार?

ज्या महापालिकेतील नगरसेवक ‘टक्केवारी’त गुंतले असतील, ज्या शहरात लोकप्रतिनिधी व्हॉट्सॲप स्टेट्‌स बदलावे तसे पक्ष व निष्ठा बदलत असतील, जिथे पत्नी महापौर आणि पती विरोधी पक्षनेता

असेल, त्या शहरात शाश्‍वत विकासाची आणि जनहिताच्या कामांची अपेक्षा कशी करणार? ‘नगरसेवक विकले जातात’, असे सांगत दर पाच वर्षांनी त्यांच्याकडूनही पैशांची अपेक्षा ठेवून मतदान करणाऱ्या नागरिकांनाही मग या स्थितीवर बोलण्याचा अधिकार उरत नाही. हो, पण या सर्व स्थितीत शहराच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रामाणिक नगरसेवक, अधिकाऱ्यांसह कुठलीही अपेक्षा न ठेवता मतदान करणारे नागरिकही नाहक भरडले जाताय, हे वास्तवही नाकारून चालणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT