Budget 2024
Budget 2024 esakal
जळगाव

Interim Budget 2024 : सत्ताधारी म्हणतात.. ‘अर्थ’पूर्ण, विरोधकांच्या मते ‘अर्थ’शून्य !

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता अंतरिम अर्थसंकल्प, लेखानुदान मांडले. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदी, बजेटच्या एकूणच धोरणाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले.

भारताचा ‘अमृतकाळ’ असा उल्लेख करत सत्ताधारी नेते कौतुक करीत आहेत, तर विरोधी गटातील नेत्यांनी त्यास ‘अर्थशून्य’ संकल्प म्हटले आहे. (Budget reaction praised by ruling leaders Opposition leaders termed it meaningless resolution jalgaon news)

मोदींच्या 'गॅरंटी'चे प्रतिबिंब

"केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाला नवीन दिशा देणाऱ्या निर्णयांचा समावेश असून यातून मोदीजींच्या गॅरंटीचे प्रतिबिंब उमटले आहेत. पंतप्रधान मोदी बोलत नाहीत तर करून दाखवितात. समाजातील सर्वस्तरातील नागरिकांसाठी आज महत्त्वाच्या तरतुदी आहेत. 'लखपती दिदी' सूर्योदय योजनेची व्याप्ती वाढविली आहे.

सौर पॅनल बसविणाऱ्यांना ३०० युनिट मोफत विजेची घोषणा क्रांतिकारी आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करला आयुष्यमान भारतचा लाभ मिळणार आहे. रेल्वे, हवाई सेवा, रस्ते, महामार्ग, कृषी, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आदी विविध क्षेत्रांत भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत." - गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

अर्थ नसलेला अर्थसंकल्प

"कोणताही अर्थ नसलेला आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मागच्या एका वर्षात काय दिवे लावले? यासाठी सादर करावयाचा आर्थिक पाहणी अहवालच देशासमोर मांडला गेला नाही. स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन तरी पूर्ण केलीय का? अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला थातुरमातूर उपाय योजना आहेत.

ना बेरोजगार तरुणांना दिलासा, ना महिलांना. उद्योग क्षेत्रालाही काहीही ठोस मिळालेले नाही. आयकर रचनेत सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार व छोटे उद्योजक, व्यावसायिक यांना दिलासा नाही. २०५ लाख कोटींच्या आंतरराष्ट्रीय कर्जाचा वाढता बोजा कसा कमी करणार? याबद्दल काहीही उल्लेख नाही. देशाला दिवाळखोरीकडे नेणारा व कोणताही अर्थ नसलेला हा अर्थसंकल्प आहे."- एकनाथ खडसे (आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस)

वास्तविक अर्थसंकल्प

"आज प्रथमच अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा वास्तविकपणे मांडल्याचे दिसले आहे. केंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर असताना कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता हा नवीन पायंडा सुरू केला ही नोंद घेण्यासारखी बाब आहे.

‘जय जवान जय किसान जय विज्ञान या सोबतच आता जय अनुसंधान!’ याचा समावेश केल्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातील संशोधनास चालना मिळणार आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रिफॉर्म, फरफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याने सर्वच क्षेत्रांचा विकास होईल असे दिसते आहे." - अशोक जैन अध्यक्ष, जैन उद्योग समूह

सर्व घटकांना न्याय दिला

"समाजातील सर्व घटकांतील नागरिकांना न्याय देणारा, भारताच्या सर्वांगीण विकासाची तरतूद अंतर्भूत असणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान शहर आवास योजनेंतर्गत २ कोटी घरे निर्मितीची तरतूद मोठा पल्ला म्हणावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या भारताच्या वाटचालीस ‘अमृतकाळ’ म्हटले आहे.

त्यादृष्टीने सर्वच क्षेत्रात देशाला पुढे नेण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात आणि पर्यायाने या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, फार्मा प्रोड्युसर कंपन्यांना प्रोत्साहन, अनुदान व अन्य योजना प्रभावी ठरतील. महिला उद्योजकांना बळ देणारे धोरणही यात आहे." - रक्षा खडसे खासदार, रावेर

शाश्‍वत विकासाचा दृष्टिकोन

"मेक इन इंडिया, स्टार्टअप यासारख्या संकल्पनांच्या माध्यमातून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्‍चर, आरोग्य, इंडस्ट्रिअल, शेतकरी, महिला वर्ग, युवापिढी घटकांच्या विकासासाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या तरतूदी मांडण्यात आल्या आहेत. देशात १५ नवी एम्च रुग्णालये तयार केली जाणार आहेत. शाश्‍वत विकासाचा दृष्टिकोन असलेला हा अर्थसंकल्प आहे." - डॉ. केतकी पाटील प्रदेश उपाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

विकसित भारताचे प्रतिबिंब

"अर्थसंकल्पात विकसित भारताचे प्रतिबिंब दिसून येते. देशात इन्फ्रास्ट्रक्‍चर वाढीस लागण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली असून संरक्षण क्षेत्रासाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

देशातील २५ कोटी जनता ही दारिद्यरेषेबाहेर आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी देशभरात विमानतळाचे जाळे उभारले जात आहे. देशात १४९ नवीन विमानतळ विकसित करण्यात आले आहे." - डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार

महिला उद्योजकांना बळ

"महिलांना उद्योग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणणारा आहे. महिलांचा उद्योग क्षेत्रात वाढता आलेख बघता मुद्रा योजनेतंर्गत आजतागायत ३० कोटी कर्ज महिला उद्योजकांना वितरित केले असल्याचे आपल्या भाषणात बोलून दाखविले.

देशात सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आता या योजनेतंर्गत देशात 3 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. विविध लघु उद्योगासाठी लागणार मार्गदर्शन प्रशिक्षण केलं जाईल." - संगीता पाटील, चेंबर ऑफ कॉमर्स, महिला उद्योजकता समिती चेअरपर्सन

सर्वसामान्यांना दिलासा

"केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारा आहे, तसेच युवकांना रोजगार देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विकास कामाचे केलेले व्हीजन पूर्ण करण्याचा या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आला." - सुरेश भोळे आमदार, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT