esakal
esakal
जळगाव

Jalgaon News : दुष्काळ जाहीर झाला; उपाययोजनांचे काय?

सुधाकर पाटील

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात दुष्काळामुळे चार वर्षांनंतर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने डोके वर काढायला सुरवात केली; तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अत्यल्प पावसामुळे खरिपावर नांगर फिरलाच, त्याबरोबर रब्बीचीही दैना झाल्याचे चित्र आहे.

मात्र, शासन दुष्काळसदृश तालुके घोषित करून मोकळे झाले. पण, उपाययोजनांचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.(drought is declared but not measures in jalgaon news)

गिरणा धरण सलग चार वर्षे १०० टक्के भरल्याने गिरणा पट्ट्यात आबादानी होती. शेतशिवार हिरवाईने नाचत होते. मात्र, यंदा पाऊस दांडीयात्रेला गेल्याने खरिपाची अक्षरश: म्हसणवटी झाली; तर रब्बीचीही राख झाल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीच्या गर्तेत सापडला. शासनाने गिरणा पट्ट्यातील तिन्ही तालुके दुष्काळाच्या यादीत घेतले. मात्र, मदत आणि प्रत्यक्ष उपाययोजनांचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

खरिपात ६० टक्के घट

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामात उत्पादनात तब्बल ६० टक्के घट झाल्याचे पाहावयास मिळाले. एकरी सरासरी १० क्विंटल येणारा कापूस तीन ते चार क्विंटल आला. मक्याचे पीक तर आलेच नाही. हे कमी की काय, नंतरही पावसाने पाठ फिरविल्याने विहिरींनी आतापासूनच तळ गाठला आहे.

पर्यायाने रब्बी हंगामही कोलमडेल. गिरणा धरणाने जेमतेम पन्नाशी गाठली. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. मात्र, रब्बीला कालव्याद्वारे एकही पाणी मिळणार नाहीये. त्यामुळे पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांना मोठा फटका बसला आहे.

व्यावसायिकांना फटका

दुष्काळाने व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे चित्र आहे. छोट्या व्यावसायिकांचे तर कंबरडेच मोडले गेले. दिवसाला दोन-चार ग्राहक आले तरी समाधान मानण्याची वेळ त्यांच्यावर आली. मोठ्या व्यावसायिकांचीही त्याहून वेगळी परीस्थिती नाही. मजुरांचा पगार, वीजबिल, दुकानाचे भाडे आदी खर्च पाहिले तर ते निघणे अवघड बनले आहे. दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने अक्षरशः ओस पडलेले असतात.

चैनीच्या वस्तू खरेदीला ‘ब्रेक’

दुष्काळामुळे हातात पैसे नसल्याने चैनीच्या वस्तू खरेदीला ‘ब्रेक’ लागला आहे. सोने खरेदी निम्म्यावर आली. इतर चैनीच्या वस्तूही खरेदी न करण्याचा लोकांचा कल दिसून येत आहे. नोकरदार वर्गाची चैनीच्या वस्तूंच्या दुकानांवर गर्दी दिसते.

पण, शेतकरी, मजूर नावालाही अशा दुकानांवर दिसत नाहीत. भडगाव बसस्थानकाजवळील एक फळविक्रेता म्हणाला, की व्यवसायात घट आहे. एक किलो फळे घेणारा अर्ध्या किलोवर आला आहे. सामान्य माणूस ग्राहक म्हणून नावालाच येतो.

कापसाच्या दराबाबत कोणी बोलेना

अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पन्नात ६० टक्के घट झाली आहे; तर दुसरीकडे जो कापूस घरात आला, त्यालाही योग्य दर मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूसकोंडी झाली. सात हजारांच्या वर भाव जायला तयार नाही.

त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. शेतकरी कापसाच्या दरामुळे एवढ्या अडचणीत असताना एकही जण या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळे आपला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे.

उपाययोजनांना मुहूर्त कधी?

शासनाने दुष्काळ जाहीर केला, मात्र त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासन गंभीर आहे का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यावर आढावा बैठका होणे अपेक्षित होते. मात्र, अजून प्रशासनाची काहीएक हालचाल दिसत नाही.

आज परिस्थिती काही प्रमाणात चांगली आहे. मात्र, डिसेंबरनंतर परिस्थिती बिकट होईल. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आजपासून सोडविणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT