politics
politics 
जळगाव

सूडाचे राजकारण.. अन् विकासाची शोकांतिका 

सचिन जोशी

‘सूडाचे राजकारण’ हे केवळ दोन शब्द... काल-परवाच्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांनीही ते वापरले.. त्यांच्यासाठी या शब्दांची आत्ताच ओळख होत असली तरी त्याचा शब्दश: अर्थ सुरेश जैन व एकनाथ खडसे या बड्या नेत्यांना चांगलाच माहीत आहे... तो त्यांनी अनुभवलाय, आजही अनुभवताय. कुणाचा दोष, कुणाचे षडयंत्र यापेक्षाही काळ अन्‌ नियतीने उगवलेला सूडच म्हणा... पण, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर वर्चस्व गाजविणाऱ्या गेल्या तीन दशकांतील प्रत्येक नेत्याला त्याचा अनुभव घ्यावा लागतोय, हे दुर्दैवीच. 

बीएचआर, वॉटरग्रेस प्रकरणात संशयाची सुई रोखल्यानंतर आता ‘मविप्र’तील कथित वादात माजी मंत्री गिरीश महाजनांवर थेट गुन्हाच दाखल होणे त्यांच्यासाठी तरी धक्कादायक आहे. स्वाभाविकच त्यांनी ॲड. विजय पाटलांचा आरोप व तीन वर्षांपूर्वीच्या घटनाक्रमाचे खंडन करून त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला. त्यासाठी महाजनांनी बड्या नेत्याचे नाव न घेता ‘सूडाच्या राजकारणा’चाही उल्लेख केला. महाजनांच्या दाव्याला विजय पाटलांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन खोडून काढले व तीन वर्षांत महाजनांच्या मदतीने आपल्यावर कसा अन्याय, अत्याचार झाला, त्याचा पाढा वाचला. ‘मविप्र’तील कथित वाद आणि त्यातून दाखल गुन्ह्याच्या तपासातून जो काय निष्कर्ष व निष्पन्न निघायचे ते कालांतराने निघेलच. परंतु, यासह बीएचआर व वॉटरग्रेस प्रकरणाने महाजनांच्या अडचणी वाढल्याचेच चित्र सध्या दिसून येत आहे. असो.
 
काळाचा महिमाग अगाध आहे. तो कुणासाठी थांबून राहत नाही. सुरेशदादांचा सुवर्णकाळ आणि घरकुल गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात त्यांना झालेल्या अटकेनंतरचा त्यांचा राजकीय अस्ताचा काळ त्यांच्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी जवळून अनुभवला... तीस वर्षांपासून राज्यात सत्ता कुणाचीही असो, जिल्ह्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या खडसेंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. केंद्रात व राज्यातही पक्ष सत्तेत असताना खडसेंच्या जीवनातील संघर्ष काही मिटला नाही, तो आज त्यांनी पक्षांतर केल्यानंतरही सुरूच आहे. 
जैन, खडसेंनंतर या रांगेत महाजनही येऊन बसलेत. फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचे उजवे हात, पक्षाचे ‘संकटमोचक’ असलेले महाजन आज बीएचआर आणि मविप्र वाद प्रकरणात संकटात आहेत, त्यांचाही यानिमित्ताने संघर्ष सुरू झाला आहे. त्यांनी या प्रकरणामागे बड्या नेत्याचा हात असल्याचे सुतोवाच केलेय, सूडाच्या राजकारणाचाही त्यांनी उल्लेख केला. पण, ज्यांची हे सूडाचे राजकारण भोगल्याची भावना आहे, त्या खडसेंनी महाजनांचा आरोप फेटाळून लावत त्यांना थेट नाव घेण्याचे आव्हान दिले. अर्थात, जवळ ठोस पुरावा असल्याशिवाय महाजन काही बोलणार नाही. कारण भाजपत असताना झालेल्या त्रासाबद्दल खडसे तत्कालीन नेतृत्व म्हणून फडणवीसांना दोष देत असले तरी त्यांनीही गेल्या पाच वर्षांत (म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून) आजपर्यंत महाजनांचे नाव कधीही घेतले नाही. 


राजकारणात कुरघोडीचा हा खेळ स्वाभाविकच म्हटला पाहिजे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसेंना जो अनुभव आला तो सूडाच्या राजकारणाचा भाग होता ही त्यांची भावना जशी त्या वेळी व आज योग्य वाटते, तशी आता महाजनांनी या प्रकरणांवरून घेतलेली भूमिका तर्कसंगत नाही, असे कुणी म्हणू शकत नाही. फरक इतकाच की, त्या वेळी खडसे जात्यात अन्‌ महाजन सुपात होते... आज महाजन जात्यात आहेत. यालाच राजकारण म्हणतात, ते सूडाचे आहे की आणखी कुठले? याबद्दल सांगता येणे शक्य असले तरी त्याच्या परिणामांबाबत सांगता येणे कठीण. पण, जळगाव जिल्ह्याचा विचार करता हे राजकारण कुठलेही असो... त्याचा नागरी हिताशी अथवा विकासाच्या चर्चेशी कुठलाही संबंध नाही, ही शोकांतिका अधिकच ठळकपणे अधोरेखित होतेय. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT