Banana Export
Banana Export 
जळगाव

भुसावळची केळी इराणला रवाना..८०० क्विंटल मालाची काढणी

चेतन चौधरी

यंदा कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये केळीची वाहतूक आणि मागणीत अडचण आल्यामुळे 'केळी' चे पीक संकटात सापडले होते.



भुसावळ : भुसावळ हे रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र आता तालुक्यातील शेती क्षेत्रातही नवनवीन प्रयोग केले जात असून, शेतकरीही प्रगत होत असल्याचे चित्र आहे. फुलगाव (ता. भुसावळ) येथील शेतकरी राजेंद्र चौधरी यांनी दर्जेदार केळीचे उत्पन्न (Banana Farmers) घेण्याची किमया साध्य केली आहे. त्यामुळे त्यांच्या केळीची निर्यातीसाठी निवड झाली आहे. त्यांच्या केळीच्या मळ्यातील पहिली गाडी थेट इराणला (Iran) निर्यात (Banana Export) झाली आहे. सदरील माल कोल्हापूर येथील व्यापारी यांच्यामार्फत मुंबईतील बंदरावरुन जहाजाद्वारे पाठविण्यात येणार आहे. भुसावळ तालुक्यातून प्रथमच विदेशात केळी निर्यात झाली असून, चौधरी यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.


कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे केळीचे दर प्रचंड खाली आले होते. अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवडी खर्च निघणेही अवघड होऊन बसले होते. पण गत चार दिवसात मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. निर्यात केळीसाठी १४०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


निर्यातीमुळे केळीला चांगला भाव

यंदा कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये केळीची वाहतूक आणि मागणीत अडचण आल्यामुळे 'केळी' चे पीक संकटात सापडले होते. ३०० ते ५०० रुपयांपर्यंत दर खाली गेले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच केळीच्या भावात सुधारणा झाली आहे. राज्यामध्ये दररोज केळीचे ट्रक भरुन परराज्यात मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहेत. तसेच परराज्यात केळीची मागणी वाढल्याने केळीच्या दरात थोडी सुधारणा झाली होती. त्यातच आता बाहेर देशात केळीची रवाना होत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांत समाधान आहे. तसेच मागणी वाढत गेल्यास केळीच्या दरातही चांगली सुधारणा होईल.


२० एकरावर केळीची लागवड
फुलगाव येथील रहिवासी असलेले राजेंद्र चौधरी यांची एकूण २० एकर शेती आहे. यात त्यांनी ८ हजार खोडं केळीची लागवड केली आहे. ते गेल्या १५ वर्षांपासून केळीची लागवड करतात. सध्या ४ एकरातील केळी काढणीयोग्य झाली असून, ती कोल्हापुरातील धरती अग्रो एक्सपोर्ट कंपनीने उचल केली असून, एक्सपोर्ट होत आहे. आत्तापर्यंत ४०० क्विंटल माल काढला गेला असून अजून ४०० क्विंटल माल येत्या चार दिवसात काढला जाणार आहे. पूर्ण हंगामात २ हजार क्विंटल माल काढला जाणार असल्याची माहिती शेतकरी राजेंद्र चौधरी यांनी दिली.


आमदार सावकारेंनी केली पाहणी

यासाठी त्यांना प्रतिखोड ४०- ५० रुपये खर्च आला आहे. सदरील केळीची गाडी मुंबईच्या बंदरावरुन प्रिकुलिंग करुन इराणसाठी रवाना होणार आहे. केळी कापणी प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी राजेंद्र चौधरी यांच्याकडे शेतात भेट दिली. याप्रसंगी फुलगाव उपसरपंच राजकुमार चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, अतुल झांबरे, संजय चौधरी, पोलन आग्रोचे अधिकारी संग्राम कुरणे, बाळू सहाने, प्रथमेश चौधरी व धरती कृषी संवर्धन कोल्हापूरचे कर्मचारी उपस्थित होते.



केळी एक्सपोर्ट करण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारात केळीला ९००-१००० रुपये भाव आहे. तर एक्सपोर्टचा भाव १४०० रुपये मिळाला आहे. अधिक शेतकऱ्यांनी केळीची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न करून उत्पादन वाढीसाठी चालना दिली पाहिजे.
- राजेंद्र चौधरी, प्रगतशील शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT