जळगाव : जळगाव शहरातील दूध फेडरेशनच्या मागील राजमालतीनगराजवळील शेतविहिरीत मृतदेह तरंगताना आढळला. दोन दिवसांपूर्वीच परिसरातील वयोवृद्ध आजीबाईने या व्यक्तीला तू.. असा राती-बेराती का भटकतो असे म्हणत हटकले आणि त्यानेच आत्महत्या केल्याचे रविवारी (ता. १६) उघडकीस आले. तेजस वसंत अंबीकार (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
राजमालतीनगराजवळील चुनीलाल माधव खडके यांचे शेत संजय गायकवाड करतात. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे संजय गायकवाड सोयाबीन व कापसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना विहिरीजवळ चपला काढलेल्या आढळल्या. विहिरीत डोकावून बघताच त्यांना मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार संधिपाल वानखेडे यांना कळविले. दोघांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठत माहिती दिली.
शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, भास्कर ठाकरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करून दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. शेतमालक चुनीलाल खडके यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.(Tired of solitude he Attend Suicide death search in Farm well Jalgaon News)
मोबाईलवरून पटली ओळख
घटनास्थळावर मृताने एका प्लॅस्टिक पिशवीत मोबाईल ठेवून तो विहिरीत लटकवलेला होता. सोबत खिशातील कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख पटविली. विहिरीजवळील मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर मृत व्यक्ती तेजस अंबीकार (रा. मुक्ताईनगर, एसएमआयटी महाविद्यालयाजवळ) असे नाव निष्पन्न होऊन त्याच्या मेहुण्याने ओळख पटविल्यावर पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
नैराश्य अन् एकांतपणा
पोलिसांनी नातेवाइकांकडून घेतलेल्या माहितीनुसार, तेजस अंबीकार याच्या कुटुंबात वृद्ध आई असून, बहिणींचे विवाह झालेले आहेत. त्याचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला होता. पत्नी सोडून गेल्याने तो प्रचंड तणावात होता. त्यात कामधंदा नसल्याने असाच भटकत असल्याची माहिती त्याच्या मेहुण्यांनी पोलिसांना सांगितली.
आजी, मी टेन्शनमध्येय!
गेल्या पाच-सहा दिवसांपासून तेजस परिसरात भटकत होता. मध्यरात्री तो असाच भटकत असताना परिसरातील आजीने त्याची चौकशी केली, ‘तू कोण आहेस, इकडे का भटकातो बेटा, राती-बेराती तुला चोर समजून कोणी मारझोड करेल. रात्री कुत्रे मागे सुटतील.’ त्यावर ‘तुला नाय माहीत आजी. मी टेन्शनमध्येय. तुला काय सांगू आता?’ त्यावर आजीने घरी जाण्याचा सल्लाही दिला. मात्र त्याच तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.