रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने दापोली व मंडणगड तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा आकडा ११५ कोटीवर जाण्याची शक्यता आहे. पंचनामे सुरु असून नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कच्ची व पक्की मिळून 40 हजार घरे असून बागायतीच्या नुकसानीचा आकडा सहा हजार हेक्टर आहे.
जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेत किनारपट्टीवरील सुमारे ५००० हुन अधिक लोकांना स्थलांतरित केले होते. त्यामुळे मनुष्य हानी झाली नाही. शासकीय पंचनामे करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागले. त्यानंतर मात्र गेल्या ४ दिवसांपासून पंचनाम्यात सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 'निसर्ग'च्या तडाख्याने जिल्ह्यात 11 जण जखमी झाले असून त्यामध्ये 5 व्यक्ती दापोलीतील तर 6 व्यक्ती रत्नागिरी तालुक्यातील आहेत. यातील एका व्यक्तीवर अद्याप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या चक्रीवादळामध्ये १६ जनावरे मृत झाली आहेत. यामध्ये 6 गाय व म्हैस या दुभत्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यांच्या मालकांना प्रत्येकी ३० हजाराची मदत केली जाणार आहे. चार शेळ्यामेंढ्या मृत झाल्या असून त्यांना प्रत्येकी तीन हजार तर सहा बैल मृत झाले असून प्रत्येकी २५ हजार नुकसान भरपाई दिली जाणार आहे. एका पोल्ट्रीतील ६४ कोंबड्या मृत झाल्या असून प्रत्येकी ५० रुपयांप्रमाणे मालकांना मदत दिली जाणार आहे.वादळामध्ये ४० हजार घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आकडा आहे. यामध्ये ३,७१९ पक्क्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. या प्रत्येक घरांसाठी मालकांना दीड लाखाची मदत दिली जाणार असून यामध्ये मंडणगडमध्ये दीड हजार तर दापोलीत २,२१२ घरांचा समावेश आहे. कच्च्या प्रकारात २५८ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून त्यांनाही दीड लाखाची मदत केली जाणार आहे. पक्क्या घरांमध्ये अंशत: बाधित आकडा २५ हजाराहून अधिक आहे. तर कच्च्या घरांमध्ये १०,५०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
या प्रत्येक घरांना पंधरा हजाराची नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाकडून सुरु आहे. २४० झोपड्यांचे नुकसान झाले असून त्यांना प्रत्येकी सहा हजाराची मदत दिली जाणार आहे. तर ८०० गोठ्यांचे नुकसान झाले असून या ठिकाणी एकवीसशे रुपये दिले जाणार आहे. मंडणगड-दापोलीत सहा हजार हेक्टर शेती व बागायतीचे नुकसान झाले असून प्रत्येकी ५० हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाणार आहे. परंतु जास्तीतजास्त दोन हेक्टरपर्यंतच ही मदत मिळणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महावितरणचे सर्वाधिक नुकसान झाले असून प्राथमिक अंदाज साडेअठरा कोटी रुपयांचा आहे. दापोली व मंडणगडमधील काही गावांमध्ये अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यासाठी अधिकारी ते कर्मचारी असे १२०० जण मदतीसाठी दोन तालुक्यात दाखल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून हे सर्व कर्मचारी दाखल झाले आहेत.
दरम्यान, ७५ कोटी रुपयाच्या तातडीच्या मदतीची घोषणा करूनही आद्यपापर्यंत प्रश्नाकडे हि तातडीची मदत शासनाकडून उपलब्ध झाली नव्हती. हातात असलेल्या निधीच्या साहाय्याने प्रशासन मदत कार्य करत असल्याचे पुढे आले आहे. प्रशासन यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. या तालुक्यातील जनतेला सावरण्यासाठी प्रशासनासह, रत्नागिरी जिल्हावासीय, सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत.
230 कर्मचारी पंचनाम्यात
पंचनामे करण्यासाठी १५० कर्मचारी परजिल्ह्यातून व जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून आले आहेत. यामध्ये कृषी पर्यवेक्षक ८० आहेत. त्याचप्रमाणे पंचनामे करण्यासाठी साडेपाचशे शिक्षकही मदतीला देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.