ओरोस (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी, गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम आहे; पण कोकणात मोठ्या मूर्तींची परंपरा आहे. या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्चित केलेल्या असतात. त्याचा विचार करता मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, सर्व तहसीलदार, पोलिस ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील तपासणी नाक्यांवर होत असलेल्या ऍन्टीजेन तपासणीचा वेग वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिल्या. ते म्हणाले, ""गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य तपासणी व्हावी. लोकांना ऑक्सिजनची लेवल, कोरोनाची लक्षणे यांची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने लोकांना द्यावी. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
12 ऑगस्टनंतर येणाऱ्यांना कोविड टेस्ट बंधनकारक आहे. 48 तासांच्या आत त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करावयाचा आहे; पण त्यानंतर त्यांनी किमान 3 दिवस गृह अलगीकरणात रहावे. उत्सवासाठी येणारे चाकरमानी हे सामान्य नागरिक आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे बरेच हाल झाले आहेत. त्यात प्रवास आणि कोविडचा ताण यामुळे त्यांना बराच त्रास सहन करून प्रवास करावा लागणार आहे. याचा विचार करता येणाऱ्या चाकरमान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.''
..तर ग्राम कृती समितीस बक्षीस
जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या ग्राम समितीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावे, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. सामंत यानी केल्या. ते म्हणाले, ""चांगले काम केलेल्या ग्रामपंचायतींना रोख रक्कम स्वरुपात बक्षिस देण्यात येईल. यासाठी प्रशासनाने एक समिती स्थापन करावी. सर्व ग्राम कृती समितींच्या कामाचे मुल्यमापन करावे व त्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक ठरवावा. गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने गणपतीच्या काळात याविषयी योग्य तो समन्वय साधून नियोजन करावे. सध्या जिल्ह्यातील 68 सरपंच पदे रिक्त होत आहेत. त्याठिकाणी विस्तार अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमावे. ही नेमणूक करताना तालुका निहाय चिठ्ठ्या टाकून नेमणूक करावी, जेणेकरून कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण उरणार नाही.''
कंन्टेन्मेंट झोनची मर्यादा 50 मीटरच
सध्या ज्या ठिकाणी कोविडचे रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी कंन्टेन्मेंट झोन केले जात आहेत. हे झोन जास्तीत जास्त 50 मीटर क्षेत्राचे करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिल्या. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या बस मालकांवर पोलीस आणि आरटीओ या दोन्ही यंत्रणांनी गुन्हा दाखल करावा. 22 पेक्षा जास्त प्रवासी घेऊन येणाऱ्या बसवर कारवाई करताना प्रथम आलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडावे व बसचा परवाना निलंबीत करून या बस मालवण येथील पॉलिटेक्निकच्या आवारामध्ये ठेवाव्यात, असा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या. यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.