कोकण

#Jaganelive पारंपरिक मासेमारीतील ‘मालंडकर पॅटर्न’

शिवप्रसाद देसाई

पारंपरिक मासेमारीच्या जोरावरही आर्थिक सुबत्ता मिळविता येते आणि सागराचे आरोग्यही जपले जाते, असा पॅटर्न वायरी-मालवण येथील मालंडकर कुटुंबाने सिद्ध केला आहे. यात कुटुंबातील पुरुषांपेक्षाही स्त्रियांनी दिलेली खंबीर साथ अधिक मोलाची आहे. कोकणच्या मत्स्यदुष्काळाने अस्वस्थ किनारपट्टीसाठी हा आशेचा दिशादर्शक किरणच म्हणावा लागेल. रेखा मालंडकर व कुटुंबातील अन्य स्त्रियांच्या मेहनतीतून हा पॅटर्न साकारला आहे.

मत्स्यदुष्काळ आणि यांत्रिक पद्धतीच्या अतिरेकी मासेमारीने अख्ख्या कोकणची किनारपट्टी अस्वस्थ आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या पारंपरिक मच्छीमारांना राज्यकर्ते आणि प्रशासन मात्र आधुनिक मासेमारीची कास धरायचा सल्ला देत आहे. दुसरीकडे पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडी फिशिंग अशा अघोरी मार्गाने कोकणच्या समुद्रातील मासळी गाळून काढली जात आहे. या अतिरेकी मासेमारीने समुद्रात मासेच शिल्लक राहणार नाहीत, अशी भीती अभ्यासक व्यक्त करत आहेत. यामुळे समुद्रात पारंपरिक व आधुनिक मच्छीमारांत अक्षरशः युद्ध सुरू आहे. 

याच दोलायमान स्थितीत वायरीतील मालंडकर कुटुंबाने सुयोग्य व्यवस्थापन व कष्टाच्या जोरावर पारंपरिक मासेमारीचा नवा पॅटर्न तयार केला आहे. मालंडकर कुटुंबात मिथुन, राजू आणि आकाश असे तीन भाऊ. लहानपणी या तिघांनीही आर्थिक हलाखीची स्थिती अनुभवली. त्यांचे वडील दुसऱ्याच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला जायचे. आई रेखा मासे सुकवण्याचा व्यवसाय करायची.

वायरी किनाऱ्यावर झावळाच्या छताखाली छोटेखानी घरात हे कुटुंब राहायचे.  आईने खऱ्या अर्थाने या कुटुंबाला दिशा दिली. रक्ताचे पाणी करून या तिघांना वाढविले आहे.

मोठा भाऊ राजू दहावी झाल्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय करायचे ठरवले. होडी, जाळी घ्यायला पैसे हवे होते. बॅंकांचे उंबरठे झिजवले. शेवटी राहते घर, जमीन तारण ठेवून कर्ज मिळाले. तेही अपुरे पडल्याने नातेवाईकांकडून कर्जावू पैसे घेतले. १९९९ ला पहिली फायबर बोट आणि आऊटबोट इंजिन मालंडकर कुटुंबाच्या नावावर जमा झाले; पण सुरुवातीला कर्ज आणि उत्पन्नाचा मेळ बसेना. प्रथम राजू, त्यांचे वडील आणि मिथुन असे तिघे यात सक्रिय होते. त्यांनी नंतर २००१ मध्ये एक पैसा कर्जावू न घेता आणि आणखी एक छोटी बोट, इंजिन घेतले.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर छोटा आकाशही या व्यवसायात पडला. या सगळ्या प्रवासात निर्णय घेणारी या मालंडकर बंधूंची आई होती. तिने मासे सुकवण्याचा व्यवसाय बंद करून स्वतः मासे विक्री सुरू केली. यातून हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या उभे राहण्यासाठी खंबीर साथ दिली. आर्थिक स्थिती सुधारू लागली. टप्प्याटप्प्याने पाच नौका, इंजिन, वेगवेगळी जाळी या कुटुंबाने खरेदी केली. यासाठी पाच पैशाचे कर्ज घेतले नाही. समुद्राचा, मासळीचा, भौगोलिक रचनेचा पुरेपूर अभ्यास करून त्यांनी यात प्रगती केली. आयुष्यभर दुसऱ्यांच्या बोटीसाठी आपले कौशल्य, अनुभव वापरणाऱ्या मिथुनच्या वडिलांनी आपले कसब स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी वापरले. यातून हे कुटुंब अख्खे स्थिरावले. 

फक्त पाच नौकाच नाही तर वायरीत नवी जागा घेऊन त्यांनी प्रशस्त घरही बांधले आहे. तेही कर्जाविना. त्यांच्या या व्यवसायातील यश खरे तर सांघिक प्रयत्नांचे आहे. आई-वडील, तिन्ही मुलांसह त्यांच्या सौभाग्यवतीही यात पूर्ण ताकदीने समर्पित भावनेतून मदत करतात. प्रत्यक्ष समुद्रात जाऊन मासेमारी वगळता इतर सगळ्या कामात मालंडकर कुटुंबातील स्त्रिया पुढे असतात. पुरुषांपेक्षा काकणभर जास्त काम त्यांच्याकडून होते. त्यांचे वडील समुद्रात जात नाहीत. तरीही एकूण उत्पन्नातील ठराविक वाटा ते वडिलांना आणि आईलाही निवृत्तिवेतन म्हणून देतात. पारंपरिक मासेमारीच्या जोरावर मालंडकर कुटुंबाने मिळविलेली समृद्धी आणि टिकवलेले संस्कार अस्वस्थ किनारपट्टीसाठी आशेचा किरण म्हणता येईल.

‘‘आमची पारंपरिक मच्छीमारांची पोरं कुठल्याच चोरी लबाडीच्या कृत्यात दिसणार नाहीत. कारण त्यांच्या हाताला काम आहे. हा रोजगार सरकार नाही तर हा दर्या देतो. किमान तो हिरावला जाणार नाही याची काळजी घ्या.’’
- सौ. रेखा मालंडकर

आमच्या प्रगतीत आईचा सिंहाचा वाटा आहे. तिचा निर्णय कधी चुकला नाही. वडिलांनी समुद्रात उभं राहण्याचं, स्थिरावण्याचं व्यवसायाचं कसब दिले. त्यांच्याविना आम्ही शून्य आहोत. समुद्र आमचा मायबाप आहे. त्याचे आरोग्य राखूनच मासेमारी व्हायला हवी. त्यासाठी पारंपरिक मासेमारीशिवाय पर्याय नाही.
- मिथुन मालंडकर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT