Ratnagiri Historical Vitthal-Rakhumai Temple
Ratnagiri Historical Vitthal-Rakhumai Temple esakal
कोकण

Kartik Ekadashi : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीचं साक्षीदार राहिलेलं विठ्ठल-रखुमाई मंदिर सजलं; दर्शनासाठी मोठी गर्दी

मकरंद पटवर्धन

प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या श्री विठ्ठल मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या मंदिरात वीर सावरकरांची भाषणे गाजली.

Kartik Ekadashi Ratnagiri : महाराष्ट्रातील सर्व बहुजनांचे दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी. पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदिर (Vitthal Temple) आहे. कटेवरी हात ठेवून विटेवर उभा असलेल्या या विठूरायाच्या दर्शनासाठी सर्वच भाविकांना जायला मिळते असं नाही. याच विचाराने रत्नागिरीत पूर्वीच्या मुख्य बाजारपेठेतच श्री विठ्ठल-रखुमाईचे मंदिर उभारण्यात आले. त्यामुळे पंढरपूरच्या मंदिरातील सर्व नित्योपचार याही मंदिरात केले जातात.

म्हणून या मंदिराला प्रतिपंढरपूर मंदिर मानले जाते. एकादशीदिवशी दर्शनासाठी साधारण लाखभर भाविकांची येथे रिघ लागते. या निमित्त शहरात मंदिर परिसरात मोठी जत्राही भरते. तालुक्यातून अनेक भाविक या जत्रेत सहभागी होतात. धार्मिकतेसह या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीचे हे मंदिर साक्षीदार आहे.

मंदिराची स्थापना

विठ्ठल मंदिर नेमके कधी बांधले, याचा उल्लेख नाही; परंतु १७१८ मध्ये शंकरदास गोपाळदास गुजरांनी जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. कोकणात आषाढात शेतीची कामे जोमाने सुरू असतात. भरपूर पाऊस असतो त्यामुळे पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने विठ्ठल मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. शंकरदास गुजरांचे नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी १८२० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर १९२६ आणि २०२२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. विठ्ठल मंदिराला ब्रिटिश सरकारकडून १८७४ पासून १२ रुपयांची सनद सुरू झाली. ही सनद देवस्थानने जपून ठेवली आहे. रत्नागिरीच्या इतिहासाचा एक प्रमुख साक्षीदार म्हणून या देवळाकडे बघितले जाते. या मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराप्रमाणेच नित्योपचार केले जातात. आषाढी असो वा कार्तिकी एकादशी या दोन्ही वेळेस या मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते.

गर्दींचा उच्चांक, कोटींची उलाढाल

कार्तिकी एकादशीला दरवर्षी विक्रमी गर्दी होते. गेल्यावर्षी तर उच्चांक गाठला. विठोबाचे दर्शन घेतले व जत्रेत खरेदी केली. यातून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. बहुसंख्य व्यापारी परजिल्ह्यातून येतात. येथे सर्व प्रकारचे स्टॉल्स, फिरते विक्रेते होते. शोभेच्या वस्तू, लहान मुलांची हर तऱ्हेची खेळणी, कपडे, फळे, फुले, गॉगल्स, रांगोळ्या, स्वयंपाकगृहातील विविध भांडी, विद्युत रोषणाईसाठी माळा, फटाके, काचसामान, घर सजावटीचे साहित्य, टॅटू आर्टिस्ट, महिलांचे विविध प्रकारचे दागिने यांच्यासह असंख्य प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. रामआळी, गाडीतळ, काँग्रेस भवनच्या रस्त्यावर, टिळकआळीकडे जाणाऱ्या मार्गावरही बॅरिकेट्स लावली जात असल्याने जत्रेला व्यापाऱ्यांची गर्दी होते.

ऐतिहासिक वारसा

प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या श्री विठ्ठल मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या मंदिरात वीर सावरकरांची भाषणे गाजली. वीर सावरकर रत्नागिरीत १९२४ ते १९३७ या कालावधीत ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेत वास्तव्यास होते. जनसामान्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून वीर सावरकरांनी लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश मिळाला. या मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषणे गाजली असून हा ऐतिहासिक ठेवा आहे.

तृणबिंदुकेश्वराच्या भेटीला विठोबा

कार्तिकी एकादशीला पहिली पूजा झाल्यानंतर पहाटे काकड आरती होते. त्यानंतर सकाळपासून पारंपरिक भजने होतात. रात्री ११ च्या दरम्यान भजने झाल्यानंतर अनेक वर्षांची परंपरा असणारा रथोत्सव रात्री १२ वाजता सुरू होतो. या अवर्णनीय सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. विठोबाचा रथ सजवण्यात आला आहे. हा रथ गोखलेनाका, धनजीनाका, श्रीराम आळी, तेलीआळी चव्हाटा, मारुती आळी, गोखलेनाका मार्गे फिरून पुन्हा मंदिरात येतो. त्यानंतर विठ्ठलाची पालखी हरिहरेश्‍वर भेटीसाठी तृणबिंदुकेश्‍वर मंदिरात नेण्यात येते व पहाटे साडेपाच वाजता मंदिरात परत येते. ही अनेक वर्षांची परंपरा आजही जपण्यात येत आहे. कार्तिकीला सकाळी ११ च्या दरम्यान (कै.) दाजिबा नाचणकर यांनी सुरू केलेली पायी दिंडी भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात येते.

संतांच्या मूर्ती, घुमट्या

विठ्ठल मंदिराच्या आवारात सर्व संतमंडळींच्या घुमट्या बांधलेल्या आहेत. विठूरायावर समस्त रत्नागिरीकरांची अपार श्रद्धा आहे. हे मंदिर दहा गुंठे जागेत असून, मंदिरात विष्णू पंचायतन प्रकारातील आहे. देवळाची मांडणी महत्त्वाची आहे. श्री विठ्ठल-रखुमाईच्या पूर्ण मूर्ती साडेतीन-चार फूट उंच पूर्वाभिमूख असलेल्या या मंदिरात विठ्ठलमूर्तीच्या उजव्या हाताला समोर श्री सिद्धिविनायक, तर मागे सूर्यनारायण असून डाव्या हाताला समोर सर्वेश्वर आणि मागे श्रीदेवी अंबाबाई अशा चार देवता आसनस्थ आहेत. मंदिराच्या आवारात श्री सिद्धिविनायक, श्री गरूडेश्वर, श्री दत्तगुरू, श्री पुंडलिक (पिंडी), श्री देव सर्वेश्वर महादेव (नंदी व पिंडी) यांची स्वतंत्र छोटेखानी मंदिरे आहेत तसेच साईबाबा मंदिर, स्वामी समर्थांचे मंदिरही आहे. विठ्ठल मंदिराच्या आवारात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव महाराज, संत गोरोबा कुंभार, संत रोहिदास महाराज, संत सेना महाराज, संत गाडगेबाबा यांच्या स्वतंत्र मूर्ती आहेत. संत चोखामेळा आणि संत कबीर यांच्याही घुमट्या आहेत, हे विशेष. या मंदिराची पहिली पायरी नामदेव पायरी आहे.

चातुर्मासातील एकादशीला पालखी

सुमारे १० एकादशीच्यावेळी वाजत गाजत विठूरायाची पालखी दिंडी काढली जाते. विठ्ठल मंदिर, गोखलेनाका, राधाकृष्ण मंदिर, राममंदिर, मारुती आळीतील दक्षिणाभिमुख मारुती मंदिर आणि पुन्हा विठ्ठल मंदिर या मार्गावरही दिंडी निघते. चातुर्मासातील प्रत्येक एकादशीला अशा दिंड्या निघतात. याशिवाय नवीन मूर्ती स्थापना (श्रावण वद्य द्वितीया) आणि मंदिर कलशारोहण (मार्गशीर्ष वद्य द्वितीया) या वेळीही दिंडी निघते. विविध संतमंडळींच्या पालख्यासुद्धा या मंदिरात येतात. स्वामी समर्थांची पालखी, पिठापूर येथून पादुका, पालखी, समर्थ रामदासांची पालखी या वर्षभरात त्या त्या वेळेस येऊन जातात तसेच श्री शंकराचार्य व अन्य विद्वान पंडित या मंदिरात वेळोवेळी येत असतात.

धार्मिक, सामाजिक ऐक्य

विठ्ठल मंदिराच्या कार्तिकी एकादशीच्या उत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होते. रत्नागिरीमधील धनजी नाक्यावर जो दर्गा आहे तेथे फार जुन्या काळापासून दर्ग्याजवळचा परिसर या दिवशी स्वच्छ करून ठेवला जातो. ही पालखी या दर्ग्यापर्यंत जाऊन तेथील दर्गाप्रमुखांना नारळ प्रसाद वगैरे देऊन परत येते. ही प्रथा आजही गुण्यागोविंदाने होत असून, सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे.

१२ रुपयांची सनद

शहराच्या मुख्य भागातील या विठ्ठल मंदिराला ब्रिटिश सरकारकडून १८७४ पासून १२ रुपयांची सनद सुरू झाली. ही सनद देवस्थानने जपून ठेवली आहे. श्री विठ्ठल मंदिर संस्था व विठ्ठल-रखुमाई मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकादशी उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, आवाराची स्वच्छता, विठुरायाचा रथ सजवणे आदी कामे पूर्ण झाली आहेत.

नियमित आरतीला जाणारे सुधाकर भिंगार्डे, दाजी नाचणकर, अप्पा नाचणकर, तात्या पाटील या वयस्कर मंडळींनी सुचवले व सुमारे पंचवीस वर्षांपासून दररोज काकडा आरतीला जाऊ लागलो. यातून मनाला समाधान मिळते. आरती दररोज एक तास चालते. यात नमन, अभंग, वाराची आरती, वाराची भूपाळी म्हटली जाते. आम्ही सुमारे पंधरा-वीस जण असतो. कधी जाता आले नाही, तर मला चुकल्यासारखे वाटते.

-सुरेश शिंदे

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणे येथे मंदिर असावे, या भावनेने ३५०- ४०० वर्षांपूर्वी रामकृष्ण फाटक ट्रस्टच्या जागेत गुजरांनी विठ्ठल मंदिर बांधले. १० ऑगस्ट १८७४ मध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी या मंदिराला वार्षिक १२ रुपयांची सनद दिली. ब्रिटिशकाळात जेव्हा महसूल नोंद सुरू करण्यात आली तेव्हा रहाटागर या महसूल विभागात गावच्या नोंदीची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून झाली. या मंदिराला भूमापन क्र. १ ने नोंद केला आहे. १९५४ मध्ये श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट नोंदणी झाली.

-विजय पेडणेकर, सचिव, श्री विठ्ठल मंदिर

विठोबाला आम्ही राजा मानतो...

समजत्या वयापासून मी विठोबाचा रथ बघितल्याशिवाय कधीही झोपलो नाही. आम्ही यात्रेचा आनंद लुटायचो तसेच या मंदिरात काकडा आरतीला हजर राहायचो, मंदिराच्या आवारात खेळायचो. अगदी ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यात विणाही घ्यायचो. आषाढी एकादशीला मी तुळशीच्या माळा विकणारा आहे; परंतु विठूरायाच्या कृपेनेच आज ६२ वर्षे मेवा-मिठाई विकतोय. विठोबाला आम्ही राजा मानतो. त्यामुळे कार्तिकीला रात्री रथयात्रा निघते. या रथातून विठोबाराजाने दुकान पाहिल्याशिवाय आम्ही दुकाने बंद करत नाही. त्याची कृपा सर्व व्यापाऱ्यांवर आहे.

फार पूर्वीच्या काळात गाड्या नव्हत्या तेव्हा रत्नागिरीजवळच्या पाच-पन्नास गावांतून लोक जत्रेला यायचे तेव्हा रात्री शहरातच वस्ती करायचे व दुसऱ्या दिवशी एसटीने गावी परत जायचे. ही यात्रा प्रचंड मोठी असते. विठाेबाने सर्वांना चांगले दिले आहे. यात्रा म्हणजे दिवाळी-दसराच. दिवाळीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या काकड आरतीत मी दररोज जायचो तेव्हा ज्येष्ठ मंडळी असायची; परंतु आता विठ्ठल मंदिर, राधाकृष्ण मंदिर आणि राममंदिरातही काकडा आरतीला युवकांची गर्दी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT