Indian Navy in Tarkarli Sea esakal
कोकण

Indian Navy : तारकर्ली समुद्रात नौदलाकडून चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा सराव; संचलनाने उजळला आसमंत

नौदलाच्या पश्चिम कमांडच्या आणखी काही युद्धनौकांचा ताफा काल (बुधवार) तारकर्ली समुद्रात (Tarkarli Sea) दाखल झाला.

प्रशांत हिंदळेकर

नौदलाच्या आयएनएस कोलकाता, तलवार, ब्रह्मपुत्रा, सुभद्रा यांसह आयएनएस बेतवा आदी युद्धनौकांनी तारकर्लीच्या समुद्रात संचलन केले.

मालवण : नौदलाच्या पश्चिम कमांडच्या आणखी काही युद्धनौकांचा ताफा काल (बुधवार) तारकर्ली समुद्रात (Tarkarli Sea) दाखल झाला. सायंकाळी नौदलाच्या ताफ्यातील युद्ध नौकांनी तारकर्ली समुद्रात एकामागोमाग एक असे संचलन केले. तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टरनी चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिल्ह्याभरातून आलेल्या नागरिकांचे, पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर आबालवृद्धांनी प्रात्यक्षिके पाहण्यास एकच गर्दी केली होती. त्याने संपूर्ण किनारपट्टी गजबजून गेली होती. नौदलाचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली किनारी दुपारपासूनच नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात दांडी, वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी भागात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक मुलांसह दाखल झाले होते.

सायंकाळी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित सर्वचजण भारावून गेले होते. प्रात्यक्षिके आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी किनारपट्टीवर सर्वांची चढाओढ सुरू होती. नौदलाचे मरीन कमांडो पॅराशूटमधून खाली उतरताच प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. निश्चित केलेल्या पॉइंटवर एकामागोमाग एक असे आकाशातून भारताचा तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवत पॅराशूटद्वारे कमांडो खाली उतरले.

यानंतर आकाशात तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्टनी आपल्या कसरती दाखविल्या. प्रात्यक्षिकांच्या एकापेक्षा एक सरस अशा सादरीकरणाला उपस्थितांकडून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. समुद्रात तयार केलेली दुष्मनांची चौकी बॉम्बच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून मरीन कमांडोंनी आपली क्षमता दाखवून दिली. टार्गेट उद्ध्वस्त केल्यानंतर कमांडोंना नौदलाच्या हॉलिकॅप्टरमधून एअर लिफ्ट करत सुरक्षित माघारी तळावर उतरविण्यात आले.

याचबरोबर युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशा विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. देवबाग येथील खोल समुद्रात असलेल्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनोकेवरून काही लढाऊ विमाने समुद्रातून आकाशात झेपावत होती. त्यांच्या कसरती पार पडल्यानंतर ही विमाने ‘विक्रमादित्य’वर पुन्हा परतली. सायंकाळी साडेसहापर्यंत प्रात्यक्षिके सुरू होती.

प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील नागरिकांना सुरक्षेच्या करणास्तव एमटीडीसी येथील मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास बंदी होती. त्यामुळे अनेक नागरिक दांडी, तारकर्ली, देवबाग येथील किनारपट्टीवरून पायी चालत प्रात्यक्षिके पाहण्यासाठी किनारपट्टीकडे दाखल होत होते. सर्वसामान्यांना प्रात्यक्षिके उद्याच्याच दिवशी पाहता येणार आहेत. त्यानंतर ही प्रात्यक्षिके ४ तारखेला पाहता येणार आहेत. त्यामुळे उद्या (ता.३०) तारकर्ली किनारपट्टीवर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

आज जी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, यात प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. सुरुवातीला मरीन कमांडोंनी विमानातून खाली उडी मारत पॅराशटद्वारे जमिनीवर उतरण्याचे कसब दाखवले.

यानंतर समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तसेच सैनिकांना वाचविण्यासाठी धनुष हेलिकॉप्टरचे आगमन झाले. त्यामधून मदतीची वाट पाहणाऱ्या मच्छीमार आणि सैनिकांना हवेतल्या हवेत एअरलिफ्ट करण्यात आले. त्यांना सुरक्षित स्थळी उतरविण्यात आले. त्यानंतर समुद्रात घात लावून पाण्यात लपून बसलेल्या शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी ए. एस. डब्ल्यू. हेलिकॉप्टरने सोनार बॉडीला समुद्राच्या पाण्यात सोडत शत्रूची पाणबुडी शोधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

रोषणाई ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

ध्रुव, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टरबरोबर तेजस, डॉर्नियर, मिग २९ के आदी लढाऊ विमानांनी आपल्या कसरती दाखविल्या. सूर्यास्तावेळी राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. त्याचप्रमाणे ‘सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताचीही धून वाजविली. त्यानंतर समुद्रात नौदलाच्या युद्ध नौकांवरील रोषणाई सुरू झाली. ही रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

''सी-गल'' पक्ष्यांचीही एन्ट्री

तारकर्ली येथे विमाने, हेलिकॉप्टरचे आकाशात सादरीकरण सुरू असतानाच समुद्रकिनारी दाखल झालेल्या ‘सी-गल’ या विदेशी पाहुण्यांचा थवा आकाशात एकाचवेळी उडाल्याने विमाने, हेलिकॉप्टरसह या पक्ष्यांच्या थव्याचे सादरीकरणही उपस्थितांसाठी लक्षवेधी ठरले.

मोठ्या धमाक्यांसह शत्रूची चौकी उद्ध्वस्त

आजही नौदलाच्या आयएनएस कोलकाता, तलवार, ब्रह्मपुत्रा, सुभद्रा यांसह आयएनएस बेतवा आदी युद्धनौकांनी तारकर्लीच्या समुद्रात संचलन केले. यावेळी आयएनएस बेतवावर सी किंग हेलिकॉप्टर यशस्वीपणे उतरविण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आले. आजच्या दिवसाचे आयएनएस खंडेरी आकर्षण ठरले. प्रात्यक्षिकांच्या अखेरीस भारतीय नौदलाच्या जवानांनी समुद्रात रबरी बोटीच्या साहाय्याने येत शत्रूंच्या चौकीला बॉम्बच्या साहाय्याने उडवून दिले. हा जबरदस्त धमाका पाहून नागरिक अचंबित झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 1500 कोटींचा भ्रष्टाचार? पती मेल्याचे दाखवून 3 महिलांनी लाटले 6 लाख रुपये, एकाने पत्नी मेल्याचे दिले बनावट प्रमाणपत्र

Guru Purnima 2025: आज गुरुपौर्णिमा, जाणून घ्या पुजा करण्याची विधी अन् महत्व

Marathwada Rain: रिमझिम रिमझिम पावसाची; मराठवाड्यावरील रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच

आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2025

CM Devendra Fadnavis : महिला बालविकास अधिकाऱ्याचे निलंबन करू; अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांची कारवाईची ग्वाही

SCROLL FOR NEXT