कोकण

7 एकर क्षेत्रात तुतीची लागवड; कोकणी माणसं साकारणार आता रेशीम शेती

या तुती लागवडीच्या माध्यमातून राजापूर-लांजा तालुक्यांमध्ये भविष्यामध्ये रेशीम उत्पादन घेण्यात येणार आहे.

राजेंद्र बाईत

कोकणातील शेतकर्‍यांकडून गेल्या काही वर्षामध्ये विविध नाविण्यपूर्ण पीक लागवडीचे प्रयोग केले जात आहेत. त्याप्रमाणे आता कोकणातील शेतकर्‍यांनी रेशीम शेतीचा नाविण्यपूर्ण नवा प्रयोग हाती घेतला आहे. त्यासाठी राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रगतशील आणि विविध पुरस्कार विजेत्या शेतकर्‍यांनी एकत्रित येत राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाची स्थापना केली आहे. या गटाच्या माध्यमातून तब्बल अकरा शेतकर्‍यांनी एकत्रित येत एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या शेतामध्ये सुमारे सात एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली आहे.

या तुती लागवडीच्या माध्यमातून राजापूर-लांजा तालुक्यांमध्ये भविष्यामध्ये रेशीम उत्पादन घेण्यात येणार आहे. शेतीतील या नव्या प्रयोगाच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणामध्ये आता तुती लागवडीच्या माध्यमातून तलम रेशीम शेतीचा अन् उत्पादनाच्या नाविण्यपूर्ण व्यवसायाचा पाया रचला जात आहे. त्याच्यातून, भविष्यामध्ये कोकणातील शेतीक्षेत्राने प्रगतीची कात टाकल्यास नवल वाटणार नाही.

सहकारातून रेशीम व्यवसाय

तुती लागवड आणि रेशीम व्यवसायाचा प्रयोग करण्यासाठी राजापूर-लांजा तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकत्रित येत सहकाराच्या धर्तीवर राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गट गठीत केला आहे. दयानंद चौगुले यांच्या अध्यक्षतेखालील या संघटनेमध्ये अमर खामकर (सचिव), राजाराम पाटेकर (उपाध्यक्ष), रमेश पाजवे (सहसचिव), माजी सैनिक वासुदेव घाग (खजिनदार), मनोहर पेडणेकर (उपखजिनदार), हनुमंत विचारे, सुनिल वडवळकर, हरिश्‍चंद्र पाटेकर, सुधीर पालकर, रघुनाथ गिरकर, विश्‍वनाथ वरेकर, अब्दुल गनी लांजेकर (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे. तुती लागवड करणार्‍या या शेतकर्‍यांच्या दर महिन्याला सभा होवून ते एकमेकांशी संवाद साधतात.

कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी तुती लगवड अन् रेशीम निर्मितीचा नव्या राबविलेल्या उपक्रमाला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या लांजा येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. कृषी विज्ञान केंद्रातील वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद हणमंते, शास्त्रज्ञ डॉ. सुदेशकुमार चव्हाण हे या शेतकरी समूह गटाच्या दर महिन्याला होणार्‍या बैठकांना उपस्थित राहून शेतकर्‍यांना तुती लागवड आणि रेशीम व्यवसायाविषयी मार्गदर्शन करतात. या बैठकीमध्ये तुती लागवड, त्यावरील विविध रोग वा किड नियंत्रण यांसह अन्य शेतीविषयक समस्यांवर चर्चा होवून कृषी शास्त्रज्ञांमार्फत योग्य मार्गदर्शन केले जाते.

तुती लागवड आणि रेशीम उद्योग याच्यातील अर्थकारणही त्यांनी समजावून सांगितले. ज्याचा तुती लागवड आणि रेशीम निर्मिती प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी उपयुक्त ठरत आहेत. त्याचवेळी या शेतकर्‍यांना नागपूर येथील रेशीम संचनालय येथून सेवानिवृत्त झालेले रमेश हांदे यांचा रेशीम शेतीतील सुमारे पस्तीस वर्षातील अनुभव आणि मार्गदर्शनही महत्वपूर्ण ठरत आहे. राजापूर कृषी विभागातील वैभव अमरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. या शेतकर्‍यांनी कणकवली (जि.सिंधुदूर्ग) येथील महेश सावंत, कोल्हापूर येथील जयराम जाधव यांच्या तुती लागवड प्रकल्पांना भेटी देवून तेथील शेतकर्‍यांशी संवाद साधला.

सात एकरमध्ये तुती लागवड

प्रत्यक्ष रेशीम निर्मितीच्यावेळी सोडण्यात येणार्‍या रेशीम अळ्यांना खाद्यासाठी तुतीच्या पाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे राजापूर आणि लांजा तालुक्यातील खरवते, सौंदळ, कोळंब, करक, गोठणेदोनिवडे, ओझर, जांभवडे, आरगाव या ठिकाणी सुमारे सात एकर क्षेत्रामध्ये अकरा शेतकर्‍यांनी यावर्षी तुतीची लागवड केली आहे.

अशी केली रोप निमिर्ती

तुतीच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांनी ‘व्ही वन’ जातीची निवड केली आहे. त्यासाठी लागणार्‍या तुतीच्या चार हजार स्टीक दापोली कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या. तर, कोल्हापूर येथील शेतकर्‍याकंडून व्ही वन जातीच्या स्टीक आणून आरगाव येथील अमर खामकर, सौंदळ येथील वासुदेव घाग, राजाराम पाटेकर, हरिश्‍चंद्र पाटेकर या स्थानिक शेतकर्‍यांनी स्वतःची नर्सरी तयार करून त्यामध्ये रोपांची रूजवात केली. त्यानंतर, योग्य वाढ झालेल्या रोपांची शेतांमध्ये लागवड केली आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी तयार केलेल्या नर्सरीतून अन्य काही शेतकर्‍यांनी रोपांची खरेदी करून आपापल्या शेतांमध्ये तुतीची लागवड केली आहे.

अशी केली लागवड

जमीनीमध्ये पाण्याचा साठा झाल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होतो जो रोपांसाठी घातक ठरतो. त्यामुळे तुतीच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणार्‍या जागेची शेतकर्‍यांनी निवड केली आहे. शेतजमीनीची नांगरणी केल्यानंतर 5 बाय 3 बाय 2 चे गादीवाफे तयार करण्यात आले. दोन गादीवाफ्यांच्या सर्‍यांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले. जेणेकरून रोपांची वाढ झाल्यानंतर शेतामध्ये वाढणारे गवत काढणे किंवा अन्य मशागतीची कामे करण्यासाठी फिरणे अधिक सुलभ होईल.

या रोपांना पाणी देण्यासाठी भविष्यामध्ये ठिबक सिंचनाचा उपयोग करण्याचे नियोजन शेतकर्‍यांनी केले आहे. लांजा येथील शेतकरी अमर खामकर यांनी आरगाव येथे तुतीच्या लागवडीमध्ये आलं लागवडीचे आंतरपिकही घेतलं आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी जून महिन्यामध्ये तुतीच्या रोपांची लावगड केली आहे. लागवड करताना रोपांना शेणखताची मात्रा देण्यात आली. तर, बुरशीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून लिंबोणीचा वापर करण्यात आल्याचे श्री. खामकर यांनी सांगितले.

खर्चामध्ये होते बचत

तुतीच्या रोपांची एकदा लागवड केल्यानंतर सुमारे पंधरा वर्षापर्यंत रोपे सर्वसाधारणपणे जिवंत राहतात. त्यामुळे तुतीच्या रोपांची दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यातून, लागवडीसाठी दरवर्षी येणार्‍या खर्चामध्ये काहीशी बचत होते. लागवड झालेल्या रोपांची वर्षातून सुमारे पाचवेवेळा कटींग करता येते.

रेशीम निर्मितीसाठी बेड निर्मिती

तुतीच्या रोपांची चांगलीच वाढ झाल्यानंतर प्रत्यक्ष रेशीम निर्मितीचे पुढचे पाऊल शेतकर्‍यांकडून टाकले जाणार आहे. रेशीम निर्मितीसाठी शेतकर्‍यांकडून आपापल्या शेतांमध्ये वा सोयीच्या ठिकाणी शेड उभारून त्यामध्ये लोखंडी बेड तयार केला जाणार आहे. या बेडमध्ये तीन-चार रॅक तयार केल्या जाणार आहे. या रॅकमध्ये रेशीमच्या अळ्या सोडून त्यांना खाद्यासाठी तुतीचा पाला टाकण्यात येणार आहे. हा पाळा खात या अळ्यांची पुरेशी वाढ होवून सर्वसाधारणपणे अठरा दिवसानंतर कच्चे रेशीम धागे निघणार असल्याची माहिती दयानंद चौगुले यांनी दिली. हे कच्चे रेशीम धागे कोल्हापूर वा अन्य ठिकाणच्या वस्त्रोद्योगांना पुरविले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

येथून उपलब्ध होणार रेशीम अळ्या

रेशीमच्या धागा निर्मितीसाठी रेशीमच्या अळ्यांची आवश्यकता असते. या अळ्या कोल्हापूर येथून आणण्याचे नियोजन या शेतकर्‍यांनी केले आहे. त्यासाठी शेतकरी समूह गटाची कोल्हापूर येथील खादी ग्रामोद्योगामध्ये रेशीम अळ्या उपलब्धीच्या अनुषंगाने नावनोंदणी करण्यात आल्याचे शेतकरी समूह गटाचे अध्यक्ष दयानंद चौगुले यांनी माहिती दिली.

शासन मदतीची अपेक्षा

शेती क्षेत्रामध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग वा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना नाविण्यपूर्ण योजनेंतर्गंत अनुदानाच्या रूपाने मदत मिळते. राजापूर-लांजा तलुक्यातील शेतकर्‍यांनी केलेल्या तुती लागवडीला नाविण्यपूर्ण योजनेतून शासनाकडून अनुदान रूपातून मदत लाभल्यास हे शेतकरी अधिक जोमाने तुतीसह अन्य पिकांची लागवड करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तुती लागवडीला शासनाकडून नाविण्यपूर्ण योजनेतून पाठबळ मिळेल अशी अपेक्षा राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे सचिव अमर खामकर यांनी व्यक्त केली.

असे असेल अर्थकारण

तुतीच्या लागवडीसाठी प्लॉट तयार करणे, नर्सरी रोपे तयार करणे, ट्रॅक्टरने नांगरणी, लागवडीसाठी खत, औषध, मजूर, शेणखत, कुंपण यासाठी दीड लाख रूपये एकरी खर्च आल्याची माहिती राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे सचिव अमर खामकर यांनी दिली. भविष्यात शेड, ठिबक सिंचन, ट्रे, चंद्रीका, विजेता पावडर, चुना पावडर, मजुरी असा साडेतीन लाख खर्च भविष्यामध्ये येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. एकूण खर्चापैकी सुमारे 90% खर्च हा 15 वर्षासाठी एकदाच होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रत्येक बॅचनिहाय मजुरी, विजेता पावडर, चुना पावडर, जैविक खत, फवारणी, जीवामृत व इतर असा मिळून सुमारे 15 हजार खर्च अपेक्षित आहे. एकरी एका बॅच मागे 100 किलो कोशाचे उत्पन्न अपेक्षित असून सध्याचा बाजार भाव पाचशे रुपये प्रतिकिलो गृहीत धरला तर, खर्च वजा करता सुमारे पस्तीस हजार रुपये एका बॅच मागे शेतकर्‍याला मिळू निव्वळ उत्पन्न मिळू शकते. अशा पाच बॅच घेतल्या तर वर्षाला 1 लाख 75 हजार रूपये निव्वळ एकरी नफा शेतकर्‍याला मिळू शकेल असा अंदाजही श्री. खामकर यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्या-त्यावेळच्या बाजार भावाप्रमाणे नफा कमी-जास्त होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

'राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा निर्धार केला. त्यासाठी सहकारच्या धर्तीवर एकत्र येत राजापूर -लांजा रेशीम शेतकरी समूह गटाची स्थापनाही केली आहे. तुती लागवडीतून रेशीम उत्पादनाचा शेतीतील नवा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल.'

- दयानंद चौगुले, अध्यक्ष, राजापूर - लांजा रेशीम शेतकरी समूह गट

'व्यावसायिक दृष्टीकोनातून तुती लागवडीतून रेशीम उत्पादनाचा शेतीतील नवा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. निश्चितच तो यशस्वी होऊन कोकणातील शेतीसाठी कलाटणी देणारा ठरेल.'

- माजी सैनिक वासुदेव घाग, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT