कोकण

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; राजाच्या दर्शनासाठी प्रजेची व्याकुळता

शिवप्रसाद देसाई

युद्धावर जाण्यासाठीचा मार्ग मुंबईतून होता. या प्रवासात पंचम खेमराज उर्फ (Khemraj Sawant)बापूसाहेबांनी आपल्या संस्थानात म्हणजे सावंतवाडीत (Savantwadi) काही काळासाठी यायचे ठरवले. ही भेट अवघी २४ तासांची असली तरी सावंतवाडीकरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे ती संस्मरणीय ठरली. आपले राजे युद्धावर जात असल्याने त्यांच्या काळजीपोटी संस्थानात प्रचंड अस्वस्थता होती. त्याचे प्रतिबिंबही या भेटीदरम्यान दिसले.

बापूसाहेबांचा पहिल्या महायुद्धासाठी मेसापोटेमिया येथे हजर होण्यासाठीचा प्रवास मुंबईमार्गे होता. इंग्लंडहून जहाजातून निघाल्यावर मुंबईमार्गे आखातातून प्रवास करावा लागणार होता. साहाजिकच त्यांना मुंबईत काही काळासाठी थांबावे लागणार होते. युद्धाचा काळ असल्याने बोटीचा प्रवास धोकादायक बनला होता. बापूसाहेब २२ सप्टेंबर १९१७ ला मुंबईत पोहोचले. अनेक वर्षे ते आपल्या मायभूमीत गेले नव्हते. मुंबईहून त्यांचा पुढचा प्रवास आणखी काही दिवसांनी सुरू होणार होता. त्यामुळे त्यांनी सावंतवाडीत जायचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दहा दिवसांची रजा मागून घेतली. शिक्षणासाठी सहाव्या वर्षी सावंतवाडीतून बाहेर पडलेल्या बापूसाहेबांचे सावंतवाडीतील सर्वसामान्यांसाठी मधल्या काळात दर्शन दुर्मिळच होते. रावसाहेबांच्या निधनानंतर राजा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होणार होती. मुळातच त्यांच्या विषयी सावंतवाडीतील सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये खूप साऱ्या अपेक्षा आणि प्रेम होते. आता राजे झालेले बापूसाहेब सावंतवाडीत येणार होते. त्यामुळे त्यांची ही सावंतवाडीची अल्प काळाची भेट असली तरी त्याबद्दल सावंतवाडीकरांना मोठे अप्रूप होते.

राजे सावंतवाडीत १ ऑक्टोबर १९१७ ला पोहोचले. तेव्हा त्यांचे स्वागत खूप भावनिक वातावरणात झाले. यात कुठेही थाटमाट नव्हता; मात्र भेटायला आलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात वेगळ्याच भावना तरारून गेल्या होत्या. आपला राजा इतक्या वर्षांनी येतोय, तो सातासमुद्रापार शिकलाय, गादीवर बसण्याऐवजी स्वस्फुर्तीने युद्धावर निघाला आहे, मग तो कसा दिसत असेल?, त्याचे राजबिंडे रूप डोळ्यात साठवण्यासाठी सावंतवाडीकर जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. शहरच नाही तर १५-२० मैल पायपीट करून संस्थानातील गावागावामधील लोक राजाच्या दर्शनासाठी सावंतवाडीत दाखल झाले होते. राजे येणार असलेल्या मार्गावर दुतर्फा उन्हातान्हात प्रजा त्यांची वाट पाहत होती. बापूसाहेब अवघे २४ तास शहरात होते; पण या इतक्या कमी काळातही अनेकांनी त्यांची भेट घेतली. अधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी, राजेसाहेबांचे बालमित्रांचा यात भरणा होता.

बापूसाहेबांनी युद्धावर जावू नये, अशी अपेक्षा बाळगून त्यांची समजूत काढणाऱ्यांचीही संख्या कमी नव्हती. अनेकांनी त्यांनी युद्धावर जावू नये म्हणून आर्जव केली; पण उलट राजेसाहेबांनी यावर दिलेले उत्तर अशा लोकांना निरूत्तर करणारे ठरले. राजेसाहेबांनी आपल्या गोड आणि अधिकारीवाणीत आपल्या प्रमाणे सावंतवाडीतील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने युद्धात सामील व्हावे, असे उलट आवाहन केले. बापूसाहेब सावंतवाडीतून निघाल्यावरही त्यांना यापासून परावृत्त करण्याचे प्रजाजनांचे प्रयत्न थांबले नाहीत. अनेकांनी मुंबईच्या गव्हर्नरला शेकडो तारा पाठवल्या. त्यात राजेसाहेबांना युद्धात सामील होण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली गेली. बापूसाहेब युद्धासाठी रवाना झाल्यानंतरही सावंतवाडीकरांचे प्रयत्न थांबले नाहीत. ऑक्टोबर १९१७ ला धोंडजीराव पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत सार्वजनिक सभा घेण्यात आली. यात महाराजांनी युध्दापासून परावृत्त व्हावे यासाठी ब्रिटिश गव्हर्नरला पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पाठवलेल्या पत्राचा आशय असा होता, ‘नेक नामदार गव्हर्नर आणि प्रेसिडन्ट इन कौन्सील, मुंबई यांच्या हुजूरास सावंतवाडी संस्थानातील रहिवाश्यांचा अर्ज की, सावंतवाडी संस्थानचा राज्यकारभार मुंबई सरकारच्या देखरेखीखाली चालत असून संस्थानचे अधिपती अज्ञान आहेत. विद्याभ्यासाठी त्यांनी संस्थानाबाहेर बारा वर्षे घालवली असून ते या महिन्यात विलायतेहून येथे आले. खाविंदाच्या अर्जदारास असे समजते की, त्यांची नेमणूक ११६ मराठा पायदळ फलटणीमध्ये ऑनररी सेकंड लेफ्टनंट म्हणून झाली आहे. ते मेसापोटेमिया येथील समरभूमीच्या आघाडीवर जाणार आहेत. त्यांच्या या नेमणुकीमुळे संस्थानच्या प्रजेस सानंदाभिमान वाटत आहे; तथापि लढाईवर जाण्याच्या निश्‍चयामुळे येथील प्रजेची मने फार अस्वस्थ व चिंतातूर झाली आहे. राजेसाहेबांना २१ वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यांच्या संस्थानची व्यवस्था त्यांचे पालनवाले मुंबई सरकार यांच्याकडे आहे. राजेसाहेब हे कायद्याच्या दृष्टीने अज्ञान आहेत. कोणत्याही व्यवहारात त्यांनी दिलेली संमती कायदेशीर होणार नाही. यासाठी त्यांनी युद्धावर जाण्यासाठी आपली संमती दिली तरी त्याला महत्त्व देता येत नाही. ते अज्ञानावस्थेत असताना त्यांच्या हिताची जबाबदारी त्यांचे पालनवाले मुंबई सरकार यांच्यावर आहे असे म्हणण्याचे धैर्य अर्जदार करीत आहेत.

सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यात सांप्रतचे अज्ञान राजे यांच्याशिवाय दुसरा कोणीही पुरुष नाही. त्यामुळे त्यांच्या लढाईवर जाण्याने या संस्थानची गादी प्रसंगी धोक्यात येईल याचा विचार खाविंदानी करावा. ब्रिटिश साम्राज्यास मदत करणे हे या संस्थानचे मुख्य कर्तव्य आहे; परंतु ज्या योगे ब्रिटिश साम्राज्यास करण्यात येणारी मदत जास्त फलदायी होईल त्या मार्गाचा स्विकार करणे हे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे, असे खाविंदाच्या अर्जदारास वाटते. या संस्थानचे अज्ञान राजे समरभूमीवर जावून व्यक्तीशः ब्रिटिश साम्राज्यास जी अल्प मदत करतील त्यापेक्षा या इलाख्यात राहून त्यांनी सैन्यभरतीचे काम केल्यास त्यांच्या हातून साम्राज्यास जास्त महत्त्वाची मदत केल्यासारखे होणार आहे. या संस्थानकडून चालू युद्धास सैन्य भरतीच्या कामी मोठी मदत केलेली आहे. अज्ञान बाळराजांसारखे लोकप्रिय व वजनदार चालक सैन्य भरतीच्या कामी असल्यास त्याला मोठे यश मिळेल. तेव्हा खाविंदानी कृपाळू होवून राजेसाहेबांचे मन युद्धावर जाण्यापासून परावृत्त करावे व असे करून संस्थानातील रयतेचा धन्यवाद संपादन करावा, अशी प्रार्थना आहे. हे पत्र प्रेसिडेंट सार्वजनिक सभा असा हुद्दा घालून धोंडजीराव पाटणकर यांनी मुंबई गव्हर्नरला पाठवले. हे सगळे प्रयत्न बापूसाहेबांच्या प्रति असलेल्या प्रेमामुळे सावंतवाडीकरांकडून झाले.

बापूसाहेब सावंतावडीतून मेसापोटेमिया येथे हजर व्हायच्या ठिकाणी निघण्याच्या प्रवासासाठी मुंबई पोहोचले. यावेळी ब्रिटिश सरकारचे मुंबईतील वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटले. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलींग्डन यांनी या भेटीत राजेसाहेबांना विचारले की, ‘आपणाला आघाडीवर न पाठवण्याबाबत सावंतवाडीतून शेकडो तार संदेश आले आहेत. मग काय करायचे? आपले मत मानायचे की त्यांचे?’ यावर राजेसाहेबांनी मार्मीक उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘माझ्याबरोबर कॉलेजात शिकणारे बरेचसे दोस्त आज युद्ध लढत आहेत. काही तर धारातीर्थी पडले आहेत. मग मी आपले कर्तव्य करू नको का? आपणच सांगा मी कर्तव्यच्युत व्हावे, अशी आपली इच्छा आहे का?’ यावर लॉर्ड विलींग्डन निरूत्तर झाले. एकूणच सावंतवाडीकरांनी केलेल्या प्रयत्नानंतरही बापूसाहेबांचा दृढ निश्‍चय बदलला नाही. ते युद्धभूमीकडे जायला निघाले.

भावनीक क्षण

बापूसाहेब मुंबईहून युद्धभूमीकडे जायला ६ ऑक्टोबर १९१७ ला मुंबईतून निघाले. बसऱ्याकडे जाणारी ही बोट होती. त्यांना निरोप द्यायला बंदरावर अनेक आप्तेष्ट, मुंबईत स्थायीक झालेले तसेच खास सावंतवाडीहून आलेले प्रजाजन जमले होते. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू तरारत होते. बापूसाहेबांसाठीही हा क्षण भावनिक होता; मात्र त्यांनी आनंदी चेहऱ्याने त्यांचा निरोप घेतला आणि युद्धभूमीकडे रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT