Leopard esakal
कोकण

'लग्न मांडवातल्या हाय हॅलोमध्ये विराजमान होण्याचा मान मिळालेला दुसरा प्राणी म्हणजे बिबट्या!'

बिबट्यांचे वस्तीत येणे ही आता सर्वांनी स्वीकारण्याची गोष्ट झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अजूनही कोकणातील अनेक गावांत विशेषतः जुनी आणि पारंपरिक पद्धतीची घरे असणाऱ्या गावात वाडे हे शक्यतो घराशेजारी असतात.

-प्रतीक मोरे, देवरूख moreprateik@gmail.com

तो येतो...तो फिरतो...तो असतो...बिबट्याची (Leopard) कथा लिहिण्याइतका दूर तो आत्ता राहिलेलाच नाही. पारावरच्या गजालीपासून लग्नाच्या मांडवातल्या हाय हॅलोमध्ये विराजमान होण्याचा मान मिळालेला दुसरा प्राणी म्हणजे बिबट्या. (पहिला मान अजूनही बोक्याचा असावा) अगदी मुंबईसारख्या दोन-तीन कोटी लोकांमध्ये आणि कोकणातल्या वाडीच्या रातकिड्यांची किरकिर पण डॉल्बीवर लावली की काय असं भासणाऱ्या शांततेत अगदी सहजतेने वावरणारा प्राणी म्हणजे बिबट.

कधी कोंबडीच्या खुराड्यात, कधी कुत्र्याच्या मागावर, कधी रस्त्यावर मेलेली बेडकं बघत साईड पट्टीवर बसणारा, तर कधी उसाच्या शेतातून अलगद प्रकटणारा बिबट्या जेवढा लोकांच्या कथांमध्ये भेटतो तेवढा तो जीव विज्ञानाच्या पुस्तकातही नसावा आणि म्हणूनच रात्री भ्रमंतीची लहर आली की कायम दृष्टीस पडलाच पाहिजे, अशा लिस्टमध्ये असणारा एकमेव प्राणी म्हणजे बिबट्या.

कोकणात (Konkan) रात्रीची जेवणं झाली की मुख्यतः अंगणात बसून नाहीतर पानाचे डबे उघडून गप्पा रंगतात... एखाद्या चांदण्याच्या रात्री घुबडाची घू घु ऐकू येत असते. रातवे, रातकिडे यांची साथसंगत असणाऱ्या गूढ रम्य वातावरणात भुतांच्या गोष्टी रंगायच्या. आता सर्वदूर पोचलेल्या लाईट बल्बनी भूतांना सळो की पळो करून सोडलं आहे आणि अलगद पावलांनी किंचित आवाज न करता दबक्या पावलांचे हे भूत वाडीवस्तीवर सहज फिरू लागले आहे. बिबट्यांचे वस्तीत येणे ही आता सर्वांनी स्वीकारण्याची गोष्ट झाली आहे. वस्तीत पडणारा कचरा, त्यावर पोसलेले भटके कुत्रे, घुशी, उंदीर अशा नानाविध खाद्यांची बिना कष्टाची मेजवानी चुकवून कोण त्या काटेरी जंगलात साळीचे काटे आणि डुकराचे सुळे चुकवत फिरणार. कोकणात एखादं वासरू किंवा रेडकू वाघाने मारलं की लगेच पट्टेरी वाघ दिसल्याची चर्चा सुरू होते.

गजालीच्या बैठका मग सुरस व्याघ्र दर्शनाच्या सुरस कथानकांनी गाजू लागतात. मला काल वाघ दिसल्यापासून ते अगदी काहींना अगदी रोज वाघ आडव्या जाण्याच्या रम्य कथा सगळीकडे ऐकू येतात. या निमित्ताने आम्हाला सुद्धा मग संधी निर्माण होते. खरंतर ज्याचे गोधन मारले गेले, त्यांच्याकडे जाऊन त्याला तो मृतदेह तसाच ठेवायला सांगणे हे थोड अवघड काम. जरी गुरे असली तरी त्यांच्याशी भावना निगडित असल्यामुळे अनेक वेळा रक्षण करता आलं नाही तरी अंतिम संस्कार तरी व्यवस्थित करून आपल्या लाडक्या गोधनाला निरोप द्यावा, अशी भावना असते. त्यामुळे मालकाला वेळेत जाऊन भेटता आलं आणि त्याच मन वळवता आलं तर मात्र ट्रॅप कॅमेरा लावणं शक्य होतं. अशाच एका घडलेल्या घटनेत सुद्धा वाघाने म्हशीचं रेडकू वाड्यातून उचलून नेलं आणि आम्हाला माहिती लगेच मिळाल्याने आम्ही लगेच तिथे पोचलो.

अजूनही कोकणातील अनेक गावांत विशेषतः जुनी आणि पारंपरिक पद्धतीची घरे असणाऱ्या गावात वाडे हे शक्यतो घराशेजारी असतात. मोठमोठ्या झाडांनी वेढलेल्या आणि कडेला ओहोळ असणाऱ्या या घराशेजारील वाड्यात जाण्यासाठी ओढ्यावर असणारा पूल ओलांडून थेट अंगणातूनच वाघाला यावं लागणार असल्याची जाणीव तिथली परिस्थिती बघूनच कळत होती. घरात असणारी बुजूर्ग मंडळी आणि बागेत असणारे कामगार वर्ग सोडला तर इथून इतर रहदारी पण कमी. त्यामुळे बिबट्या आजूबाजूला वावरत असण्याची शक्यता पण जास्तच. अंगणात उठलेले ठसे या वावराची ग्वाही देणारे. अशाच एका पावसाने गारठलेल्या रात्री वाघाने गोठ्यात बांधलेले म्हशीचं एक दीड वर्षाच रेडकू दावं तोडून उचलून नेलं.

आतापर्यंत केव्हाही अशी घटना घडलेली नसल्यामुळे गोठ्याला पूर्णपणे बंदिस्त करायची गरज कधी पडलीच नव्हती. त्यामुळे अर्ध्या भिंती आणि अर्धा उघडा असणारा हा गोठा वाघासाठी सहजसुलभ ठरला आणि नेमकी पाडसे म्हशींच्यामध्ये बांधण्याऐवजी ज्या दिवशी बाजूला बांधली गेली ती वेळ साधून वाघाने शिकार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गुराखी आल्यानंतर त्याला हा प्रकार दिसला आणि मग काय झालं असेल याचा शोध सुरू झाला. वाड्याच्या बाहेरच चिखलात उमटलेली पावले काय झालं असेल हे दर्शवत होती आणि याच ठिकाणी वीस, पंचवीस वर्षे काम करणाऱ्या अनुभवी माणसानं मग ओढून नेल्याच्या खुणा शोधत गोठ्यापासून जवळ जवळ तीनशे चारशे मीटर वर नेऊन ठेवलेले शिकार शोधून काढली.

खरंतर या व्यक्तीला एखाद्या ट्रॅकरला लाजवेल एवढं ज्ञान असावं कारण पावसाने अगदी अस्पष्ट झालेल्या पाऊलखुणा मोडलेल्या आणि दबलेल्या तणाच्या फांद्या यावरून ट्रॅक काढणं खूप अवघड होत आणि त्याने ते साध्य करून दाखवलं होत. सुदैवाने या वाडीचे मालक वैभव सरदेसाई हे निसर्गप्रेमी आणि पर्यावरण पर्यटन क्षेत्रात उत्तम काम करणारे आहेत, त्यामुळे त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवून या घटनेमागे वाघाची होणारी चर्चा खरी की खोटी ती पडताळून पाहूया म्हणून शार्दुलला फोन केला आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो. एक ते दीड वर्षाच ते रेडकू ऐंशी-नव्वद किलोच तरी असावं. एवढं पाडस सहजतेने उचलून नेणारा हा वाघ पण चांगलाच मोठा असावा, हा तर्क तर लगेचच मनात आला. त्याने रस्त्यापासून थोडी आत जाणारी पायवाट पकडून जिथून येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष्य ठेवता येईल, अशी एक काट्यांनी भरलेली करवंदीची जाळी निवडली होती.

पहिल्या रात्री पोटाकडून सुरुवात करून थोड मांस खाल्ले होते. कदाचित ही घटना पहाटे घडली असावी आणि सगळी ओढाताण करून एवढं जड भक्ष्य उचलून नेऊन लपवून खायला बसावं तर उजडल्याने हा वाघ तिथून गेला असावा. बहुतांशी मांस तसंच असल्याने पुन्हा तो खायला येणार, हा अंदाज करून आम्ही कॅमेरा लावला. पावसाने प्रचंड काळोख केला होता आणि विजा कडकडू लागल्या होत्या. त्यामुळे जास्त वेळ न काढता आम्ही तिथून पुन्हा घराजवळ गेलो आणि अंगणात फेस करून एक दुसरा कॅमेरा लावला आणि तिथून निघालो. एव्हाना आजूबाजूची अनेकजण गोळा झाले होते. वाघाच्या सुरस कथा ऐकत आजचा दिवस संपला होता आणि उद्या उजाडणाऱ्या सकाळी या शिकारीचा कर्ताकरविता कोण हे कोड उलगडेल ही आशा ठेवून आम्ही परत निघालो होतो.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT