Ansure Village
Ansure Village esakal
कोकण

Konkan Tourism : कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?

सकाळ डिजिटल टीम

अणसुऱ्याच्या खाडीत मिळणारे छोटे-छोटे ताजे मासे तराफ्यावर मस्त तिखट फ्राय करून खाण्यास मिळतात.

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

कोरोनाचा काळ सुरू होण्यापूर्वीचा सीझन. आंबे मित्रांनी मागवले होते. कुठून घ्यायचे विचार करत असतानाच राजापुरातील अणसुरे गाव आठवले. तिथले आंबेवाले सोमण बरेच दिवस पाठी होते. या घरी एकदा घर पाहायला. मुहूर्त काही मिळत नव्हता. मग, ५० बॉक्स आंबे कोणाकोणाचे अशी यादी झाली आणि स्टार्टर मारला तो थेट अणसुरे गावात (Ansure Village). कोकणचे स्वप्न म्हणूनच त्याला संबोधले पाहिजे.

अणसुरे हे गाव भारतातील पहिले गाव आहे की, ज्या गावाने स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. अतिशय अनोखी माहिती या वेबसाईटवर आहे तर रत्नागिरी मार्गे आडिवरे करत अणसुरे गाठले. खरे सांगायचे तर हा समुद्र आणि आपण रत्नागिरीपासून (Ratnagiri) सोबत करत या गावात घुसतो. काही ठिकाणी एकेरी मार्ग, समुद्री पूल, दाट सुरूचे जंगल असे करत करत आपण निसर्गात खोलखोल अडकत जातो. हातातील मोबाईल बाजूला पडतात. हा फोटो काढू करत करत फोटोच फोटो काढत आपण पुढे पुढे जातो. निसर्गाने दिलेले एक पाचू रंगाचे गाव आणि त्याला लाल कातळाचे कोंदण असलेल्या गावात प्रवेश करतो.

मुक्काम सोमण यांच्याकडे होता, त्यामुळे हक्काचा यजमान, गाईड, निसर्गसेवक असे सर्वकाही जवळजवळ तेच. अणसुऱ्यातील घरे उंबरठा खाडीला लागून आणि पाठचे दार डोंगराला लागून अशा बऱ्याच वाड्यावाड्यांमधून पसरलेले. पाहू तिकडे आंबेच आंबे. चांगली चाळीस वर्षे राखलेली झाडे. उंची तर पार आडवी तिडवी. रत्नागिरीपासून साधारण ६० किलोमीटरवर अणसुरे गाव येते. गावात शिरतानाच प्रसिद्ध जैतापुराचा सडा (Jaitapur Sada) दिसतो आणि समुद्रही. त्यामध्ये साधारण एक-दोन किमीची खाडी आणि लगेच नाणार प्रकल्पाची जागा. निसर्ग एखाद्या गावाला किती भरभरून देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अणसुरे गाव. पण, विकासाच्या पाठी धावताना हे प्रचंड नैसर्गिक सामुग्री असणारे भाग लुप्त होणार आहे.

कदाचित आपली पिढी शेवटची की जी हे पाहू शकली. सोमण यांच्या घरात प्रवेश करताच आधुनिक, फ्रेश मस्त कोकम सरबत, आंबा सरबत, तळलेले गरे आणि पोहे असा नाश्ता हजर. तो खातोय तोच सोमण आले अन् म्हणाले, चला वाडी बघायला. वाडीत गेलो तर जशाचा तसा ठेवलेला जुना वाडा, साधारण शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचा. शूटिंगसाठी निर्माते वेडे होतील, असा वाडा. सर्वांत काय आवडले तर पायरहाट, बरोबर विहिरीच्या मध्यावर मोठे लाकडी सायकलसारखे चाक. चाकाचे एक टोक विहिरीतील पाणी काढण्याच्या भांड्याला दोरीने बांधलेले. आपण सायकल चालवतो तशी सायकल चालवायची की, मस्त कातळातील गोडे पाणी भराभर येऊ लागते. किती लाखो वर्षांपूर्वी हे शुद्ध पाणी तयार झाले असेल, असा प्रश्न पडतो तो आपल्याला निसर्ग मानवी उत्क्रांतीच्या चक्रातून पृष्ठभागावर आणून देतो.

आम्ही त्याच निसर्गाला पेट्रोरिफायनरी नावाचे विष बहाल करायला चाललो आहोत. सगळ्यात अणसुऱ्यात मजा म्हणजे इथे कोळी लोक छोटी तराफ्यासारखी होडी घेऊन जातात. त्यांना पैसे देऊन मस्त फिल्डिंग लावली की झालं. अणसुऱ्याच्या खाडीत मिळणारे छोटे-छोटे ताजे मासे तराफ्यावर मस्त तिखट फ्राय करून खाण्यास मिळतात. तेव्हा निसर्गाच्या अवीट चवीची अनुभूती घेतल्याचा आनंद मिळतो. अर्थात, पुढे मोठे प्रोजेक्ट आले तर हे खाडीचे वैभव नष्ट होणार हे नक्की. अणसुरे गावातून विजयदुर्ग किल्ला पाहता येतो. समुद्रात अदृश्य स्वरूपात उभी केलेली मानवी तटबंदी म्हणजे काय, त्याचे उदाहरण म्हणजे विजयदुर्ग हा अभेद्य किल्ला. हा किल्ला गाईड घेतल्याशिवाय पाहू नये. अणसुरे गावाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बागायती, मासेमारी आणि पर्यटन यावर उभी आहे. शासनाचे पर्यटन धोरण या गावात फारसे झिरपलेले नाही. त्यामुळे नकळत गावाची ठेवण आहे तशीच राहिली आहे ते पण चांगले म्हणा.

सर्वांत महत्त्‍वाचे म्‍हणजे या गावाचा हापूस आंबा, रंग, चव यात किंग आहे. तुम्ही कोणताही हापूस खा आणि या पट्ट्यातील हापूस खा, तुम्हाला फरक जाणवेलच; पण दुर्दैवाने उद्या रिफायनरी आली तर प्रचंड घडामोडी या भागात होणार आहेत आणि अर्थात, परिणामदेखील होतील. या गावातून जाता जाता एक शाळा पाहिली. अतिशय मजबूत अशी ११० वर्षे झालेली शाळा; पण विद्यार्थी नाहीत या कारणाने शाळा गेली पाच वर्षे बंद आहे. पण, शाळा अगदी खाडीकिनारी. स्वातंत्र्य संग्रामात कितीतरी येथील विद्यार्थी खाडीतील पाण्याशी खेळत स्वातंत्र्याच्या गुजगोष्टी करत मोठे झाले असतील. कदाचित स्वातंत्र्यसमरातही सहभागी पण झाले असतील.

आज तीच शाळा तिची वीटही ढळलेली नाही. केवळ मुले नाहीत म्हणून बंद पाहून खूप वाईट वाटले. अणसुरे गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणी तीन-चार एकरांत डोंगर उतारावर कुसुंब वृक्षाची देवराई आहे. पक्षी निरीक्षकांसाठी ही देवराई म्हणजे आमंत्रण. कारण असंख्य पक्षी येथे पाहायला मिळतात. अत्यंत बहुपयोगी असा हा वृक्ष आहे. ही वनराई जरूर पाहा कधीतरी. अणसुरे कोकणचे प्रतिनिधित्व हे गाव करते. असंख्य प्राचीन परंपरा, निसर्गाने निसर्गासाठी जपलेली संपत्ती म्हणजे हे गाव. कधी सवड काढून जरूर पहा.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT