Kajirda Ghat
Kajirda Ghat esakal
कोकण

काजिर्डा घाट रस्ता कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित! घाटमाथ्यावर जाण्यासाठी 'या' तीन जिल्ह्यांना जोडणारा हा आहे पर्यायी मार्ग

राजेंद्र बाईत

घाटमाथ्याला जोडणारा अणुस्कुरा घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने कोसळणार्‍या दरडींमुळे धोकादायक झालेला आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर (Rajapur) तालुक्यातील काजिर्डा घाट (Kajirda Ghat) रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. घाटमाथ्यावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला काजिर्डा घाट व्हावा म्हणून गेली २० वर्षे नागरिकांनी प्रयत्न केले. काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

घाटरस्त्याच्या निर्मितीसाठी आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणासाठी निविदा मागवल्या आहेत; मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे ठेकेदार निश्‍चिती आणि संबंधित कामाची वर्कऑर्डर याचे घोडे अडल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Department of Public Works) देण्यात आली. सर्वेक्षणाच्या कामाला जूनचाच मुहूर्त मिळणार हे स्पष्ट झाले.

सुमारे १३०० लोकवस्ती असलेला काजिर्डा गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला आहे. कोकणातील (Konkan Road) लोकजीवनाने भरलेला हा गाव शेकडो फुटावरून अविरतपणे बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आला आहे.

३५ किलोमीटरचे अंतर वाचते

काजिर्डा घाटातून जाणारा घाटरस्ता राजापूर-पाचल-मूर- काजिर्डा-पडसाळी-भोगाव करत पुढे कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जातो. अणुस्कुरा घाटातून जाणाऱ्या रस्त्याच्या तुलनेमध्ये काजिर्डा घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे सुमारे ३५ कि.मी.चे अंतर वाचते. त्याच्यातून वेळेसह खर्चाचीही बचत करणारा हा रस्ता राजापूर ते काजिर्ड्यापर्यंत झालेला आहे. पुढे पडसाळी ते भोगाव-कोल्हापूर असा झालेला आहे; मात्र, त्यामध्ये असलेला घाटातील काजिर्डा ते पडसाळी हा सुमारे साडेतीन कि.मी.चा रस्ता झालेला नसून, त्याचा ग्रामस्थांकडून पायवाट म्हणून उपयोग केला जातो.

बैल या मार्गातून येणे बंद

ज्या काळामध्ये सध्यासारखे घाटरस्ते अन् मुबलक प्रमाणात वाहने नव्हती त्या वेळी काजिर्डा घाट रस्त्याचे अनन्यसाधारण महत्त्‍व होते. घाटमाथ्यावरील अनेक व्यापारी आजच्यासारखे शेतमालासह अन्य विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यासाठी येत असतं. त्या काळामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या मालाची वाहतूक बैलांवरून ओझी वाहून केली जात होती. मालवाहतूक करणारे हे बैल शॉर्टकट मार्ग म्हणून काजिर्डा घाटातून कोकणामध्ये म्हणजे घाटाच्या पायथ्याशी येत असत. कालपरत्वे मालवाहतूक करणारे बैल या मार्गातून येणे बंद झाले.

श्रमदानातून घाटरस्ता

दळणवळणासह वाहतुकीसाठी सुरक्षित आणि वेळेसह पैशाची बचत करणारा काजिर्डा घाटरस्ता व्हावा अशी गेल्या कित्येक वर्षापासून काजिर्डा ग्रामस्थांची मागणी आहे; मात्र, साऱ्यांकडून दुर्लक्षित राहिल्याने अखेर काजिर्डावासियांनी स्वतः हातामध्ये टिकाव...फावडा अन् घमेलं घेऊन दोन वर्षापूर्वी श्रमदानातून घाटरस्ता केला. श्रमदानातून घाटरस्ता करण्यासाठी काजिर्डावासीयांच्या प्रयत्नांना अनेकांचे हातभार लागले. त्यांच्या या प्रयत्नातून काजिर्डा घाटरस्ता वाहतुकीसाठी काही प्रमाणात मोकळा झालेला आहे.

...अन् गरज अधोरेखित झाली

जुलै, २०२१ मध्ये कोकणात झालेल्या अतिवृष्टीत आंबाघाटासह अन्य घाटांमध्ये दरडी कोसळून हे घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यातून, या घाटमार्गे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्राशी असलेला संपर्क आणि दळणवळण ठप्प झाले होते. राजापुरातून जाणारा अणुस्कुरा घाटमार्ग सातत्याने कोसळणाऱ्या दरडी अन् दगडी, मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आदींमुळे असुरक्षित झाला होता. त्याच्यातून, कोकण-कोल्हापूरसाठी जोडणारा एखादा भक्कम आणि सुरक्षित घाटमार्ग असावा, असा मुद्दा चर्चेत आला होता. अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला काजिर्डा घाटमार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यामध्ये कोल्हापूर-कोकण परिसराला जोडणारा भक्कम व सुरक्षित म्हणून काजिर्डा घाटाकडे सुरक्षित घाटमार्ग म्हणून महत्त्‍व प्राप्त झाले.

पर्यटनालाही चालना शक्य

घाटमाथ्याला जोडणारा शॉर्टकट मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजिर्डा घाटमार्ग रस्त्याबाबत शासनदरबारी चर्चा होऊन शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. नव्याने नियोजित असलेला काजिर्डा घाटमार्ग राजापूर-ओणी-रायपाटण-पाचल-तळवडे-मूर-काजिर्डा-पडसाळी-बाजारभोगाव-कळे-कोल्हापूर असा मार्ग असणार आहे. या नव्या प्रस्तावित रस्त्यामुळे सुमारे तीस-पस्तीस किमीचे अंतर वाचणार आहे. या घाटमार्गामूळे आजूबाजूच्या ५५-६० गावांना कोल्हापूरशी संपर्काच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. त्याचवेळी काजिर्डा गावामध्ये घाटाच्या पायथ्याशी धरण प्रकल्प आहे. त्याला वळसा घालून वरच्या बाजूने घाटातून वाहने जा-ये करणार आहेत. या प्रवासामध्ये घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे.

काजिर्डा घाटरस्ता सर्व्हेक्षणासाठी शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निविदाप्रक्रिया थांबलेली आहे.

-शंतनू दुधाडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

घाटमाथ्याला जोडणारा अणुस्कुरा घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने कोसळणार्‍या दरडींमुळे धोकादायक झालेला आहे. दरड कोसळून रस्त्यामध्ये माती आणि दगड येऊन रस्ता बंद झाल्यास सद्यःस्थितीमध्ये त्याला पर्यायी मार्ग नाही. अशा स्थितीमध्ये काजिर्डा घाटरस्ता झाल्यास वाहतुकीसाठी नवा एक पर्यायी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याचे लवकरात लवकर सर्व्हेक्षण होऊन घाटमार्ग उभारणीच्या प्रत्यक्ष कामालाही सुरवात व्हावी.

-अमोल गुरव, वाहनचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT