युनायटेड स्कूलमध्ये ‘ऋचा’चा स्वरवसंत
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३१ : प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण हा आत्मा असलेल्या युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागात माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी आगळ्यावेगळ्या व्यक्ती परिचय कार्यक्रमातून साजरी करण्यात आली. लहान वयातच आपल्या सुरेल गाण्याने लोकप्रियता मिळवलेल्या भिवंडीतील ऋचा घांग्रेकर हिने प. ए. सोसायटी, चिपळूण संचालित युनायटेड हायस्कूलच्या गुरुकुल विभागातील आपल्या प्रसन्न, उत्साही आणि आत्मविश्वासपूर्वक उपस्थितीने संस्मरणीय केली.
गाणी, गप्पागोष्टी असं स्वरूप असलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात आणि ऋचाचे स्वागत गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या सामूहिक गीताने झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध सर यांनी ऋचा व तिचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार अभयबुवा घांग्रेकर यांचे स्वागत केले. गुरुकुलातील गीतमंच आणि संगीत उपक्रमात नियमित सहभागी असणाऱ्या सात मुला-मुलींनी ऋचाला प्रश्न विचारत तिची अनौपचारिक मुलाखत घेतली. तिने मुलाखतीमधून तिचा संगीतप्रवास, गाण्याची आवड, पालकांचे सहकार्य, शाळेतील अभ्यास आणि गाणं यांचा समतोल, कीर्तनाची आवड अशा वेगवेगळ्या मुद्द्यांसंबंधी मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच स्वतःच्या गाण्याचे सारे श्रेय आई-वडिलांची पुण्याई आणि दत्तमहाराजांची कृपा यालाच असल्याचे नम्रपणे नमूद केले. मुलाखतीनंतर अवचिता परिमळू, प्रभुरामाने दर्शन द्यावे अशी भक्तिगीते आणि इंद्रधनुष्याचे सात रंग आणि वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई अशी बहारदार बालगीते ऋचाने सादर केली. ऋचाच्या गाण्यांना तिचे मार्गदर्शक गुरू ओंकार लेले यांनी संवादिनी साथ केली. परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सुनील जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुलातील पाचवी ते नववीमधील सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.