कोकण

-बिगस्टोरी

CD

(बिगस्टोरी)

- rat१p२.jpg-
२६O२११७१
राजापूर : बारसु येथील प्रसिद्ध कातळशिल्प.
- rat१p५.jpg-
P२६O२११७४
राजापूर : पाण्याने चारही बाजूंनी वेढलेले जुवे बेट
- rat१p६.jpg-
२६O२११७५
रत्नागिरीतील पूर्णगड किल्ला.
- rat१p७.jpg-
२६O२११७६
चिपळूणचे वैभवशाली वस्तूसंग्रहालय
-----
पर्यटक मौजेपलीकडे वळवण्याचे आव्हान
जिल्ह्यातील हटके ठिकाणे दुर्लक्षित; कातळशिल्पे, संग्रहालये, कृषी विद्यापीठ यादीबाहेर

पर्यटन हंगामातील डिसेंबर आणि जानेवारी या काळात बंपर पर्यटक आले. त्यामुळे जिल्ह्यात अर्थव्यवहाराला खचितच चालना मिळाली, पण म्हणून हुरळून जाण्याचे कारण नाही. सुखसुविधा आणि पायाभूत सुविधा यांची कमतरता असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतील तर एकूणच ‘आतिथ्य’ वाढले अथवा वाढवले तर पर्यटकांचा लोंढा रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे येईल. सध्या पर्यटकांसाठी फार मोठ्या प्रमाणावर किंवा फार आक्रमकपणे आपल्या भागातील चांगल्या पर्यटनस्थळांचे अथवा पर्यटनासाठी उपलब्ध विविध संधी पर्याय, वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे याचे मार्केटिंग न करताही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.
यातील ८० टक्के हे मौजमजेसाठीचे पर्यटन करण्यास येतात. सर्वसाधारणपणे समुद्रकाठ सुटी घालवणे, धार्मिक स्थळांना भेटी देणे, क्वचित ऐतिहासिक स्थानांना भेटी देणे असेच पर्यटनाचे स्वरूप आहे. या दोन्ही जिल्ह्यात पर्यटकांनी आवर्जून जावे, अशी आणखी अनेक ठिकाणे आहेत. त्यांची माहिती दूरवर पोचवण्यात, त्याचे मार्केटिंग करण्यात आपण कमी पडतो का, याचा विचार करावा लागेल. एखादा उद्योजक एखादा व्यापारी पर्यटकांमुळे मालामाल झाला असेल, त्याने केलेले मार्केटिंग यशस्वीही ठरले असेल; पण ते मर्यादितच.

- टीम सकाळ, रत्नागिरी
-------
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात आलेल्या विक्रमी पर्यटकांपैकी किती जणांनी चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारकातर्फे उभारण्यात आलेले संग्रहालय पाहिले, किती पर्यटक परशुराम मंदिर पाहण्यास गेले, किती पर्यटकांनी कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली, किती पर्यटक खेडनजीक असलेल्या तीन किल्ल्यांना भेटी देते झाले, रत्नागिरीचा विचार केला तर किती पर्यटकांनी कातळशिल्पांना भेट दिली, याची आकडेवारी पाहिली तर ती एकूण आलेल्या पर्यटकांच्या पाच टक्केही नाही. याचा अर्थ अद्याप ही ठिकाणे पर्यटकांच्या गावी पोचलेली नाहीत. या जिल्ह्यात गेल्यावर ही ठिकाणे पाहिली पाहिजेत असा विचार त्यांच्या डोक्यात अद्याप घुसलेला नाही तो अर्थातच आपोआप जाणार नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

*कातळशिल्पांकडे खेचण्याचे आव्हान
कातळशिल्प म्हणजे काय? त्यामुळे एका वेगळ्या संस्कृतीचाही पदर उलगडू शकतो, हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कातळशिल्पे बघायला जाताना आपोआपच आजूबाजूचा परिसर, पक्षी, कोकणातील सौंदर्य, स्थानिक वैविध्य, आडवाटा, तेथील मंदिरे, दंतकथा आणि जाण्यासाठी आवश्यक ते साहसही गरजेचे असते. त्यामुळे पर्यटनाचे विविध आयाम यामध्येच समाविष्ट होऊ शकतात. राजापूर तालुक्यात जागतिक वारसा लाभलेली कातळशिल्पे आहेत. त्यांचा प्रचार प्रसार अद्यापही झालेला नाही. रत्नागिरी शहरात कातळशिल्प अभ्यास केंद्र आहे, तिथेही जिल्ह्यातील एकत्रित माहिती उपलब्ध आहे. याबाबत अनेक पर्यटक आजही अनभिज्ञ आहेत. चिपळूणचे संग्रहालय किती संपन्न आहे, दापोलीचे कोकण कृषी विद्यापीठ म्हणजे शेतीचे, बागायतीचे संपन्न असे दालन आहे, हे लोकांपर्यंत पर्यटकांपर्यंत नेणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न व्हायला हवेत. त्यात व्यावसायिक आले, टूर ऑपरेटर आले, कोकणासाठी अथवा कोकणचे व्हिडिओ बनवणारे हौशे-नवशे आले, समाजमाध्यमांवरील प्रभावशाली लोक आले आणि आपल्या गावाकडील कथा सांगणारे हौशी लेखकही आले. या साऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात किनारे आणि किल्ले यांच्या जोडीला किती वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे आहेत, याची माहिती सातत्याने पर्यटकांच्या गळी उतरवायला हवी. वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या स्थळापलीकडे छोटी-मोठी; पण पर्यटकांना आकर्षण ठरणारी हटके स्थळेही आहेत. या साऱ्याचे मार्केटिंग हे आता महत्त्वाचे आव्हान आहे.

*पर्यटनस्थळांना शोध आवश्यक
सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून अथांग समुद्रकिनाऱ्यापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्याला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभले आहे. येथे पुरातन मंदिरे (धुतपापेश्वर, महाकाली, कशेळीचे सूर्यमंदिर), ऐतिहासिक इंग्रज वखार, सवतकड्यासारखे धबधबे आणि गंगातीर्थासारखी वैज्ञानिक कुतूहले आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेला दापोली तालुका निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा आणि कोकणी खाद्यसंस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर वेगाने आपले स्थान पक्के करत आहे. पश्चिम महाराष्ट्रासहित पुणेकरांसाठी जवळचे आणि परवडणारे पर्यटनस्थळ म्हणून दापोलीची ओळख निर्माण झाली आहे; मात्र, वाढत्या पर्यटन ओघातही तालुक्यातील अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळे अद्याप दुर्लक्षितच आहेत. यंदाच्या पर्यटन हंगामात दापोली तालुक्यात सुमारे तीन लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. केळशी ते दाभोळपर्यंतची विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी, लाडघर, कर्दे, मुरूड आणि आंजर्ले हे समुद्रकिनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. समुद्रस्नान, वॉटरस्पोर्ट्स, निसर्गसौंदर्याचा आनंद आणि कोकणी पद्धतीच्या मासळीच्या जेवणासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत आहेत; मात्र, बहुतांश पर्यटकांचा मुक्काम दोन दिवसांचा असल्याने त्यांचा प्रवास समुद्रकिनाऱ्यांपुरताच मर्यादित राहतो. दापोली तालुक्यात सुमारे २५ ते ३० पर्यटनस्थळे असून, त्यापैकी आंजर्ले कड्यावरील गणपती, आसूद येथील केशवराज मंदिर, दाभोळची चंडिका देवी, मुरूडची दुर्गादेवी, पन्हाळेकाझी लेणी, उन्हवरे गरम पाण्याचे कुंड, कोकण कृषी विद्यापीठ ही ठिकाणे ऐतिहासिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत; मात्र, या स्थळांचा योग्य प्रचार, दिशादर्शक फलक आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे पर्यटकांचा ओघ कमी आहे. कृषी विद्यापीठाला सध्या प्रामुख्याने शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांपुरतेच पर्यटक भेट देतात.

* हर्णै बंदर, किल्ले पर्यटकांचे आकर्षण
हर्णै बंदर हे दापोलीतील पर्यटनाचे केंद्र मानले जाते. येथे येणारा प्रत्येक पर्यटक ताजी मासळी खरेदी करतोच. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी, हलवा यांसारखी मासळी पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी मोठी गर्दी होते. अनेक पर्यटक मासळीबरोबर फोटो काढून हा अनुभव संस्मरणीय करतात. हर्णै परिसरातील मासळी व्यवसायामुळे स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक आधार मिळत आहे. हर्णै परिसरात सुवर्णदुर्ग (जलदुर्ग), गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड हे चार ऐतिहासिक किल्ले आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को जागतिक वारसायादीत नोंद झाल्यामुळे या किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. बोटींद्वारे किल्ल्यावर जाण्यासाठी सुविधा असूनही वीकेंडला अपेक्षित व्यवसाय होत नसल्याचे बोटचालकांचे म्हणणे आहे. सलग सुट्यांच्या काळातच या व्यवसायाला चालना मिळते. सलग सुट्या आल्या आणि दिवसाला किमान २० ते २५ फेऱ्या प्रत्येक बोटचालकाच्या जर झाल्या तरच किमान २ ते २.५० लाखांची उलाढाल होते, असे येथील बोटचालकांनी सांगितले. तसेच दापोलीच्या किनारपट्टीवर डॉल्फिन सफर हे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. किनाऱ्यांवरील जलक्रीडा (वॉटरस्पोर्ट्स) व्यवसायातून हंगामात ३० ते ४० लाख रुपयांची उलाढाल झाली. पर्यटनवाढीमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यात सुमारे ३५० ते ४०० रिसॉर्ट्स, होमस्टे, हॉटेल्स आणि घरगुती निवासव्यवस्था असून, या पर्यटन हंगामातील उलाढाल तीस कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. मात्र, दुर्लक्षित पर्यटनस्थळांचा विकास, मूलभूत सुविधा, टुरिस्ट गाईड व्यवस्था आणि नियोजनबद्ध प्रचार झाला तर दापोलीचा पर्यटन विकास अधिक व्यापक आणि संतुलित होऊ शकतो.

*पर्यटनस्थळांच्या मार्केटिंगची गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानामध्ये गणपतीपुळे येथे १२० खोल्यांमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये सरासरी प्रतिदिन ९० टक्के पर्यटक होते. महिन्यात सुमारे आठ हजार पर्यटकांची नोंद झालेली आहे. ख्रिसमस सुटी आणि नववर्ष स्वागत या निमित्ताने जोडून सुट्या पर्यटकांच्या पथ्यावर पडल्या. या कालावधीत निवासव्यवस्था हाऊसफुल्ल होती. पुढे जानेवारी महिन्यातही पर्यटकांचा ओघ कायम होता. यावर्षी प्रथमच जानेवारीत एमटीडीसीच्या निवासस्थानी सरासरी प्रतिदिन ८० टक्के खोल्या फुल्ल होत्या. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ असून, या ठिकाणचा किनारा विस्तीर्ण व सुरक्षित आहे. त्यामुळे पर्यटकांना आनंद मिळतो. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणापासून गणपतीपुळे जवळच असल्याने सोयीसुविधाही चांगल्याप्रकारे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. गणपतीपुळे किनारी परिसरातील निवासस्थाने फुल्ल झाली की, आजूबाजूच्या परिसरातील म्हणजेच मालगुंडकडे पर्यटक वळतात; मात्र मालगुंड येथील किनारा सुरक्षित आणि विस्तीर्ण असला तरीही तिकडे फिरण्यासाठी जाणारा पर्यटक वर्ग कमी आहे. त्याचबरोबर कवी केशवसुत यांचे जन्मस्थान पाहण्याची उत्सुकता असलेला पर्यटकही मोजकाच आहे. गणपतीपुळेपासून अर्ध्या तासावर असलेल्या समुद्रकिनारी परिसरातील जयगड किल्ला, जेटी आणि कऱ्हाटेश्वर (शंकराचे मंदिर) मंदिर पाहण्यासाठी जाणारेही कमीच आहेत. जयगड किल्ला परिसरात सुविधांचा अभाव हे त्याचे एक कारण ठरू शकते. या किल्ल्यावरून विस्तीर्ण समुद्र पाहता येतो. ऐतिहासिक गोष्टीही अनुभवता येतात; मात्र या परिसराची माहिती देणाऱ्या गाईडचा अभाव ही मोठी उणीव या ठिकाणी जाणवते. रत्नागिरी तालुक्याबरोबरच रत्नागिरीतील पूर्णगड, आंबोळगड, संगमेश्वरमधील कर्णेश्वरसह आजूबाजूची गरम पाण्याची कुंडे, खेड तालुक्यातील किल्ले याबाबतची माहिती पर्यटकांमध्ये पोचणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक मोहीम शासन-प्रशासनाबरोबरच स्थानिकांकडूनही नियोजनबद्ध प्रचारप्रसार करण्याची गरज आहे.


- rat१p४.jpg-
२६O२११७३
खेड तालुक्यातील किल्ले सुमारगड

*‘दुर्गत्रिकूट’वर पर्यटकांची चढाई कमीच
खेड तालुक्यातील रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हे ‘दुर्गत्रिकूट’ निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. २०२५-२६ च्या पर्यटन हंगामात या किल्ल्यांवर गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. यंदाच्या नोव्हेंबर ते जानेवारी या काळात ट्रेकर्सचा प्रतिसाद समाधानकारक होता. विशेषतः पुणे आणि मुंबईतील व्यावसायिक ट्रेकिंग संस्थांनी आयोजित केलेल्या ‘रेंज ट्रेक्स’ला मोठी पसंती मिळाली. रसाळगडापर्यंत पक्का रस्ता झाल्याने तिथे कौटुंबिक पर्यटकांचा वावर वाढला असला तरी सुमारगड आणि महिपतगडच्या आव्हानात्मक वाटांमुळे तिथे केवळ अनुभवी ट्रेकर्सचीच पावले वळली. साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान हवामान आल्हाददायक आणि निसर्ग हिरवागार असल्याने पर्यटकांचा ओघ सर्वाधिक असतो. पावसाळ्यात दाट धुके आणि निसरड्या वाटांमुळे केवळ धाडसी ट्रेकर्सच इथे दिसतात, तर उन्हाळ्यात तीव्र झळा आणि सुमारगडसारख्या ठिकाणी जाणवणारी पाणीटंचाईमुळे पर्यटकांची संख्या घटते. वर्षाकाठी साधारण ५ हजार ते ७ हजार पर्यटक या दुर्गांना भेट देतात, ज्यापैकी ६० ते ७० टक्के गर्दी एकट्या रसाळगडावर असते. शनिवारी आणि रविवारी ही संख्या सर्वाधिक असून, एका दिवसात साधारण १०० ते १५० लोक गडावर हजेरी लावतात. रायगड किंवा प्रतापगडाच्या तुलनेत इथे पर्यटकांची संख्या कमी असण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. सुमारगड आणि महिपतगडची चढाई तांत्रिकदृष्ट्या कठीण असून तिथे दोराचा आधार घ्यावा लागतो. तसेच, लोणावळा किंवा महाबळेश्वरच्या तुलनेत या भागाच्या प्रसिद्धीचा अभाव जाणवतो. हे किल्ले जावळीच्या घनदाट जंगलात असल्याने वन्यप्राण्यांची भीती आणि वाट चुकण्याची शक्यता असते, तसेच रसाळगड वगळता इतर दोन किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोयीचे रस्ते उपलब्ध नाहीत. रसाळगड हा रस्ते आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. महिपतगडावर मंदिरात राहण्याची सोय असली तरी तिथली चढाई थकवणारी आहे. सुमारगड हा आजही अत्यंत दुर्गम असून, तिथे पाणी आणि राहण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे केवळ जिद्दी ट्रेकर्सच तिथे मुक्काम करण्याचे धाडस करतात.
---

- rat१p३.jpg-
२६O२११७२
निसर्गसौदर्यांने नटलेला रघुवीर घाट

*रघुवीर घाटाचे सौंदर्य दुर्लक्षितच
खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. मात्र, महाबळेश्वर किंवा लोणावळ्यासारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या तुलनेत येथील चित्र थोडे वेगळे आहे. या ठिकाणी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गडप्रेमी आणि गडभ्रमंती करणारे लोक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, ज्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यांना पर्यटक प्राधान्य देतात, त्या तुलनेत रघुवीर घाटाकडे येणारा वर्ग कमीच आहे. हा घाट खेड शहरापासून खूपच दूरवर आहे. येथील मार्ग जंगल भागातून जातो आणि दुर्गम अशी खोल दरीही आहे. दरडी कोसळण्याची भीती कायम असते. तर अनेकांना याची माहितीही नाही. पावसाळ्यात घाटातून प्रवास करता येत नाही. त्याचबरोबर सोयीसुविधांचाही अभाव आहे. घाटात सुरक्षेविषयक उपाययोजना नाहीत आणि माहिती केंद्रे नाहीत. या ठिकाणी वर्षभरात २५ ते ३० हजार पर्यटक येतात तर ट्रेकर्स व गडप्रेमी १० ते १२ हजार भेट देतात. याबाबत खेड येथील सूरज जोगळे म्हणाले, रघुवीर घाट हा निसर्गसौंदर्याने नटलेला असला तरी, तिथे जबाबदार पर्यटन होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तेथे प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत. जेणेकरून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.
---
कोट १
दुर्लक्षित पर्यटनस्थळी पर्यटनवाढीसाठी पर्यटकांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच दोन दिवस थांबणारा पर्यटक अजून चार दिवस थांबू शकतो त्यामुळे अर्थार्जन वाढेल. टुरिस्ट गाईडचीदेखील नितांत गरज आहे. त्यातून एक चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो.
- सचिन तोडणकर, सरपंच, हॉटेल व्यावसायिक कर्दे
---
कोट २
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वॉटरस्पोर्ट्सच्या संख्येमध्येदेखील वाढ झाली आहे. फक्त मुरूड समुद्रकिनारी सहा वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण समुद्राकडे आहे. केशवराजसारख्या ठिकाणी पर्यटक वाढवायचा असेल तर उत्तम टुरिस्ट गाईड आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था होणे अपेक्षित आहे.
- संदेश घाग, वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक, मुरूड
---
कोट ३
यावर्षी जानेवारी महिन्यातही पर्यटक मोठ्याप्रमाणात आलेले आहेत. त्यांची पहिली पसंत किनारी भागांनाच असते. चांगल्या सोयसुविधा, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्यास अडचण नाही, अशी ठिकाणे पर्यटकांकडून निवडली जात असल्याचे दिसते. समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या पर्यटनस्थळांच्या मार्केटिंगसाठी एमटीडीसी प्रयत्न करत आहेत. कातळशिल्प प्रचारासाठी निसर्गयात्री संस्थेबरोबर एमटीडीसीने करार केलेला आहे.
- दीपक माने, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, कोकण विभाग
---
कोट ४
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली हे कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरू शकते. मात्र तुरळक पर्यटक हे विद्यापीठ पाहण्यासाठी येतात. प्रामुख्याने मुंबई आणि पुण्याचे पर्यटक येत असतात. वर्षभरात २० हजार पर्यटक आले तर त्यामध्ये शेतकरी, अभ्यासक, विद्यार्थी यांची संख्या मोठी आहे. पर्यटक म्हणून आलेले काही विद्यापीठाकडून माहिती घेऊन यशस्वी शेतकरी झाले असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
- डॉ. संतोष वरवडेकर, कृषी विस्तार शिक्षण विभागप्रमुख
---
कोट ५
किल्ले संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन काम करणे आवश्यक आहे. सुमारगड व महिपतगडावर जाणारे रस्ते आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. त्यातून स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- वैभव सागवेकर, सामाजिक कार्यकर्ते
----
कोट ६
राजापुरातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा देशी-परदेशी पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. स्थानिक पातळीवर आर्थिक उलाढाल आणि पर्यटन व्यवसायवृद्धी होण्यासाठी पर्यटनस्थळ परिसरामध्ये दर्जेदार रस्ते, हॉटेल्स, लॉजिंग, वाहतूक व्यवस्था, गाईड आदींकडे लक्ष दिले पाहिजे. तसे झाल्यास पर्यटन व्यवसायाला अधिक गती मिळेल. स्थानिक ग्रामस्थांनीही पर्यटन व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.

- धनंजय मराठे, पर्यटन अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

काय करते ओक कुटुंबाची होणारी मोठी सून? सिनेसृष्टीपासून आहे कोसो दूर; प्रसाद - मंजिरीने शेअर व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे-पाटील यांची मागणी

Gold Loan : बँकेत जर 10 ग्रॅम सोनं गहाण ठेवल तर किती कर्ज मिळतं? किती पैसे वापरायला मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याचा कायापालट! ४.४३ कोटींच्या निधीतून उभारणार भव्य नवीन इमारत

SCROLL FOR NEXT