ग्रामपंचायतींच्या तिजोरीत महिनाभरात ३९ कोटी
१५ वित्त आयोगाचा दुसरा हप्ता प्राप्त ; महिनाभरापूर्वी पहिला हप्ता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः जिल्ह्यातील ७५७ ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून ‘अबंधित’ निधीचा १५ कोटी ७१ लाख ४० हजार ३२४ रुपयांचा दुसरा हप्ता प्राप्त झाला आहे. महिनाभरापूर्वीच ‘बंधित’ निधीचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतींच्या तिजोरीत मोठी भर पडली होती.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही स्तरांसाठी दरवर्षी बंधितचे दोन आणि अबंधितचे दोन अशा चार टप्प्यांत निधी दिला जातो. नियमानुसार एकूण निधीपैकी ८० टक्के वाटा थेट ग्रामपंचायतींना दिला जातो, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. या अबंधित निधीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना आता मोठी गती मिळणार आहे.
जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा पहिला हप्ता म्हणून २३ कोटी ७३ लाख ४७ हजार २६३ रुपये मिळाले होते. त्यानंतर आता दुसऱ्या हप्त्याचा १५ कोटी ७१ लाख ४० हजार ३२४ रुपयांचा अबंधित निधी प्राप्त झाल्याने, गेल्या महिनाभराच्या कालावधीत एकूण सुमारे ३९ कोटी ४४ लाख रुपये ग्रामपंचायतींच्या तिजोरीत जमा झाले आहेत. हा अबंधित निधी खर्च करताना ग्रामपंचायतींनी त्यांच्या विकास आराखड्यानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे. तसेच २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत यातील किमान ५० टक्के निधी खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सध्या प्रशासक असल्याने त्यांना या टप्प्यात निधी मिळालेला नाही; निवडणुकीनंतरच या संस्थांना हा निधी प्राप्त होणार आहे.
-----
चौकट
अबंधित निधीचा उपयोग
१५ व्या वित्त आयोगातील अबंधित निधी म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी थेट मिळणारा निधी होय. हा निधी विशिष्ट कामासाठी राखीव नसतो. या निधीचा वापर स्थानिक गरजांनुसार, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सुविधांवर (उदा. पथदिवे, रस्ते) स्थानिक संस्था स्वतःच्या निर्णयाने करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.