21307
संमेलनांमुळे साहित्यसेतूला बळकटी
कालिका बापट ः सावंतवाडीत ‘कोमसाप’तर्फे १९ वे विभागीय कविसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः ‘सावंतवाडीशी माझे वेगळे नाते आहे. संत मियाँसाब हे माझ्या वडिलांचे गुरू होते. त्यामुळे या भूमीशी आमचे आध्यात्मिक नाते जोडले गेले आहे. गोव्याची मूळ भाषा मराठीच आहे. कोकणी बोलली जात असली तरी मराठीतूनच मोठ्या प्रमाणात लिखाण होते. महाराष्ट्र, सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्यातील हा साहित्यसेतू अधिक बळकट व्हायला हवा,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री कालिका बापट यांनी विभागीय कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्था आयोजित ‘आरती’ मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वे विभागीय कवयित्री संमेलन शनिवारी (ता. ३१) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. कवयित्री कालिका बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. पल्लवी बनसोडे होत्या.
या सोहळ्याला पूजा दिवाण, श्रुती हजारे, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. लता कदम, सरिता पवार, डॉ. सई लळीत, मनीषा पाटील, ॲड. अंजली मुतालिक, मीनाक्षी अळवणी, आर्या बागवे, श्वेतल परब, मेघना राऊळ, मंगल नाईक-जोशी, ऋतुजा भोसले, प्रा. शालिनी मोहळ यांच्यासह अनेक मान्यवर कवयित्री उपस्थित होत्या. कवयित्री व ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘आरती’ मासिकाच्या श्रीया भागवत यांनी कथालेखन स्पर्धेचे निकाल जाहीर करून विजेत्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, प्रज्ञा मातोंडकर यांनी कवयित्रींच्या काव्यमैफलीचे बहारदार सूत्रसंचालन केले. यामध्ये आर्या बागवे, आदिती मसुरकर, चिन्मयी कुलकर्णी यांच्यासह अनेक निमंत्रित कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. मेघना राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख श्वेतल परब, ऋतुजा भोसले यांनी करून दिली. ‘आरती’चे भरत गावडे, श्रीराम वाचन मंदिर कार्यवाह रमेश बोंद्रे, ‘कोमसाप’ शाखा उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी उपस्थित कवयित्रींचा सन्मान केला. संमेलन आयोजक उषा परब यांनी कालिका बापट व डॉ. बनसोडेंसह कवयित्रींचा सत्कार केला.
---
अशा संमेलनांची आवश्यकता
कालिका बापट यांनी ‘माझ्या गोव्याच्या भूमीत...’ ही कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. ज्येष्ठ कवयित्री उषा परब यांनी प्रास्ताविक केले. ‘स्त्रियांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संस्था खूप कमी आहेत. त्याला ‘कोमसाप’ हा अपवाद आहे. महिलांची लेखनाची दिशा आणि दशा समजून घेण्यासाठी अशा संमेलनांची गरज आहे. या १९ व्या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांतील कवयित्री एकत्र येतात, ही आनंदाची बाब आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.