Australia vs India Boxing Day Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ या कसोटी मालिकेतील चौथा सामना २६ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. बॉक्सिंग डेला सुरू होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी मालिकेच्या आणि आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीनेही महत्त्वाचा सामना आहे.
सध्या या मालिकेत तीन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी आहे. दरम्यान, या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बनमध्ये गॅबा स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात पावसामुळे बराच काळ वाया गेला होता. त्यामुळे हा सामनाही अनिर्णित राहिला.
याआधीच्या सामन्यांमध्येही पावसाचा अडथळा पाहायला मिळाला. त्यामुळे आता मेलबर्नलाही असाच पावसाचा अडथळा येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
चौथा कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहे. Accuweather नुसार पहिल्या दिवशी तरी पावसाची शक्यता नाही, तसेच वातावरण उष्ण असेल. त्याचबरोबर तापमानही जवळपास ३७ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असेल.
दुसऱ्या दिवशी तापमान २१ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असेल, तसेच पावसाची शक्यता २५ टक्के आहे. तिसऱ्या दिवशीही २४ डिग्री सेल्सियस दरम्यान तापमान असेल, तसेच ढगाळ वातावरण राहिल. पावसाची शक्यताही २५ टक्के आहे.
चौथ्या दिवशी चांगला हवेशीर वातावरण असेल, तसेच तापमान २५ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असेल. चौथ्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे.पाचव्या दिवशी चांगला सूर्यप्रकाश असेल आणि पावसाची शक्यताही कमी आहे. तापमान २७ डिग्री सेल्सियस दरम्यान असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ११० कसोटी सामने आत्तापर्यंत खेळवण्यात आले आहेत. यातील ३३ सामन्यात भारताने, तर ४६ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. १ सामना बरोबरीत सुटला असून ३० सामने अनिर्णित राहिले आहेत.
याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये या दोन संघात आत्तापर्यंत ५५ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १० सामन्यात भारताने विजय मिळवला असून ३१ सामने भारत पराभूत झाला आहे. त्याचबरोबर १३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारतासाठी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक आहे. तसेच ऑस्ट्रेलियासाही आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या दोन संघातील आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी विजयाची गरज आहे.
याशिवाय मेलबर्न कसोटी जिंकणारा संघाला मालिकेतील पराभव देखील टाळता येणार आहे. यामुळेच हा सामना महत्त्वाचा मानला जात आहे.
ऑस्ट्रेलियाने त्यांचा प्लेइंग इलेव्हन संघ आधीच जाहीर केला आहे. पण अद्याप भारताची प्लेइंग इलेव्हन जाहीर झालेली नाही.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) - उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नेथन लायन, स्टॉट बोलंड
भारत - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, तनुष कोटियन, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा