Will Rohit Sharma play 2027 ODI World Cup? भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या भविष्याच्या चर्चांबाबतचे सर्व पत्ते राखून ठेवले आहेत. निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना रोहितने अजुनही २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली किंवा संघातून त्याला वगळले जाईल, या चर्चांवरही कधी भाष्य केले नाही. पण, आज त्याने २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मौन सोडले. मुंबईत एका कार्यक्रमात रोहितने एका वाक्यात विषय संपवून टाकला.
रोहितची २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत निवड झाली नव्हती आणि ती खंत त्याला आयुष्यभर टोचत होती. २०१९ मध्ये रोहितने सर्वोत्तम कामगिरी करताना संघाला जेतेपदाच्या दिशेने नेले होते, परंतु जेतेपदाची ट्रॉफी त्याच्यापासून दूर राहिली. २०२३ मध्ये भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली अपराजीत राहून अंतिम फेरीत पोहोचला, परंतु ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर रोहितच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. पण, रोहितच्या मनात वन डे वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न अजूनही कायम आहे आणि २०२७ मध्ये ते त्याला पूर्ण करायचे आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वर्ल्ड कप विजयानंतर त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केला आणि मागच्या वर्षी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. आता तो फक्त वन डे क्रिकेट खेळतोय आणि २०२७च्या वर्ल्ड कपसाठी त्याने तंदुरुस्तीवर भर दिलेला पाहायला मिळाला आहे. पण, संघातील त्याच्या स्थानाबाबत निवड समिती व संघ व्यवस्थापन हे फार सकारात्मक दिसत नाही.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील वन डे मालिका, रोहितची शेवटची असेल अशी चर्चा होती. पण, रोहितने लॉर्ड्सवर शतक झळकावून टीकाकारांना उत्तर दिले. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत रोहितच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात होते. पण, बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी, पुन्हा एकदा रोहितची पाठराखण केली आणि निवृत्तीच्या चर्चा फेटाळल्या. त्यात आज रोहितने पहिल्यांदा या विषयी मौन सोडले. तो म्हणाला,'ऑक्टोबर २०२७ ला अजून बराच वेळ आहे, तेव्हा बघूया.'
२०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित खेळणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.