Ashadhi Wari 2024 esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024: विठ्ठलाच्या नगरीला पंढरपूर नव्हे तर 'या' नावाने ओळखलं जायचं? जाणून घ्या यामागील इतिहास

Pandharpur Village History : पंढरपुरात पांडुरंग भेटतो म्हणून या गावाला या तीर्थक्षेत्राला पंढरपूर असं म्हटलं जातं

सकाळ डिजिटल टीम

Ashadhi Wari 2024:

विठुरायाची पंढरी नगरी ही वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला अनेक वारकरी तहानभूक हरून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. विठ्ठलाच्या पायांवर डोके ठेवून वारकरी नतमस्तक होतात आणि त्यांची वारी सफल झाली असं मनोमनी म्हणतात. शेकडो वर्ष ही वारी अखंड सुरू आहे ती या वारकऱ्यांच्या भक्तीमुळेच होय.  

आषाढ महिन्याची चाहूल लागताच अनेक वारकरी पंढरीकडे वाटचाल करू लागतात. काही वारकरी चालत दिंडीतून, तर काही आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरीनागरीला भेट देतात. त्या लाखो लोकांच्या गर्दीत देवाच्या पायापर्यंत जायला मिळालं नाही. तरी पंढरीत जाऊन आलो त्यामुळे विठ्ठला भेटला अशा अनेकांची भावना असते. (Ashadhi Wari 2024)

अनेक वारकरी जेव्हा पंढरीकडे वाटचाल करतात. तेव्हा विठोबा पंढरीत नाही तर तो आमच्या सोबत या वारीतच आहे असं ते म्हणतात. कारण त्यांना वारीत देव भेटतो त्यामुळे वारीत भेटणारा प्रत्येकाला ते माऊली-माऊलीच म्हणतात. पण या पंढरी नगरीला पूर्वीपासूनच पंढरपूर हे नाव नाहीये. त्याला वेगळ्याच नावाने संबोधलं जात होतं. नक्की काय आहे पंढरपूरचं पौराणिक नाव आणि त्यामागील गोष्ट जाणून घेऊयात.

पंढरपुरात पांडुरंग भेटतो म्हणून या गावाला या तीर्थक्षेत्राला पंढरपूर असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पंढरपूरचं पौराणिक नाव हे पंडरगे असं होतं. स्कांद 'पांडुरंगमाहात्म्या' तही 'पांडुरंग' हे विठ्ठलाचे पर्यायनाम म्हणून आलेले असले, तरी मुळात ते क्षेत्राचेच नाव होते.

'पांडुरंग विठ्ठल' हे 'काशी विश्वनाथ' यासारखे नाव होते. काशी विश्वनाथ म्हणजे काशीचा विश्वनाथ, त्याचप्रमाणे 'पांडुरंग विठ्ठल' म्हणजे पांडुरंग नामक क्षेत्रातला विठ्ठल, असा अर्थ होतो. परंतु ज्याप्रमाणे 'तिरूमलै वेंकटेश' यातील 'तिरूमलै' हे वेंकटशक्षेत्राचे नावही आहे.

पुढे वेंकटेशभक्तांच्या मनः कोषात वेंकटेशाचेच एक पर्यायनाम बनले आणि वेंकटेशाच्या भक्तिक्षेत्रात अनेकांनी 'तिरुमल' (तिरुमलनायक), त्रिमल अशी विशेषनामे मोठ्या श्रद्धेने व्यक्तींना देण्याची प्रथा चालू ठेवली.

त्याचप्रमाणे 'पांडुरंग विठ्ठल' या नावातील 'पांडुरंग' हे क्षेत्रवाचक पूर्वपद पुढे देवाचे म्हणजे विठ्ठलाचे एक अत्यंत लोकप्रिय पर्यायनाम बनले.

स्कांदपुराण आणि 'पांडुरंगमाहात्म्यां' त पांडुरंगक्षेत्र आणि पुंडरीकक्षेत्र अधवा पौंडरीकक्षेत्र अशी क्षेत्रनामे आलेली आहेत. पाद्य माहात्म्यात (अ. १ व २) या क्षेत्राची डींडीरवन, लोहदंडक्षेत्र, लक्ष्मीतीर्थ व मल्लिकार्जुनवन अशीही नावे आलेली आहेत. ही नावे पंढरपुरातील काही स्थानांच्या, भागांच्या आणि लक्षणीय देवतांच्या परिसरांचे महत्त्व नोंदवणारी आहेत.

या नावांचे आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कथांचे स्पष्टीकरण पुढे योग्य त्या संदर्भात आपणांस क्रमाक्रमाने मिळत राहणार आहेच. पांडुरंगक्षेत्र आणि पुंडरीकक्षेत्र  पौंडरीकक्षेत्र ही दोनच नावे संपूर्ण पंढरपूर क्षेत्राची नावे म्हणून वापरली गेली आहेत.

पंढरपुरातील व पंढरपूराविषयक शिलालेखांत पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरी, पांडरीपूर अशी या क्षेत्राची नावे आलेली असली तरी, होयसळवंशीय वीर सोमेश्वर यादवाच्या लेखात कन्नड व संस्कृत अशा दोन्ही भाषांत 'पंडरगे' असे नाव योजले आहे.

हेच या क्षेत्राचे मूळ नाव आहे आणि ते हिप्परगे, सोन्नलिगे, कळबरगे इत्यादी कन्नड ग्रामनामांप्रमाणे पंढरपूरचे 'कानडेपण' स्पष्ट करणारे आहे. यात मुळीच संशय नाही. पंढरपूर या विठ्ठलाच्या क्षेत्राचे 'पंडरगे' हे मूळ कन्नड नाव असल्याचा हा अभिलेखीय पुरावा आहे.

हा पुरावा असे स्पष्टपणे सिद्ध करतो की, पांडुरंग, पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पुंडरीक, इत्यादी सर्व शब्द अन् त्या शब्दांतून सूचित होणाऱ्या धारणा 'पंडरगे'तून उगम पावल्या आहेत.

विठ्ठलक्षेत्र असलेल्या 'पंडरगे'च्या संस्कृतीकरणाने जसा पुंडलिकाला जन्म दिला होता, तसाच पांडुरंग या क्षेत्रनामालाही जन्म दिला होता. आज आपण 'पांडुरंग' हे विठ्ठलाचे पर्यायनाम मानतो; परंतु प्रारंभी काही काळ तरी ते 'पंडरगे' या क्षेत्र नामाचेच, संस्कृतीकरण झालेले पर्यायनाम होते. पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर याऐवजी केवळ 'पांडुरंग' एवढीच संज्ञा पंढरीसाठी वापरली जात होती.

नामदेवगाथ्यात वाराणसी अन् पंढरी यांच्या माहात्म्यतेची तुलना करणारा एक अभंग पंढरीमाहात्म्य गाण्याच्या निमित्ताने आलेला आहे. या अभंगात नामदेवांनी 'पांडुरंग' हा शब्द पंढरी क्षेत्र या अर्थाने अनेकदा वापरला आहे.

(संबंधित माहिती रा.चि.ढेरे यांच्या श्री विठ्ठल- एक महासमन्वय या पुस्तकातून घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT