Farmer boys face marriage difficulties in rural areas esakal
लाइफस्टाइल

Farmers Marriage Problem : शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात कारभारीण मिळणं झालं कठीण, नेमकं प्रकरण काय?

Farmer boys face marriage difficulties in rural areas : शेतकरी मुलांची मात्र चांगलीच फरफट होत असून त्यांना मुलगी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. सध्या नोकरी करणाऱ्यांसह व्यावसायिकांना मुलींच्या कुटुंबीयांकडून प्राधान्य दिले जात असून, ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ असे मुलीही म्हणताना दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सचिन निकम : कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह आटोपताच विवाह सोहळ्यांना सुरवात झाली आहे. त्यामुळे उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. मात्र शेतकरी मुलांची मात्र चांगलीच फरफट होत असून त्यांना मुलगी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. सध्या नोकरी करणाऱ्यांसह व्यावसायिकांना मुलींच्या कुटुंबीयांकडून प्राधान्य दिले जात असून, ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ असे मुलीही म्हणताना दिसत आहे. परिणामी अनेक शेतकरी तरुणांची अवस्था ओसाड माळरानासारखी झाली आहे.

अलीकडे जोडीदार निवडताना मुलींना नोकरीसह मुलाकडे शेतीही हवी असते. मात्र, शेतकरी नवरा त्यांना नको आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सामाजिक समस्या जटिल झाली आहे. शिकलेल्या मुली व त्यांचे पालक आपल्या मुलीसाठी शिकलेला व सरकारी नोकरी व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला असला तरी चालेल; पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार तर कनिष्ठ नोकरी समजली जायची. आता मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे.

वधू-वर सूचक केंद्रांमध्ये नावनोंदणी वाढू लागली आहे. पूर्वी ग्रामीण भागातील तरुण वधू-वर सूचक केंद्रामध्ये सहसा नोंदणी करीत नव्हते. मात्र आता वधू मिळत नसल्याने समाजातील वधू-वर सूचक केंद्रामध्ये नोंदणी वाढली आहे. शेतकरी ही नातेवाईकांकडे, ‘एखादी मुलगी पाहा हो,’ असा सूर आळवत आहेत.

अल्पभूधारक शेतकरी तरुणांचे हाल

समाजातील मुलींचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील तरुणांना वधू मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक गावात एक ते पाच एकरपर्यंत शेती असलेल्या तरुणांना तर मुलगी मिळणे कठीण झाले असून यातील अनेक तरुणांच्या वयामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एजंटांकरवी अन्य जातीतील मुलींच्या पालकांना पैसे देऊन विवाह करणे सुरू झाले आहे.

मुलींना हुंडा देण्याची वेळ

हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा आहे, तरीही समाजात आतापर्यंत विविध नावाखाली हुंडा घेतला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. मुलींच्या कुटुंबाकडून यापूर्वी भरमसाठ हुंडा घेतला जात होता. त्यामुळे अनेक पालकांचे दिवाळे निघायचे. मात्र सध्या मुली कमी झाल्याने दोन्ही बाजूंचा लग्नाचा खर्च करून मुलींच्या वडिलांना दोन ते तीन लाख रुपये देण्यासही अनेक पालक तयार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात अशा पद्धतीने अनेक विवाह पारही पडले आहेत.

फसवणुकीच्या प्रकारात वाढ

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने ग्रामीण भागात अनेक तरुणांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून पैसे, दागिने घेऊन लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच वधू पसार होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुलींच्या अपेक्षा वाढल्या

सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलींच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. उच्चशिक्षित, नोकरी, निर्व्यसनी, घरंदाज, कमविता मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे शेतकरी शेतमजूर वरांची कुचंबणा होताना दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो हिंसाचार...

Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

SCROLL FOR NEXT