Hatkanangale Sangli Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha: हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! 'राजकारण' फुरसतीनं करायचा विषय नाही, तर..

सेनेच्या तुलनेत काँग्रेसचा सांगलीतील बेस पक्का आहे. सतरावेळा काँग्रेसने सांगली लोकसभा जिंकली आहे. वसंतदादांचा जिल्ह्यावर प्रभाव आहे, तरीही विशाल यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena) केलेला पेच काँग्रेसला सुटेना.

शेखर जोशी

Sangli Lok Sabha Constituency : सांगली लोकसभा मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena) केलेला पेच काँग्रेसला सुटेना. हातकणंगले मतदार संघातील पेच आणखी वेगळा आहे. सांगलीत विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे; तर तिकडे राजू शेट्टींना (Raju Shetti) महायुती, महाआघाडीच्या पायघड्या घालून झाल्या. दोघेही २०१९ ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते. दोघेही मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले.

फरक इतकाच की शेट्टी पराभवानंतर पायाला भिंगरी बांधून फिरले, राबले, संघर्ष करत राहिले. विशाल यांनी मैदानात यायला उशीर केला. ठाम भूमिका घेतली नाही. ऐनवेळी उचल खाल्ली. राजकारण हा फुरसतीने करायचा विषय नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत उतरू इच्छिणाऱ्यांसाठी हा सूचक संदेश आहे. पराभव होत असतो, मात्र त्यातून जो जो जनमत जिंकतो, तोच पुढे टिकतो. हार कर जितने वाले को बाजीगर कहते है!

सांगली आणि हातकणंगले मतदार संघात काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारीचा घोळ सुरू आहे. सांगलीत भाजपची उमेदवारी खासदार संजय पाटील यांना जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे. विशाल पाटील काँग्रेसचा ‘हात’ मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. हातकणंगलेत राजू शेट्टींनी पाच वर्षांपूर्वीच शड्डू ठोकला होता. त्यांनी महाविकास आघाडीत यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना बाहेरून पाठिंबा हवाय.

आमदार जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे नाही, हा शेट्टींचा निर्धार आहे. शेतकरी नेता आणि कारखानदार यांची युती शेतकऱ्यांना रुचत नाही, हे त्यांना एका पराभवानंतर सुचलेले शहाणपण आहे. तेथे शिवसेना शिंदे गटाने खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा मैदानात उतरवण्याची ‘रिस्क’ घेतली आहे. ठाकरेंकडून सत्यजित पाटील यांच्या नावाची चर्चा होतेय. भाजपचे राहुल आवाडे बंडाच्या तयारीत आहेत. शेट्टींना घेरण्याचा नवा डाव आकाराला येतोय.

राजू शेट्टींनी २०१९ ला अनंत चुका केल्या, हे त्यांनीच कबूल केले आहे. साखरसम्राटांच्या मांडीला मांडी लावून बसले. जयंत पाटील आणि ते डबल सीट फिरले. ज्या शरद पवारांविरोधात रान उठवत होते, त्यांच्या भेटीला गोविंद बागेत गेले. लोकांना ते रुचले नाही. शेट्टी आता ताक फुंकून पित आहेत. त्यांना कोणाच्याही मदतीशिवाय लढू आणि जिंकू, हा आत्मविश्‍वास आला आहे. त्यामागे पाच वर्षांतील परिश्रम आहेत. अर्थात, निवडणुकीला अनेक कंगोरे असल्याने शेट्टींसाठी लढत सोपी नसेल. जातीय समीकरणे, इचलकरंजीचा अंडर करंट, साखर लॉबी असे अनेक मुद्दे आहेत. तेथे जयंत पाटील हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. त्यांना मुलगा प्रतीकसाठी हा मतदार संघ सुरक्षित करायचा आहे. त्यामुळे ते शेट्टींना पुन्हा मुळे रुजू देतील का?

मुलाला प्रतीक्षा करायला लावणे, हा मुद्दा जयंतरावांच्या किती जिव्हारी लागलाय, हेही निवडणूक प्रचारात कळेल. सांगली लोकसभा मतदार संघात अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत ताकद नसताना लावलेला रेटा अनाकलनीय असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. काँग्रेसने संजय राऊतांना खलनायक ठरवले आहे. महाविकास आघाडीला जागा जिंकायच्या आहेत की लढवायच्या आहेत, असा प्रश्‍न काँग्रेसवाले विचारत आहेत. सेनेच्या तुलनेत काँग्रेसचा सांगलीतील बेस पक्का आहे. सतरावेळा काँग्रेसने सांगली लोकसभा जिंकली आहे. वसंतदादांचा जिल्ह्यावर प्रभाव आहे, तरीही विशाल यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. त्यामागे छुपी शक्ती आहे, गुप्त खेळी आहे, चर्चा रंगते आहे. हे सगळे ग्राह्य मानले तरी विशाल यांनी २०१९ ला पराभवानंतर नव्याने बांधणी केली नाही.

चुका टाळून लोकसंग्रह वाढवला नाही, स्पष्ट शब्दांत सांगायचे, तर कष्ट घेतले नाहीत, हेदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. केवळ सहानुभूतीवर निवडणुका लढवण्याचे दिवस नाहीत. लोकसंपर्क, प्रश्‍न मांडणे, संघर्ष करणे या गोष्टी काँग्रेस विसरली आहे. सत्तेच्या मूडमधून नेते बाहेर पडले नाहीत. आता जे २००४ ला मदनभाऊंना जमले, ते २०२४ ला विशाल यांना जमेल का, तो प्रयोग ते करतील का, याची उत्तरे काही दिवसांत मिळतील. पण, निम्मी शक्ती उमेदवारी मिळवण्यासाठी खर्ची पडली आहे. जेथून राज्याची तिकिटे वाटली जायची, त्या घराला तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागतेय. ही वेळ का आली, याचे आत्मपरीक्षण काँग्रेस आणि विशाल यांनी करावे. हाच नियम खासदार संजय पाटील यांना लागू होतो.

त्यांना भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी दिली, मात्र त्याच्याविरोधात भाजपमध्ये नाराजीचा सूर तीव्र आहे. भाजपची कार्यपद्धती पाहता, नाराजांचा ‘विजय शिवतारे’ होईल, हा विश्‍वास संजयकाकांना आहे, मात्र २०१९ ला जे झाले, त्याच चुका त्यांनी पुन्हा केल्याचे दिसते. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांच्याभोवती संशयकल्लोळ सतत वाढला आहे. या सगळ्या घडामोडीत मुद्दा एकच आहे, नेत्यांना सोयीनुसार राजकारण करता येणार नाही. लोकांना गृहित धरता येणार नाही. लोक शहाणे आहेत. नेत्यांची बेरीज, अधिक कार्यकर्त्यांची बेरीज बरोबर मतांची बेरीज, हा हिशोब घालता येणार नाही. ये पब्लिक है, सब जानती है!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT