सततचे दौरे, अपुरी झोप या सगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सध्या थकवा आला असून ते आजारी पडले आहेत. यावरुनच आता सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. तसंच आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था झाल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली, ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचं वृत्त अलिबाबा आणि चाळिस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचं शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २०-२२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही, तरीही मुख्यमंत्री आजारी पडावेत, हे त्या चाळीस जणांसाठी चिंताजनक आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल, राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतर उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा ८ ऑगस्टला न्यायालयात सत्य आणि इमानदारीचाच विजय होईल. मुळात अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्यानं आणि नीतीनं खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे फडणवीसांच्या फक्त दिल्ली वाऱ्याच सुरू आहेत. गुरुवारी तर उपमुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीला गेले. इकडे मुख्यमंत्री शिंदे अचानक आजारी पडले. एकतर शिंदेंना दिल्लीची हवा मानवत नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्यानं शिंदेंना गुदमरल्यासारखं झालं असावं. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात आणि दांपत्याला सल्ले देतात. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
"पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना शिंदे यांचंच डोकं ठणकत राहील व एक दिवस त्यांना डोक्यावरचे केस उपटत बसावं लागेल. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आलाय. या प्रकरणात काय घडलं की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे, गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकून नाही. औटघटकेच्या सरकारसाठी स्ट्रेचर व अँब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरं व्हावं, त्यांना बरंच काही पाहायचं आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचं बळ देवो", असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.