पुणे - जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवत मारहाण करीत पाच लाखांची खंडणी घेण्यात आली. याप्रकरणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगावमधील 29 जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरणात महाजन यांची भूमिका तपासणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे व्यवसायाने वकील असून जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. संबंधित संस्था महाजन यांना पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. मात्र, पाटील यांनी त्यास नकार दिला. दरम्यान, संशयित आरोपींनी पाटील यांना संस्थेसंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करून पुण्यात बोलाविले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच, फिर्यादी व त्यांच्यासमवेतच्या एका व्यक्तीला गाडीत जबरदस्तीने बसवून सदाशिव पेठेतील एका सदनिकेत नेऊन तेथे हात-पाय बांधून डांबले. तसेच, फिर्यादीसमवेतच्या व्यक्तीलाही कपडे काढून डांबले. त्यांना मारहाण करीत गळ्याला, पोटाला चाकू लावला. फिर्यादीने सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर त्यांना एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पाच लाखांची खंडणी घेतली. तसेच, त्यांच्या खिशातील पैसे, सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर फिर्यादीच्या संस्थेत बेकायदा प्रवेश करून कार्यालयाचे दरवाजे तोडून मौल्यवान रेकॉर्ड तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खिशातील पाच हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून नेली. संस्थेच्या चाव्या जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
संबंधित गुन्हा जानेवारी 2018 मध्ये घडला. दोन वर्षांपासून फिर्यादी हे भीती व दबावामुळे तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. शैक्षणिक संस्था ही जळगावची आहे, परंतु अपहरण व मारहाणीची तक्रार पुण्यात दाखल झाली आहे. गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे. मात्र, महाजन यांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याचा तपास करण्यात येणार येईल.
- मच्छिंद्र चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, कोथरूड विभाग
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
गिरीश दत्तात्रेय महाजन, तानाजी केशव भोईटे, नीलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा गुलाबराव इंगळे, विजया धर्मराज यादव, जयंत फकीरराव देशमुख, निळकंठ शंकर काटकर, जयवंत पांडुरंग येवले, परमानंद दंगल साठे, भगवंतराव जगतराव देशमुख, गोकूळ पितांबर पाटील, शंकरराव माणिकराव शिंदे, सुभाष रामचंद्र पाटील, सुनील रामभाऊ भोईटे, एकनाथ फत्तू पाटील, किशोर जयवंतराव काळे, बाळू गुलाबराव शिर्के, जयवंत बाबूराव भोईटे, शिवाजी त्र्यंबकराव घुले, पितांबर सेनफळू पाटील, शीला मधुकर मराठे, महेंद्र वसंतराव भोईटे, नीलेश भोईटे यांचा हस्तक सुनील गायकवाड, शिवाजी केशव भोईटे, सुनील देवकीनंदन झंवर, रामेश्वर नाईक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम 120 ब, 331), 384, 379, 447, 448, 449, 457, 465, 467, 468, 471, 474, 504, 506/2, 511, 109 आणि 34 यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.