Sharad Pawar & Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंच्या आरोपांनुसार राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीवाद उदयास आला? समजून घ्या

भाग्यश्री राऊत

नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीवाद उदयास आला, असे वक्तव्य केले होते. शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी याच वाक्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पण, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर (establishment of NCP) खरंच राज्यात जातीवाद फोफावला का?. यासाठी आधी राष्ट्रवादीचा जन्म कसा झाला? हे जाणून घेऊया...

राष्ट्रवादीचा जन्म कसा झाला?

शरद पवार हे १९९९ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्येही त्यांचे मोठे स्थान होते. पण, सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी बंड पुकारले. काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्याकाळी पवारांना मानणारा मराठा वर्ग होता. त्यामुळेच काँग्रेसमधील अनेक मराठा नेते, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मोठे सहकार नेते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. यावेळी राष्ट्रवादी हा जातीवादी पक्ष बनल्याचा आरोप अनेकांनी केला होता. पण, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र जात हा मुद्दा कुठेही गाजला नाही. उलट काँग्रेसला जास्त मते मिळाली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत सरकार स्थापन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पवार कधी जातीवाचक बोलले का?

शरद पवार हे मुळातच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे पुरोगामी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी कोणत्याही विशिष्ट अशा जातीवर टीका केली नव्हती. पण, त्यांच्या काही वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यापैकी एक म्हणजे, २०१४ ला राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी शरद पवारांनी 'हे काय पेशव्यांचे सरकार आले', असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शरद पवार हे जातीवरून टीका करतात, असा सूर उमटला होता.

दुसरे वक्तव्य म्हणजे, ''पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात'', अशा प्रकारचं विधान २०१६ मध्ये शरद पवारांनी कोल्हापुरात केलं होतं. त्यावेळी मोठा वादंग निर्माण झाला होता. शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे पवारांवर जातीयवादाचाही आरोप झाला. पण, पवारांच्या प्रत्यक्ष कृतीमधून कधीही जातीवाद झळकला नाही. त्यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला पुढे नेले. इतकेच नाहीतर विदर्भातील बंजारा समाजाचे नाईक कुटुंब तसेच प्रफुल्ल पटेल या बिगर मराठा नेत्यांनाही पक्षात स्थान दिले. मुस्लिम समाजाच्या फौजिया खान यांना राज्यसभेत खासदारकी दिली. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी नेतृत्वाची संधी दिली. आज नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. सध्याचा विचार केला, तर राजकीय पार्श्वभूमी नसलेला आणि बिगर मराठा असलेले अमोल मिटकरी यांना फक्त नेतृत्वाच्या बळावर आमदार होण्याची संधी दिली.

सर्वच पक्षात जातीवादाला थारा?

जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, ''गेल्या काही १५ ते २० वर्षांमध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचा जो महाराष्ट्र होता, तिथे आपआपल्या सोयीनं जातीगत आयाम दिले. त्याचा लाभ घेण्याचा जवळपास सर्वच मोठमोठ्या पक्षांनी प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात जातीय राजकारण चालायचे. पण, महाराष्ट्रात तसं काही नव्हतं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण करावं, असा विचार मांडला होता. महाराष्ट्रात हा विचार पूज्यनीय मानला गेला. पण, आता मात्र मतदारसंघनिहाय जातीचं गणितं मांडली जातात. एखादा विशिष्ट नेता एखाद्या सुमदायाचा आहे, त्याच्यामागे जातीचं पाठबळ नाही, अशांना आडून लक्ष केलं जातं. सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.''

याबाबत वनराईचे विश्वस्थ गिरीश गांधी सांगतात, ''लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र आहे. क्वचितच एखादा पक्ष सुटला असेल की ज्या पक्षात जातीचा विचार केला जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीवाद फोफावला, असं म्हणणं फार धाडसाचं होईल. कारण, या पक्षामध्ये अनेक बहुजन आणि अल्पसंख्याक लोकांना स्थान मिळालं आहे. छगन भुजबळ, अरुण गुजराती यांना पक्षाने मोठे केले आहे. एखाद्या जातीचं वर्चस्व एखाद्या पक्षावर असेल किंवा त्यांची संख्या जास्त असेल तर त्या पक्षाच्या लोकांना प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे. पण, प्रत्येक पक्षाने अल्पसंख्याक लोकांना पक्षात स्थान द्यायला पाहिजे. त्यांचा सन्मान करायला पाहिजे आणि हा सन्मान राष्ट्रवादीमध्ये केला जातो.''

वनराईचे विश्वस्थ गिरीश गांधी

सर्वच पक्षामध्ये जातीवाद आहे, याला ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे देखील दुजोरा देतात. ते म्हणतात, ''सर्वच पक्षांची समीकरणं जातीच्या आधारावर ठरतात. शिवसेना होती जे जात न पाहता उमेदवारी द्यायची. सेनेमध्ये सर्व जातीजमातीची माणसं निवडून आली. राज ठाकरेंनी म्हटलं म्हणून, राष्ट्रवादीमध्ये जातीवाद आहे हे मानणे म्हणजे एक बाजू पाहणे आणि दुसऱ्या बाजूकडे डोळेझाक करणे, असे होईल. जातीचा विचार करूनच समीकरण मांडली जातात. पण, एक राष्ट्रवादीची भूमिका ही एका प्रस्थापित पक्षाप्रमाणेच राहिली आहे. त्यांनी खालच्या स्तरातील माणसे वर नेली, असं दिसत नाही. पण, जातीवादाचा विचार केला तर, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला सर्व सवर्णांचा विरोध होता. मात्र, तो विरोध पत्करून ठराव पास करणारे शरद पवार हे एकमेव होते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT