Dr. Nanasaheb Parulekar Jayanti Lecture Dr. Avinash Bhondwe
Dr. Nanasaheb Parulekar Jayanti Lecture Dr. Avinash Bhondwe esakal
महाराष्ट्र

Kolhapur : ..तर मानवी मेंदू आणि हृदय भविष्यात कारखान्यात तयार होण्याची शक्यता; डॉ. भोंडवेंचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करत होते, त्यावेळी १६४२ मध्ये पहिल्यांदा पास्कल नावाच्या संशोधकाने पहिला मेकॅनिकल कॅल्क्युलेटर तयार केला.

कोल्हापूर : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (Artificial Intelligence) अर्थात ‘एआय’मधील विविध संशोधनामुळे माणसाचे एकूणच जगणे अधिक वेगवान बनणार आहे. वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर अगदी मानवी मेंदू आणि हृदयही भविष्यात कारखान्यात तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, या साऱ्या वेगापुढे पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये जपण्याचेच सर्वात मोठे आव्हान असेल,’ असे स्पष्ट मत पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय विश्‍लेषक डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondwe) यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’चे संस्थापक, संपादक, पत्रमहर्षी डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात (Dr. Nanasaheb Parulekar Jayanti Lecture) ते बोलत होते. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला वाचकांनी मोठी गर्दी केली.

‘वैद्यकीय क्षेत्रातील ‘एआय’चा वापर आणि आव्हाने’ या विषयावर डॉ. भोंडवे यांनी अगदी साध्या व सोप्या शब्दांमध्ये संवाद साधला. बुद्धिमत्ता म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय इथंपासून ते त्यातील विविध संशोधने, भविष्यातील संधी, रोजगार आणि एकूणच आव्हाने, अशा विविध अंगांनी त्यांनी हा संवाद खुलवला.

डॉ. भोंडवे म्हणाले, ‘संगणकीय, यांत्रिकी पद्धतीबरोबरच विविध शास्त्रीय प्रक्रियांचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जाते. त्यामध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेचे अनुकरण होते. तर मनाची क्षमताही प्रतिबिंबित होते. या माध्यमातून अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने कुठलेही काम शक्य होते. एकूणच या क्षेत्राचा विचार केला तर मशिन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल लॅंग्वेज प्रोसेसिंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑगमेंटेड रिॲलिटी, चॅट बॉट ते अगदी ‘चॅट जीपीटी’पर्यंतच्या विविध संकल्पना आहेत.

सर्वच क्षेत्रांसाठी त्या वापरल्या जात असल्या तरी वैद्यकीय क्षेत्रात त्याचा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. विविध आरोग्य सेवांच्या विश्‍लेषणाचाच विचार केला तर डिजिटल कन्सल्टेशन आता सुरू झाले आहे. संगणकासमोर आपण उभे राहून आपल्या आरोग्याच्या तक्रारी सांगितल्या की तो विविध प्रश्‍नांची उत्तरे देत जाईल आणि सर्वात शेवटी आजाराची लक्षणे ओळखून हा संगणक निदान करेल आणि कुठली औषधे आणि त्याचे किती डोस घ्यायचे इथंपर्यंतच्या औषधोपचाराचा सल्ला देईल.

त्याचबरोबर नर्सिंग, विविध वैद्यकीय प्रशासकीय यंत्रणेसाठीही आता ‘एआय’चा वापर सुरू झाला आहे. मात्र, त्याचवेळी सायबर सिक्युरिटीची नैतिक जबाबदारीही स्वीकारली जात आहे. वजन कमी करण्यापासून ते वंध्यत्व निवारणापर्यंतचे उपचार या माध्यमातून शक्य झाले आहेत. अचूक निदान, औषधोपचाराबरोबरच चांगले डॉक्टर्स निर्माण करण्यासाठीचे प्रशिक्षणही या माध्यमातून आता उपलब्ध झाले आहे,’ असेही डॉ. भोंडवे म्हणाले.

‘सकाळ’ने जपली परुळेकरांची परंपरा

‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘सकाळ’चे संस्थापक, संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांची परंपरा सकाळ समूह नेटाने पुढे नेतो आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही जपले जात आहेत. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच ‘सकाळ’ची वाटचाल सुरू असून, लोकांच्या सहकार्य आणि सहभागातून बातम्यांपलीकडे जाऊन विविध उपक्रम आणि संकल्पना यशस्वी झाल्या आहेत.

पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीपासून ते अगदी दिवाळीत गरजू विक्रेत्यांचे आयुष्य उजळण्यापर्यंत ‘सकाळ’ विधायक उद्देशाने काम करतो आहे. महिला असोत किंवा कॉलेजियन तरुणाईसाठी व्यासपीठांची निर्मिती करून त्या माध्यमातून अनेक विधायक कामे उभी केली जात आहेत.’ मुख्य बातमीदार निवास चौगले यांनी आभार मानले.

भविष्यातील आजारांचा अंदाज

डॉ. भोंडवे म्हणाले, ‘चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी कॅन्सरवर उपचार नव्हते. सुरुवातीला चाळीस प्रकारची औषधे तयार झाली. मात्र, पुढे त्यातील वीसच प्राण्यांसाठी वापरता येतील, हे सिद्ध झाले. आणखी काही वर्षांनी त्यातील दोनच माणसासाठी आणि पुढे एकच औषध प्रभावी करते, याची खात्री झाली. थोडक्यात, काय तर या साऱ्या संशोधनासाठी चाळीस ते पंचेचाळीस वर्षे लागली.

पण, ‘एआय’च्या माध्यमातून एकाच वेळी अनेक प्रकारचा डाटा एकत्रित करून तत्काळ औषधांच्या चाचण्या घेऊन त्याच्या उपयुक्ततेबाबतचा निर्णय घेता येणे शक्य झाले आहे. कोरोनाच्या काळातील लसीकरणामागे हेच शास्त्रीय कारण होते. केवळ निदान आणि उपचारापलीकडेही भविष्यात आपल्याला कुठले आजार होण्याची शक्यता आहे, हे सुद्धा आता आपल्याला समजू शकणार आहे. त्यामुळे आपल्याला तत्काळ प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे शक्य होणार आहे.’

रोजगारावर परिणाम नाही..

‘वैद्यकीय क्षेत्रातील ‘एआय’च्या वापरामुळे वेळ आणि पैसेही वाचणार आहेत. मात्र, त्याचवेळी एका स्वायत्त प्रणालीचा उदय होणार आहे आणि त्यावर नैतिक मूल्ये कशी जपायची किंबहुना या प्रणालीवर नियंत्रण कसे ठेवायचे,’ हे एक आव्हान असेल. रोजगार कमी होणार नाहीत. मात्र, आपल्याकडे कुठली कौशल्ये असावीत, हे ओळखून आपल्याला त्यासाठीचे शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

निदान आणि उपचार जरी झाले तरी त्याची खात्री कशी करून घेणार, हा प्रश्‍नही अनुत्तरीतच राहणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि रुग्णातील संवाद आणि एकमेकांवरील विश्‍वास महत्त्वाचा असतो. मात्र, कुठलाही संगणक तो देऊ शकत नाही. शंकाचे वैयक्तिक निरसनही अशक्य आहे. त्यामुळे डॉक्टर विरुद्ध ‘एआय’ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मानवी मूल्ये आणि अधिकारांची जाणीव ठेवून ‘डेटा एथिक्स’ची जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे,’ असेही डॉ. भोंडवे म्हणाले.

डॉ. भोंडवे सांगतात..

कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास पाहिला तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करत होते, त्यावेळी १६४२ मध्ये पहिल्यांदा पास्कल नावाच्या संशोधकाने पहिला मेकॅनिकल कॅल्क्युलेटर तयार केला. साडेतीनशे वर्षांपूर्वीपासून टप्प्याटप्याने विविध संशोधने होत गेली आणि गेल्या काही महिन्यांत चॅट जीपीटी आल्यानंतर ‘एआय’ची अधिक चर्चा होऊ लागली आहे.

आजही आपल्याला रक्तदानाचे आवाहन करावे लागते; पण आता शरीरातील विविध पेशींची निर्मितीही शक्य झाली आहे. लाल पेशीच जर जशाच्या तशा तयार होऊ लागल्या तर भविष्यात रक्तदानाची गरजही भासणार नाही. किडनी प्रत्यारोपणासाठी वर्षाला तीन लाख किडनींची गरज असताना केवळ पंचवीस ते सव्वीस हजार किडनी उपलब्ध होतात. किडनी असो किंवा अगदी हृदय, मेंदूही जर जसाच्या तसा तयार झाला तर अवयवदानाची गरजही भविष्यात भासणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT